एकनाथ शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत Top 10 News : उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत असल्याचं पक्षाकडून सांगण्यात येतंय. जे काम करतील तेच पदावर राहतील, जे पदावर असून काम करत नाही त्यांना डच्चू देणार, असे स्पष्ट आदेश एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यामुळेच मागील आठवड्यात पुण्यात शिवसेनेची पूर्ण कार्यकारिणीच बरखास्त केली गेली. यातून राज्यातील इतर पदाधिकाऱ्यांना थेट संदेश देण्यात आला आहे. आता निवडणुका तीन वर्ष तरी नाहीत. त्यामुळे राज्यातील सर्वच्या सर्व 43 हजार गावांपर्यंत शिवसेना पोचण्यासाठी कामाला लागा असेही आदेश एकनाथ शिंदे यांचे आहेत.एकनाथ शिंदे यांचे सर्व लक्ष पक्ष संघटना वाढीकडे असल्याची सूत्रांची माहिती आहे. आता क्वांटिटी नको, क्वालिटी हवी, फक्त निधीसाठी येणारे दूर केले जातील, जे पक्षाचे काम करतील तेच पक्षात मोठ्या पदांवर जातील असेही संकेत एकनाथ शिंदेंनी दिल्याचं बोललं जातंय. शरद पवारांना मोठा धक्का राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार यांना मोठा धक्का बसला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते समरजीत घाटगे यांनी पक्षाची साथ सोडली असून ते आज भाजपचे कमळ हाती घेणार आहेत. समरजीत घाटगे आज मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.विधानसभा निवडणुकीच्या वेळी समरजीत घाटगे यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. विधानसभा निवडणुकीत भाजपने तिकीट नाकारल्यामुळे शेवटच्या क्षणी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला होता. पण अवघ्या काही महिन्यातच ते भाजपमध्ये घरवापसी करत आहेत. यंदा पाऊस शेतकऱ्यांचं टेन्शन वाढवणार गेल्या वर्षी शेतकऱ्यांना झोडपणारा आणि राज्यात हाहाकार माजवणारा मान्सून यंदा मात्र दडी मारण्याची शक्यता आहे…आणि त्याला कारण ठरलंय एल निनो सक्रीय होण्याची शक्यता. त्यामुळेच जून ते सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज स्कायमेटनं वर्तवलाय… त्यामुळे शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलंय. जून महिन्यात चांगल्या पावसाला सुरुवात होईल… मात्र जुलै महिन्यात पाऊसाची अनिश्चितता असल्यानं पाऊस ओढ देण्याची शक्यता आहे. तर ऑगस्टमध्ये पावसात मोठी घट होऊ शकते… त्याबरोबरच सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊसाचा अंदाज स्कायमेटनं वर्तवलाय.खरं तर स्कायमेटनं वर्तवलेल्या अंदाजानुसार सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज 40 टक्के आहे.. तर 30 टक्के दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते, असंही स्कायमेटनं म्हटलंय. त्यामुळे ही आकडेवारीच दुष्काळाचं सावट गडद होत असल्याचं स्पष्ट करतेय. खरातविरोधात आणखी ११ महिलांची तक्रार अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. अशोक खरातचे पाय आणखी खोलात गेले आहेत. त्याच्या विरोधात आणखी ११ महिलांनी लैंगिक शोषण केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे खरातविरोधात महिलांच्या तक्रारींची संख्या १९ वर पोहचली आहे. पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आणखी ११ महिलांनी खरात विरोधात पोलिसांत धाव घेतली. खरातने या महिलांना भीती दाखवली होती. पतीचा मृत्यू अटळ आहे तसंच कुटुंबियांच्या जीवाची भीती दाखवून नराधम खरातने त्यांच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. देवाची ऊर्जा देण्याच्या नावाखाली भोंदू खरात महिलांचं शोषण करत होता. अशोख खरात प्रकरणाचा नाशिक पोलिस, एसआयटी आणि आता ईडीकडून कसून तपास सुरू आहे. या प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका Top 10 News : महाराष्ट्रातील प्रशासनात बदल्याच्यांचे वारे वाहत असल्याचे चित्र आहे. कारण, आठवडाभरात राज्यात ३५ पेक्षा जास्त सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. यामध्ये अनेक महत्त्वाच्या आयएएस अधिकार्यांच्या नावाचा समावेश आहे. गेल्या आठवड्यात राज्यात २५ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या. त्यात तुकाराम मुंडे यांच्या नावाचाही समावेश होता. त्यात आता आणखी ११ सनदी अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. ११ सनदी अधिकाऱ्यांची वेगवेगळ्या विभागात बदली झाली आहे. त्यामध्ये आयएएस अधिकारी श्वेता सिंघल, रंजन महिवाल, लक्ष्मण राऊत या अधिकाऱ्यांच्या नावांचा समावेश आहे.या बदल्यांमुळे महसूल, कृषी आणि स्थानिक प्रशासकीय विभागांत मोठे फेरबदल पाहायला मिळत आहेत. अखेर अमेरिका-इराणचं युद्ध थांबलं इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध अखेर आज थांबलं आहे. अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमधला संघर्ष अखेर थांबला असून दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाली आहे. दोन्ही देशांनी सैन्य कारवाया दोन आठवड्यांसाठी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा केल्यानंतर इराणचे परराष्ट्र मंत्री, सय्यद अब्बास अराघची, यांनी देखील एक्सवर पोस्ट करुन वृत्ताला दुजोरा दिला आहे. इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या वतीने निवेदन जारी करत अराघची यांनी दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी करण्यात आल्याचे मान्य केले आहे. इराणनं दिलेला 10 अटींचा मसुदा मान्य करण्यासारखा असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं. तर होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याची अट अमेरिकेने घातली होती. या अटीला इराणनेदेखील सकारात्मक प्रतिसाद दिला. इराण हॉर्मुझ पूर्णपणे आणि लगेच खुलं करायला तयार झाल्याचंही ट्रम्प यांनी सांगितलं आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध थांबवण्यात चीन आणि पाकिस्तानने मध्यस्थी केल्याचं बोललं जात आहे. युद्ध थांबवल्यानंतर पाकिस्तानने मानले आभार इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध थांबल्यानंतर संपूर्ण जगाने सुटकेचं श्वास सोडला आहे. त्यावरच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ट्विट, अत्यंत विनम्रतेने, मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की, ‘इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण’ आणि ‘युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका’ तसेच त्यांचे सहयोगी देश यांनी लेबनॉनसह इतर सर्वत्र तातडीने युद्धविराम करण्याबाबत सहमती दर्शविली आहे. आणि हा युद्धविराम त्वरित अंमलात येईल. मी या सुज्ञ निर्णयाचे मनापासून स्वागत करतो आणि दोन्ही राष्ट्रांच्या नेतृत्वाप्रती माझी कृतज्ञता व्यक्त करतो. तसेच, सर्व वाद मिटवून एका निश्चित करारापर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने पुढील चर्चा करण्यासाठी, मी त्यांच्या शिष्टमंडळांना शुक्रवार, 10 एप्रिल 2026 रोजी इस्लामाबादला भेट देण्याचे निमंत्रण देतो, असं शाहबाज शरीफ पोस्ट करत म्हणाले. आखाती युद्धात पाकिस्तान होरपळला आखाती युद्धात पाकिस्तान आता पूरता भरडला गेलाय. ऊर्जासंकट आणि इंधनाच्या टंचाईनं कंगाल पाकिस्तानवर मोठी नामुष्की ओढावलीय. शाहबाज सरकारनं ऊर्जा बचतीच्या नावाखाली आपली अब्रु वाचवण्यासाठी एक अजब फतवा काढलाय. खैबर पख्तुनख्वा, पंजाब, बलुचिस्तान, इस्लामाबाद, गिलगिट-बाल्टिस्तान आणि पीओकेमधील बाजारपेठा आणि शॉपिंग मॉल्स रात्री 8 वाजताच बंद होणार आहेत.तर बेकरी, रेस्टॉरंट, तंदूर आणि खाद्यपदार्थांची दुकाने रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.खाजगी घरे किंवा मालमत्तांमध्ये रात्री 10 नंतर होणारे विवाह सोहळे बंद राहणार आहेत. मात्र औषधांची दुकाने आणि फार्मसींवर कुठल्याही प्रकारची वेळची अट नाही. पाक पंतप्रधानांनी हा नवीन नियम 7 एप्रिलला रात्री 8 वाजल्यापासून लागू होणार आहे. त्यामुळे कंगाल पाकिस्तानची वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेने सुरु आहे. पहिल्याच बॉलला वैभवचा सिक्स आयपीएल 2026 मधील 13व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सवर 27 धावांनी शानदार विजय मिळवला. गुवाहाटीतील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्याने 11-11 षटकांचा खेळ झाला, ज्यामध्ये राजस्थानने बाजी मारली. सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थानकडून १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने पुन्हा एकदा तुफानी खेळी केली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे भेदक मारा करणाऱ्या जसप्रीत बुमराहला त्याने पहिल्याच चेंडूवर खणखणीत सिक्स लगावला ज्यानंतर बुमराहची रिऍक्शन बघण्यासारखी होती.सूर्यवंशी तिथेच थांबला नाही, त्याने त्याच षटकाच्या चौथ्या चेंडूवरही षटकार मारला. या 11 षटकांच्या सामन्यात सूर्यवंशीने एक चौकार आणि पाच षटकारांसह 14 चेंडूंमध्ये 39 धावांची धडाकेबाज खेळी केली. यासह, वैभवने आता आयपीएल २०२६ मध्ये समीर रिझवीसोबत सर्वाधिक षटकारांच्या विक्रमाचीही बरोबरी केली आहे. तन्वीला मिळाले ‘तिकीट टू फिनाले’ Top 10 News : बिग बॉस मराठी’चा खेळ आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलाय, खेळाचा थरार आता इतका वाढलाय की, आता टॉप 7 स्पर्धकांमध्ये करो या मरो अशी परिस्थिती निर्माण झालीय. ‘तिकीट टू फिनाले’साठी कोण पात्र, कोण अपात्र ठरवण्यासाठी बिग बॉसनी एक टास्क घेतलेला. त्या टास्कमध्ये राकेश बापट, तन्वी कोलते आणि अनुश्री माने ‘तिकीट टू फिनाले’चा टास्क खेळण्यासाठी पात्र ठरल्या. त्यानंतर घरात या सीझनच्या ‘तिकीट टू फिनाले’साठीचा टास्क पार पडला. हा टास्क तसा फार सोपा नव्हता. पण, तरीसुद्धा तिनही स्पर्धकांनी हा टास्क पूर्ण केला. स्पर्धकांसमोर ‘कोळ्याचं महाकाय जाळं’ उभं करण्यात आलं होतं. तर, जाळ्याच्या एका बाजूला 7 प्रश्न आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला त्या 7 प्रश्नांची उत्तरं ठेवलेली, कोळ्याचं जाळं भेदून स्पर्धकांना अचूक उत्तरं शोधून ती त्या प्रश्नांसमोर लावायची होती. तिन्ही स्पर्धकांनी हा टास्क पूर्ण केला. सर्वात आधी राकेश बापटनं 21 मिनिटांच्या आसपास वेळ घेतला. त्यानंतर आलेल्या तन्वी कोलतेनं साडेसहा मिनिटांच्या आसपास वेळ घेतला. तर, नंतर आलेल्या अनुश्री मानेनं नऊ मिनिटांच्या आसपास वेळ घेतला. त्यामुळे सर्वात कमी वेळ घेऊन तन्वीनं स्वतःला सिद्ध केलं आणि ‘तिकीट टू फिनाले’ पटकावलं.