Top 10 news : ‘माझं मन आतून पार तुटून जातंय, हे कटू सत्य स्वीकारायला….’ ,’फक्त राजीनामा नाही, व्यवस्था बदलावी लागेल’आणि “तरुणांनी धीर सोडू नये’ वाचा टॉप १० बातम्या
Top 10 news : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पहिल्या जयंतीनिमित्त बारामतीतील स्मृतीस्थळी त्यांना अभिवादन करण्यात आले.

‘माझं मन आतून पार तुटून जातंय, हे कटू सत्य स्वीकारायला….’,
अजितदादांच्या जयंतीला सुनेत्रा पवारांची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट!
Top 10 news : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पहिल्या जयंतीनिमित्त बारामतीतील स्मृतीस्थळी त्यांना अभिवादन करण्यात आले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह खासदार पार्थ पवार आणि जय पवार उपस्थित होते. यावेळी सुनेत्रा पवार यांनी भावनिक पोस्ट शेअर करत, “एवढी वर्षे वाढदिवस आनंदाने साजरा केला, पण आज तो जयंती म्हणून साजरा करताना मन तुटून जाते,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच “आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुम्ही माझी सर्वात मोठी ताकद होतात. आजही तुमचे विचार, सेवाभाव, शिस्त आणि प्रेम माझ्या प्रत्येक श्वासात जिवंत आहे,” अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या. अजित पवारांच्या निधनानंतरची ही पहिली जयंती असल्याने कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांमध्ये भावूक वातावरण पाहायला मिळाले.
दूरदर्शी, सर्वसमावेशक व लोकाभिमुख नेतृत्व…
अजित पवारांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन केले. सोशल मीडियावरील पोस्ट आणि व्हिडिओ संदेशातून त्यांनी अजित पवार यांचे दूरदर्शी, सर्वसमावेशक व लोकाभिमुख नेतृत्व अधोरेखित केले. प्रशासनावरील मजबूत पकड, स्पष्टवक्तेपणा, कार्यक्षम नेतृत्व आणि अर्थमंत्री म्हणून राज्याच्या विकासासाठी केलेले योगदान यांचा गौरव करत, “एखाद्या राज्याचा अर्थमंत्री कसा असावा, याचे उदाहरण म्हणजे अजितदादा,” असे फडणवीस म्हणाले. महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील, असेही त्यांनी नमूद केले.
दिवस येतील-जातील, कालचक्र फिरत राहील
दादांच्या स्मृतींचा सुगंध सदैव दरवळत राहील..
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीचे शिल्पकार अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त भावपूर्ण अभिवादन केले. हा दिवस एका डोळ्यात आनंद आणि दुसऱ्या डोळ्यात अश्रू आणणारा असल्याचे त्यांनी म्हटले. अजित पवार यांची जागा कोणीही भरून काढू शकत नाही, मात्र त्यांच्या कार्यपथावर चालत सुखी-संपन्न महाराष्ट्र घडवणे हीच खरी आदरांजली ठरेल, असे शिंदे म्हणाले. कार्यकर्ते घडवणे, वक्तशीरपणा, प्रशासनावरील पकड, शेती, सहकार आणि अर्थकारणातील त्यांचा अभ्यास प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
‘फक्त राजीनामा नाही, व्यवस्था बदलावी लागेल’
उद्धव ठाकरेंचा जंतर-मंतरवरील आंदोलनाला पाठिंबा;
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काँकरोच जनता पार्टीकडून दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट देत पाठिंबा जाहीर केला. सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांची भेट घेत त्यांनी आंदोलनकर्त्यांना संबोधित केले. “अभिजीतने पेटवलेली ठिणगी विझू देऊ नका. तुम्ही देशाचे भविष्य आहात,” असे आवाहन करत आंदोलन देशभर नेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसंच “फक्त एका मंत्र्याच्या राजीनाम्याने प्रश्न सुटणार नाही, व्यवस्था बदलावी लागेल,” असे ठाकरेंनी म्हटले. दरम्यान, आंदोलकांनी आजही आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला असून, अभिजीत दीपके आणि इतर आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार;
पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट, अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट Top 10 news :
राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, भारतीय हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांसाठी इशारा जारी केला आहे. पुणे जिल्ह्यातील घाटमाथा परिसरासाठी अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, कोल्हापूरच्या घाटमाथा भागांसह विदर्भ आणि कोकणातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
‘लोकशाही वाचवण्याचा संग्राम पुन्हा सुरू झाला’;
बाळासाहेब थोरातांची सरकारवर टीका
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी NEET पेपरफुटी, CJP आंदोलन आणि दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. सरकार जनतेचा आणि विद्यार्थ्यांचा आक्रोश समजून घेण्यास तयार नसल्याचा आरोप त्यांनी केला. “आज दुसऱ्याचं घर जळतंय, उद्या तुमचंही जळू शकतं. लोकशाही वाचवण्याचा संग्राम पुन्हा सुरू झाला आहे,” असे ते म्हणाले. तसेच मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेत पारदर्शकता राखण्याचे आवाहन करत, प्रत्येक पात्र मतदाराची नोंद सुनिश्चित करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
‘विद्यार्थ्यांचा राजकीय वापर सुरू आहे’;
राहुल गांधींवर धर्मेंद्र प्रधान यांची टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, प्रियांका गांधी आणि काँग्रेस खासदारांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन केले. यावर प्रतिक्रिया देताना धर्मेंद्र प्रधान यांनी काँग्रेसवर विद्यार्थ्यांचा राजकीय साधन म्हणून वापर केल्याचा आरोप केला. संसदेतील चर्चेऐवजी काँग्रेस राजकीय तमाशा करत असल्याची टीका त्यांनी केली. नीटसह विद्यार्थ्यांच्या सर्व समस्यांवर चर्चा आणि तोडगा काढण्यास सरकार कटिबद्ध असल्याचे सांगत, विद्यार्थ्यांना घोषणांऐवजी उपाय, उत्तरदायित्व आणि निश्चितता देण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सुटकेनंतर राहुल गांधींनी केल्या तीन मागण्या
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी राहुल गांधी यांनी काँग्रेस खासदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन केले. सुमारे सव्वा तीन तासांनंतर दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना ताब्यात घेतले. त्यानंतर छत्रसाल स्टेडियममधील राहुल गांधींचा सुटकेनंतरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओत त्यांनी संसदेत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर चर्चा नाकारल्याचा आरोप करत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची, विद्यार्थ्यांवरील कारवाईची चौकशी, आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याची आणि शिक्षण व्यवस्थेत तातडीने सुधारणा करण्याची मागणी केली.
रवी शास्त्रींचा 2027 विश्वचषकासाठी संभाव्य संघ;
संघ निवडीने सर्वांनाच धक्का
भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी संभाव्य 15 सदस्यीय भारतीय संघ जाहीर केला आहे. या संघाचे कर्णधारपद शुभमन गिलकडे सोपवण्यात आले असून, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना त्यांच्या अनुभवामुळे स्थान देण्यात आले आहे. संघात केएल राहुल, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार आणि हर्षित राणा यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, ईशान किशनला या संभाव्य संघात स्थान मिळालेले नाही.
नसीरुद्दीन शाहांचा भावनिक व्हिडिओ;
NEET आंदोलनातील विद्यार्थ्यांना पाठिंबा, सरकारवर टीका Top 10 news :
NEET पेपरफुटीविरोधातील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी भावनिक व्हिडिओ शेअर करत संताप व्यक्त केला. विद्यार्थ्यांवरील कारवाई करणाऱ्यांचा उल्लेख त्यांनी “गुंड” असा करत आंदोलकांच्या संघर्षाला पाठिंबा दिला. “तरुणांनी धीर सोडू नये, अनेक जण तुमच्या पाठीशी आहेत,” असे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्यांबद्दल सहानुभूती व्यक्त करत देशातील तरुणांबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाल्याचेही शाह यांनी म्हटले. त्यांच्या या व्हिडिओची सोशल मीडियावर मोठी चर्चा होत आहे.




