अजित पवारांच्या नावाने संस्था नोंदणीसाठी ‘हे’ बंधनकारक Top 10 news: अजित पवारांच्या नावाचा, प्रतिमेचा किंवा स्मारकांचा वापर करून कोणतीही संस्था, ट्रस्टची नोंदणी करताना कुटुंबीयांची लेखी पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असणार आहे. उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या पत्रानंतर धर्मादाय आयुक्तांनी राज्यातील सर्व विभागीय व जिल्हा कार्यालयांना यासंदर्भात निर्देश दिले आहेत. अजित पवारांच्या नावाने समित्या स्थापन करून निधी गोळा करणाऱ्या संस्थांची सुद्धा सखोल चौकशी होणार आहे. अजितदादांच्या योगदानामुळे जनमानसात त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे. त्यामुळे विविध ठिकाणी त्यांच्या स्मरणार्थ पुतळे, स्मारके उभारणे किंवा त्यांच्या नावाने संस्था स्थापन करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. अजित पवार यांच्या नावाची प्रतिष्ठा आणि त्यांच्या कार्याचे पावित्र्य कायम राहावे, यासाठी संस्थांच्या नोंदणीवेळी कुटुंबीयांचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ अनिवार्य करणे अशी मागणी उपमुख्यमंत्री कार्यालयाने धर्मादाय आयुक्तांकडे केली होती. त्यानंतर शासनाची परवानगी आणि कुटुंबीयांची संमती नसताना अशा स्मारकांची उभारणी करता येणार नाही. अजितदादांचे नाव वापरून संशयास्पद कारभार करणाऱ्या संस्थांच्या अर्जांची सखोल चौकशी करण्याचेही निर्देश दिले आहेत. जिष्णू देव वर्मा यांनी घेतली महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी राज्यपाल पदाची शपथ घेतली. लोकभवनातील दरबार सभागृह येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी त्यांना राज्यपालपदाची शपथ दिली. शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. जिष्णू देव वर्मा हे महाराष्ट्राचे २२ वे राज्यपाल आहेत. सुरुवातीला मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी जिष्णू देव वर्मा यांच्या नियुक्तीसंदर्भातील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढलेली अधिसूचना वाचून दाखवली. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व राज्यगीताने झाली तर सांगता राष्ट्रगीताने झाली. शपथविधी नंतर राज्यपालांना भारतीय नौदलातर्फे मानवंदना देण्यात आली. राज्यात 5 हजार शिक्षकांची भरती होणार राज्यात लवकरच 5000हून अधिक शिक्षकांची भरती होणार आहे. राज्यात 11000 शिक्षकांची पद रिक्त आहेत. त्यापैकी 5 हजार पदे भरली जाणार आहेत. याबाबत उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत ही घोषणा केली. महाराष्ट्रात लवकरच मोठ्या प्रमाणात पदभरती होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पदभरतीला मान्यता दिली आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत विधान परिषदेत ही घोषणा केली. राज्यातील शिक्षण क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून रिक्त असलेली पदे भरण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या मेगापदभरतीत एकूण 5 हजार 412 प्राध्यापकांची नेमणूक केली जाणार आहे. ही पदे सहायक प्राध्यापक, प्राध्यापक आणि इतर पदांसाठी आहेत. बनावट दिव्यांगाविरोधात कारवाई सुरू राज्यात सरकारी नोकरी मिळवण्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्राचा वापर केल्यावरून तक्रारी समोर येत होत्या. या तक्रारीची दखल घेत राज्याचे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी बनावट दिव्यांगाविरोधात कारवाई सुरू केली. मंत्रालयासह राज्यातील सर्व प्रशासकीय विभागांना दिव्यांगासह त्यांच्या युआयडी कार्डची तपासणी करत अहवाल सादर करण्याचे आदेश तुकारम मुंढे यांनी दिले होते. हे आदेश निघल्यानंतर तब्बत ३१६ जणांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्रे सादर करत सरकारी नोकरी लाटल्याचे समोर आले. या सर्वांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यानंतर आता पु्न्हा १२१ जणांची नोकरी गेली आहे. बनावट क्रीडा प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी नोकरी लाटल्यामुळे १२१ जणांची सरकारी सेवेतून हकालपट्टी करण्यात आली. यासंबंधी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी महिती दिली. तब्बल 90 लाख लाडक्या बहिणींची नावं हटवली Top 10 news: महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’बाबत मोठी अपडेट समोर आली आहे. सरकारी पातळीवर या योजनेत मोठे बदल करण्यात आले आहेत. राज्य सरकारकडून डिजिटल शुद्धीकरण अभियान राबवित तब्बल ९० लाख महिलांची नावं लाभार्थी यादीतून हटविण्यात आली आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या २.६ कोटींवरुन १.५३ कोटींवर घसरली आहे. ज्यामुळे राज्यातील लाखो कुटुंबात खळबळ उडाली आहे. सरकारच्या या निर्णयाचा सर्वात मोठा परिणाम बीड जिल्ह्यावर पाहायला मिळत आहे. येथे एका ऑडिटमध्ये २.८३ लाख महिलांना अपात्र घोषित करण्यात आलं आहे. सरकार या प्रिसिजन-टार्गेटिंग रणनीतीअंतर्गत अर्जदारांचा डेटा थेट आयकर नोंदी आणि (RTO) आरटीओ डेटाबेसमधून पडताळला गेला आहे. सरकारने दावा केलाय की, या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीत १७ हजार कोटींची बचत होईल. मात्र या प्रक्रियेत १२ हजारांहून अधिक पुरुष आणि अनेक सरकारी कर्मचाऱ्यांच्या बनावट नोंदी देखील आढळून आल्या आहेत. मात्र या कडक नियमांनुसार, लाखो गरजवंत महिला कायदपत्रांच्या जाळ्यात अडकल्या आहेत. राज्यपाल हरिभाऊ बागडेंची प्रकृती बिघडली राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांची प्रकृती बिघडली असून त्यांना जयपूरमधील सवाई मानसिंग (एसएमएस) रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. राज्यपाल हरिभाऊ बागडे आपल्या नियमित आरोग्य तपासणीसाठी रुग्णालयात गेले होते, परंतु तपासणीदरम्यान त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना ताबडतोब आयसीयूमध्ये दाखल करण्याचा निर्णय घेतला. राज्यपाल हरिभाऊ बागडे यांना रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी मिळताच, अनेक नेते आणि अधिकारी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात पोहोचलेत. आरोग्यमंत्री गजेंद्र सिंह खिंवसार यांनीही एसएमएस रुग्णालयात जाऊन राज्यपालांच्या प्रकृतीची माहिती डॉक्टरांकडून घेतली. याशिवाय उपमुख्यमंत्री प्रेमचंद बैरवा हे देखील राज्यपालांना भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचले. रुग्णालय प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, राज्यपालांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर सतत लक्ष ठेवून आहेत. युद्धादरम्यान भारताचे प्रयत्न सुरूच आज मध्य पूर्वेतील युद्धाची परिस्थिती सामान्य होण्याची चिन्हे दिसत नाहीत. लाखो भारतीयही मध्य पूर्वेतील संघर्षामुळे प्रभावित आहेत. भारताने यावर उपाय शोधण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अरघची यांना फोन केला. या दरम्यान, दोघांनी मध्य पूर्व संघर्षावर सविस्तर चर्चा केली. अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील सध्याच्या संघर्षानंतर दोन्ही नेत्यांमधील ही तिसरी चर्चा होती. परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी स्वतः ही माहिती सोशल मीडियावर शेअर केली. जयशंकर यांनी लिहिले की आज संध्याकाळी त्यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची यांच्याशी चालू संघर्षाशी संबंधित नवीनतम घडामोडींवर सविस्तर चर्चा केली. आम्ही संपर्कात राहण्याचे मान्य केले. जयशंकर यांनी यापूर्वी २८ फेब्रुवारी आणि ५ मार्च रोजी अरघची यांच्याशी चर्चा केली होती. रिलायन्सची अमेरिकेतील तेल शुद्धीकरण प्रकल्पात मोठी गुंतवणूक Top 10 news: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या टेक्सासमध्ये ५० वर्षांतील पहिला तेल शुद्धीकरण कारखाना उभारला जाणार असल्याचे जाहीर केले आहे. ट्रुथ सोशल मीडियावर त्यांनी ही घोषणा केली. भारतातील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या पाठिंब्याने हा प्रकल्प उभा राहत असल्याचेही त्यांनी म्हटले. ट्रुथवर त्यांनी लिहिले, “मला ही घोषणा करताना अभिमान वाटत आहे की, अमेरिका फर्स्ट रिफायनिंग टेक्सासच्या ब्राउन्सव्हिले येथे स्थापन होत आहे. ५० वर्षांतील टेक्सासमधील हा पहिलाच कारखाना आहे.” अमेरिका आणि इस्रायलने इराणविरोधात युद्ध पुकारल्यानंतर जगावर ऊर्जा संकट ओढवले आहे. कच्च्या तेलाचे दर वाढले असून गॅसचा पुरवठा विस्कळित झाला आहे. अशावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये तेल प्रकल्प उभारत असल्याची घोषणा केली आहे. ट्रम्प प्रशासन गेल्या काही काळापासून तेल आणि नैसर्गिक वायूचे दर कमी करण्याच्या अनेक पर्यायांचा विचार करत आहे. ही घोषणा त्याचाच एक भाग असल्याचे सांगितले जाते. जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमती उतरल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इस्त्रायल-इराणच्या युद्धादरम्यान नुकत्याच केलेल्या विधानांमुळे जागतिक बाजारपेठा हादरल्या होत्या. मात्र मंगळवारी फ्लोरिडा येथे पत्रकारांशी बोलताना, ट्रम्प यांनी असा अंदाज वर्तवला की, पश्चिम आशियामध्ये सुरू असलेले युद्ध लवकरच संपुष्टात येऊ शकते. त्यांच्या या विधानामुळे जागतिक स्तरावर तेलाच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाली; ज्या गुंतवणूकदारांना ऊर्जेच्या पुरवठ्यात दीर्घकाळ व्यत्यय येण्याची भीती वाटत होती, त्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला. ट्रम्प यांच्या टिप्पणीनंतर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाली.बाजारपेठेतील ही नरमाई ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात झालेल्या एका तासाच्या फोनवरील संभाषणाचे फलित आहे. या वर्षातील या दोन नेत्यांमधील ही पहिलीच चर्चा होती, जिचे क्रेमलिनने ‘स्पष्ट आणि विधायक’ असे वर्णन केलंय. सुर्यकुमार यादव,शिवम दुबेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 च्या स्पर्धेतील फायनलमध्ये भारताने न्यूझीलंडचा पराभव करत जेतेपद पटकावलं. मुंबईकर सुर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने विश्वचषक जिंकला. तर आणखी एक मुंबईकर शिवम दुबेही यावेळी संघात होता. सुर्यकुमार यादव आणि शिवम दुबेने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबेला मिठी मारत अभिनंदन केले. सुर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांचा सत्कारही केला. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत विजयी कामगिरी केल्यानंतर दोन्ही मुंबईकर खेळाडू देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले. या भेटीवेळी देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस देखील उपस्थित होत्या.