ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस Top 10 News : कट्टर राजकीय विरोधक असलेल्या ठाकरेसेना आणि पवारांच्या राष्ट्रवादीच्या मदतीला मुख्यमंत्री फडणवीस धावून गेल्याची चर्चा रंगलीय. राज्यात पुन्हा एकदा शिंदेसेनेकडून ठाकरेसेना आणि पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदारांना गळाला लावत ऑपरेशन टायगर राबवण्याच्या हालचालींची चर्चा रंगली होती.. मात्र ऑपरेशन टायगरची चर्चा सुरु असताना पवार आणि ठाकरेसेनेच्या मदतीला मुख्यमंत्री फडणवीस धावले आणि त्यांनी शिंदेसेनेच्या ऑपरेशन टायगरला ब्रेक लावल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. आदित्य ठाकरे आणि पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मोहित कंबोजच्या मुलीच्या वाढदिवसाला नुकतीच हजेरी लावली. या कार्यक्रमानंतर अवघ्या 24 तासांच्या आतच शिंदेंनी फडणवीसांची भेट घेतली. आणि याच भेटीत फडणवीसांनी ठाकरेसेना आणि पवारांची राष्ट्रवादी फोडण्यास नकार देत ऑपरेशन टायगरला ब्रेक लावल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. मात्र सत्तेत असलेले शिंदेंनी ऑपरेशन टायगर राबवण्याच्या हालचाली सुरू करण्यामागचं कारण होतं,बार्गेनिंग पॉवर वाढवणं. सुनेत्रा पवारांविरोधात ३ जण लढणार Sunetra Pawar : अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर बारामती पोटनिवडणुकीची घोषणा झाली आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल कऱण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या बारामतीमधून निवडणूक लढणार, हे जवळपास निश्चित झालेय. पण आता त्यांच्याविरोधात ३ जणांनी पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पण हे तिन्ही उमेदवार बारामती मतदारसंघातील नाहीत. जत, सातारा आणि सोलापूर या ठिकाणातील उमेदवार असल्याची माहिती मिळाली. पण पहिल्याच दिवशी ३ अर्ज आल्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. अर्ज मागे घेण्याच्या दिवसांपर्यंत आता कोण कोण मैदानात असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागलेय. खरातची पत्नी फरार, मुलगा पोलिसांच्या ताब्यात भोंदू अशोक खरात प्रकरणात पोलिसांनी कारवाईचा धडाका लावलाय. एकीकडे पोलिसांच्य विशेष तपास पथकाकडून अशोक खरातची कसून चौकशी सुरू आहे. चौकशीत त्याने कोट्यवधींची कमाई कशी कमावली, याचा शोध सुरू आहे. महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या खरातच्या विरोधात १० हून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. त्याच्या पत्नीच्या विरोधातही फसवणूक प्रकरणी शिर्डी पोलिसांत गु्न्हा दाखल झाला आहे. तर पोलीस थेट खरातच्या नाशिकच्या बंगल्यात शिरले. त्यावेळी पोलिसांनी खरातच्या मुलाला ताब्यात घेतलं.त्यानुसार आता खरातची त्याच्या मुलासाच्या समोरच चौकशी करण्यात येणार असल्याच म्हटलं जातंय. आयएएस तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली Top 10 News : राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या पुन्हा बदल्या करण्यात आल्या. १० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून यामध्ये नेहमी चर्चेत राहणाऱ्या तुकाराम मुंढे यांचा देखील समावेश आहे. आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची २१ वर्षांच्या कार्यकाळात तब्बल २५ वेळा बदली करण्यात आली आहे. त्यांची दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदावरून थेट आता त्यांची बदली मंत्रालयातील महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागात करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे तुकाराम मुंढे यांच्यावर महसूल आणि वन विभाग या महत्वाच्या खात्यांची जबाबदारी देखील सोपवण्यात आली आहे. तुकाराम मुंढे हे राज्यातील सर्वात जास्त चर्चेत राहिलेले आयएएस अधिकारी आहेत. राज्यभरात अनेक ठिकाणी त्यांच्या बदली करण्यात आल्या आहेत. त्यांनी अनेक कामचुकार आणि शिस्तीचे पालन न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा वाढ नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी १९ किलो वजनाचा एलजीपी सिलिंडरच्या किंमतीमध्ये ३१० रूपयांची वाढ केली आहे. सलग चौथ्या महिन्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाल्याने हॉटेल-रेस्टॉरंटमधील जेवण महागण्याची चिन्हे आहेत. आधीच गॅस टचांईने त्रस्त नागरिकांना आता दरवाढीचा फटकाही बसणार आहे. दरम्यान, घरगुती एलपीजी सिलिंडर आणि विमान इंधनाच्या म्हणजेच एटीएफच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही.महिनाभरापासून इराण-इस्रायल यांच्यामध्ये युद्ध सुरू आहे, त्यामुळे जगभरात महागाईचा भडका वाढलेला आहे. त्यातच आता १९ किलो वजनाच्या एलपीजी सिलिंडरच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ झालीय. नवीन आर्थिक वर्षे, नवे नियम आजपासून नवं आर्थिक वर्ष सुरु होत असून अनेक नवे नियम लागू होत आहेत. रेल्वे, आयकर कायदा, पॅन, आधार, परदेश प्रवास अशा अनेक क्षेत्रात हे बदल होत आहेत. आयकर कायद्यातील बदलांमुळे नोकरदारांसाठी होणारे बदल सुखावह आहेत. यानूसार नव्या सॅलरी स्लिपमध्ये बेसिक पे अर्थात मूळ वेतन हे वेतनाच्या 50% राहणार आहे. तर बेसिक पे वाढल्यानं ईपीएफ आणि ग्रॅच्युइटी वाढणार आहे. यासह अनेक महत्त्वाचे बदल होणार आहेत. आजपासून नवे दर लागू होणार आहेत. तर नवीन आर्थिक वर्षात रेडी रेकनरच्या दरात मात्र कोणतीच वाढ होणार नाही. आजपासून इंडिगो आणि एअर इंडियासह इतर कंपन्यांच्या तिकीट दरात वाढ होण्याची दाट शक्यता आहे इराणने ट्रम्पसह जगाची झोप उडवली अमेरिकेने इराणमधील इस्फाहान शहरातील एका मोठ्या बंकर-बस्टर बॉम्बनं हल्ला केला. त्यानंतर आता इराणने अमेरिकेला हादरवणारी धमकी दिली आहे. इराणच्या या धमकीमुळे डोनाल्ड ट्रम्पसह जगाला धडकी भरलीय. आखाती प्रदेशातील अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले केल्यानंतर, आता इराण अमेरिकन तंत्रज्ञान कंपन्यांना लक्ष्य करण्याची योजना आखत आहे. काल इराणी रिव्होल्युशनरी गार्ड्सने 18 अमेरिकन कंपन्यांवर संभाव्य हल्ल्यांबाबत इशारा दिला. या यादीत गुगल आणि मायक्रोसॉफ्टचाही समावेश आहे. इराणकडून आलेल्या या धमकीमुळे आता कॉर्पोरेट आस्थापनेही असुरक्षित बनलेत. भविष्यात जर कोणत्याही इराणी नेत्याची हत्या झाली, तर ते आखाती देशांमध्ये स्थित अमेरिकन कंपन्यांना लक्ष्य करतील असे म्हणत इराणने अमेरिकेला धमकी दिलीय. अमेरिकेला चार देशांकडून धक्का Top 10 News : अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सहयोगी देशांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्यानं ते नाराज झालेत. डोनाल्ड ट्रम्प एकीकडे इराणवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना सहयोगी देशांकडून सहकार्य मिळत नाहीये. युरोपियन देशांनी इराणविरुद्धच्या युद्धात थेट सहभागी होण्यापासून दूर राहणं पसंत केलंय. याशिवाय काही देशांनी अमेरिकेला हवाई हद्द वापरण्यास नकार दिलाय. फ्रान्स, इटली, स्पेन आणि स्वित्झरलँड या सारख्या देशांनी अमेरिकन लष्करी विमानांना हवाई एअरस्पेस वापरण्यास मनाई केलीय. यामुळं अमेरिकेच्या रणनीतीवर परिणाम होत असून यामुळं डोनाल्ड ट्रम्प यांची नाराजी वाढल्याचे संगणयत येतंय. रोमांचक लढतीत पंजाबचा 3 विकेट्सने विजय पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील आयपीएल २०२६ सामन्यात एक नवा खेळाडू नावारूपाला आला. पंजाब किंग्सचा संघ गुजरातविरूद्ध एका टोकाकडून लागोपाठ विकेट्स गमावत होता, पण २२ वर्षीय पंजबाच्या एका फलंदाजाने न डगमगता संघाला विजय मिळवून देत नाबाद माघारी परतला. २२ वर्षीय ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू कुपर कॉनोलीने आयपीएलमध्ये पदार्पण केलं. आपल्या आयपीएल पदार्पणातच, कुपरने सामना जिंकून देणारी खेळी करून पंजाब किंग्सला रोमांचक विजय मिळवून दिला. मुल्लानपूर येथील सामन्यात, कॉनोलीने ४४ चेंडूंमध्ये ७२ धावांची नाबाद शानदार खेळी केली. त्याने ५ चौकार आणि ५ षटकारांच्या या मॅचविनिंग खेळीसह पंजाब किंग्सला गुजरात टायटन्सवर ३ गडी राखून विजय मिळवून दिला. प्राजक्ता माळीचा मोठा निर्णय मराठी चित्रपट अभेनेत्री प्राजक्ता माली तिच्या दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध तर आहेच पण तिने स्वतःचा पारंपारिक दागिन्यांचा ब्रँड सुरू केलाय. पण, आता याच दागिन्यांच्या ब्रँडबाबत मोठी अपडेट समोर आलीय. प्राजक्तानं स्वतः सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करुन तिच्या पारंपारिक दागिन्यांच्या ब्रँड ‘प्राजक्तराज’बाबत माहिती शेअर केलीय. प्राजक्ता माळीनं आपल्या दागिन्यांच्या ब्रँडचं नाव बदललंय. प्राजक्तानं आधी तिच्या ब्रँडचं नाव ‘प्राजक्तराज’ असं ठेवलेलं. आता तिनं तिच्या या ब्रँडला नवं नाव दिलंय. याबाबत तिनं व्हिडीओमध्ये सर्व सांगितलंय. तिने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, माझ्या आणि आपल्या बँडसंदर्भात आहे. आता नव्या आर्थिक वर्षात माझ्या ज्वेलरी बँडचं नाव असणार आहे, ‘प्राजक्तसाज – Reviving Maharashtra’s Legacy…’ असं म्हणत बदललेल्या नावाची घोषणा केलीय.