Top 10 News: ६ बंडखोर खासदार आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार?, ओमराजे निंबाळकर यांचा मला अभिमान आणि ‘सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेच्या डिजिटल प्रवासाला सुरुवात, वाचा टॉप १० बातम्या
Top 10 News: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना पुन्हा एकदा वेग आला असून ठाकरे पुन्हा एकदा फुटला आहे.

राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड!
६ बंडखोर खासदार आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार
Top 10 News: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना पुन्हा एकदा वेग आला असून ठाकरे पुन्हा एकदा फुटला आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह शिवसेना (UBT) गटातील ६ बंडखोर खासदार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार आहेत.एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी ३ वाजता हा हाय-व्होल्टेज पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. ठाकरेंच्या ९ खासदारांपैकी ६ खासदारांनी साथ सोडल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे (यूबीटी) सर्व ६ बंडखोर खासदार सोमवारी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होणार आहे. यामुळे पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत अपात्रता टाळण्यासाठी आवश्यक असलेले महत्त्वपूर्ण दोन-तृतीयांश संख्याबळ बंडखोर गटाला मिळेल. समोर आलेल्या वृत्तानुसार शिवसेनेचे (यूबीटी) सर्व सहा बंडखोर लोकसभा खासदार सोमवारी दुपारी ३ वाजता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलीन होण्याची शक्यता आहे.
ओमराजे निंबाळकर यांचा मला अभिमान
एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना अखेरीस पूर्णविराम मिळाला. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू खासदार ओमराजे निंबाळकर यांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. त्यावर भाष्य करताना ओमराजे निंबाळकरांनी शिवसेनेत प्रवेश करताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांचा मला अभिमान आहे. स्वतःसाठी नाहीतर जनतेसाठी निःस्वार्थ काम करणारा हा लोकप्रतिनिधी खरा कडवट शिवसैनिक आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रामाणिकपणे जनतेचे काम करत आहे, अशा निःस्वार्थ खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पाठीशी मी कायम भक्कमपणे उभा आहे. ओमराजे निंबाळकर यांच्या प्रत्येक सुखदुःखात मी सहभागी आहे, असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार पुढे नेण्यासाठी आणि जनतेचे प्रश्नं सोडवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर यांचे मी शिवसेनेत स्वागत करतो, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
विधान परिषद निकालाच्या दिवशी सर्वात मोठा ट्विस्ट!
गोकुळ गिते यांची मतमोजणी केंद्रावर हजेरी
राज्यभरात कमालीची उत्सुकता निर्माण केलेल्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीचा निकाल आज, सोमवारी (दि. 22) जाहीर होत आहे. मात्र, या निकालाच्या काही तास आधीच निवडणुकीत एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. निवडणुकीतून माघार घेतल्याचे मानले जात असलेले अपक्ष आणि भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांनी अचानक मतमोजणी केंद्रावर हजेरी लावत मोठा ‘घुमजाव’ केला आहे. “मी निवडणुकीतून माघार घेतली नव्हती आणि मला विजयाचा 100 टक्के विश्वास आहे,” असा दावा गीते यांनी केला आहे. यामुळे महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महायुतीचे उमेदवार आणि पदाधिकारी यांना पहिल्या दिवसापासून ज्या गोष्टीची शंका आणि संशय होता, तेच आज घडताना पाहायला मिळत आहे. गोकुळ गीते यांची मतमोजणी केंद्रावर झालेली एन्ट्री ही सर्वांच्या भुवया उंचावणारी ठरली आहे.
“उजाडलेल्या गावाची पाटीलकी मी सोडतो,असं म्हणण्यासारखं
मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना चिमटा Top 10 News:
मी शिवसेना पक्षप्रमुख पदाचा राजीनामा देऊन सामान्य शिवसैनिकाला त्या पदावर बसवायला तयार असल्याचे मोठं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिन सोहळ्यात म्हटले होते. या वक्तव्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खिल्ली उडवली आहे. त्या वक्तव्याचा संदर्भ देत देवेंद्र फडणवीस म्हणाले, “उजाडलेल्या गावाची पाटीलकी मी सोडतो, असं म्हणण्यासारखं हे आहे. आता राहिलाच कोणता राजीनामा? ती वेळ का आली? अशी विचारणा फडणवीस यांनी केली. फडणवीस पुढे म्हणाले की, “शिवसेना म्हणजे पक्ष नाही, तर तो शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा विचार आहे आणि तो संपत्तीचा वारसा नाही तर विचारांचा वारसा आहे. तो विचारांचा वारसा ज्या क्षणी त्यांनी सोडला, त्या क्षणी विचार मान्य असणारे सगळे वेगळे झाले. ज्यावेळी आत्मचिंतन करण्याची गरज होती, त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी आत्मचिंतन केलं नाही, हा त्याचा परिणाम आहे. बाळासाहेबांची शिवसेना आता एकनाथराव शिंदे चालवत आहेत आणि बाळासाहेबांचा धनुष्यबाण व विचार त्यांच्याच सोबत आहेत, असे फडणवीस म्हणाले.
शिवसेनेचे ॲापरेशन टायगर यशस्वी;
आज 6 खासदारांचे एकत्र फोटो-व्हिडीओ प्रसिद्ध होणार
शिंदेच्या शिवसेनेचे ॲापरेशन टायगर यशस्वी झालंय . शिवसेना ठाकरे गटाच्या 6 खासदारांची आज राजकीय अधिकृत भूमिका जाहीर होणार आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिलेले ठाकरे गटाच्या 6 खासदारांचे संमती पत्र आणि सर्व खासदारांचे एकत्र फोटो, व्हिडीओ आज प्रसिद्ध होणार आहेत. ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने आता NDA मध्ये शिवसेनेच्या लोकसभा खासदारांची संख्या 13वर पोहोचणार आहे. शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज विधान भवनात प्रसार माध्यमांशी साधणार संवाद साधणार आहे.ऑपरेशन टायगरचा पुरावा ठाकरेंच्या गटाकडून मागितला जात होता, लोकसभा अध्यक्ष ओम् बिर्ला यांच्याकडे गटस्थापन केल्याची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याचे शिंदे गटाकडून सांगण्यात आले होते. मात्र प्रमाणपत्र आणि फोटो समोर आला नसल्याने अद्यापही शंका उपस्थित केली जात होती. पण आज अध्यक्षांच्या ऑफिसमधून दोन्ही गोष्टी बाहेर येतील, असे सांगण्यात येत आहे.
मुंबईला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट;
राज्यात 24 जूनपासून मान्सूनचा जोर वाढणार
मुंबईत आज पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पश्चिम उपनगरांमध्ये पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली. तर मध्य मुंबईतही सकाळपासून पावसाला सुरुवात झाली. वरळी, लोअर परळ, अंधेरी, विलेपार्ले, दादर आणि वांद्रे परिसरात पावसाच्या सरी बरसल्या. तर नवी मुंबई, ठाण्यामध्येही रिमझिम पाऊस पडतोय. दरवर्षी साधारण 7 जूननंतर राज्यभरात पावसाला सुरुवात होत असते. मात्र, यंदा एल निनोचं संकट असल्यानं तब्बल 15 ते 17 दिवस मान्सून लांबला. तरी आज पावसाला सुरुवात झाल्यानं मात्र सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. आज मुंबईला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुढील दोन दिवस मुंबई शहराला वादळी पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आला आहे. तसेच हवामान प्रणाली हळूहळू उत्तरेकडे सरकणार असल्याने 24 ते 26 जून या कालावधीत महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांमध्ये पावसाचा जोर लक्षणीयरीत्या वाढण्याची दाट शक्यता आहे. गेल्या 15 दिवसांपासून मान्सूनच्या रेंगाळलेला मान्सून आज, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुण्यापर्यंत काहीसा पुन्हा सक्रिय झाला. काही ठिकाणी मुसळधार, तर काही भागांत हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला.
PF खातेदारांसाठी खुशखबर!
कारण न देता मिळणार PFची संपूर्ण रक्कम?
EPFO 3.0 अंतर्गत अनेक नवीन सुविधा आणण्याच्या तयारीत आहे. यामधील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे खातेदारांना त्यांच्या पीएफ खात्यातील 75 टक्के रक्कम कधीही तात्काळ काढण्याची सुविधा मिळणार आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांमध्ये याबाबत उत्सुकता वाढली आहे. EPFO ने दिलेल्या माहितीनुसार, विशिष्ट परिस्थितींमध्ये खातेदारांना संपूर्ण पीएफ रक्कम काढण्याची सुविधा यापुढेही उपलब्ध राहणार आहे. नैसर्गिक आपत्ती, महामारी, कंपनी बंद होणे, दीर्घकाळ बेरोजगारी किंवा गंभीर आजारासाठी उपचार अशा परिस्थितींमध्ये सदस्यांना संपूर्ण रक्कम काढता येणार आहे. सध्याच्या नियमांनुसार अशा वेळी पैसे काढण्यासाठी कारण नमूद करावे लागत होते. तसेच संबंधित कागदपत्रेही सादर करावी लागत होती. अनेकदा कारण मान्य न झाल्यामुळे अर्ज नाकारले जात होते. मात्र EPFO 3.0 मुळे ही प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे.
…तर तुम्ही तुमच्या देशात परत जाऊ शकणार नाही”!
डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट धमकी
अमेरिका आणि इराणच्या शिष्टमंडळाची रविवारी स्वित्झर्लंडमध्ये उच्चस्तरीच बैठक पार पडली. या बैठकीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा लष्करी हल्ल्यांची धमकी दिली. तसंच, इराणला धमकावता त्यांचा शाब्दित तोलही ढासाळला. त्यांनी इराणला लेबनॉनमधील हिजबुल्लाला रोखण्यास सांगितले आणि होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यास संपूर्ण इराण नष्ट केला जाईल, अशी उघड धमकी दिली. दरम्यान, अमेरिकेच्या या आक्रमक पवित्र्यामुळे इराणच्या शिष्टमंडळाने बैठकीतून बाहेर पडले. मात्र, या बैठकीत दोन्ही बाजूंनी निर्बंधांमधून सूट मिळण्याबाबत काही प्रगती झाल्याचंही सांगितलं जातंय. च्या निषेधार्थ होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याच्या इराणच्या इशाऱ्याला थेट उत्तर देताना, अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी स्पष्ट केले की या महत्त्वपूर्ण सागरी मार्गावरील कोणत्याही नाकेबंदीला ते प्रचंड ताकदीने चोख उत्तर देतील. जगातील तेलाच्या वाहतुकीचा मोठा वाटा ज्या धोरणात्मक जलमार्गातून जातो, त्याचा उल्लेख करत, “तुम्ही तो बंद केलात, तर तुमचा देशच शिल्लक राहणार नाही.” असं ट्रम्प म्हणाले.
इंग्लंडला धडकी भरली, भारतीय संघाची घोषणा
BCCIचे हैराण करणारे निर्णय
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने इंग्लंडविरुद्धच्या आगामी 3 सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी 15 खेळाडूंचा भारतीय संघाची घोषणा केलीय. पुढील महिन्यात इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या या मालिकेची कमान युवा फलंदाज शुभमन गिलकडे सोपवण्यात आली आहे. नुकतीच अफगाणिस्तानविरुद्ध आपल्या नेतृत्वाखाली पहिली वनडे मालिका जिंकणाऱ्या गिलवर आता इंग्लंडच्या कठीण परिस्थितीत संघाला विजय मिळवून देण्याची मोठी जबाबदारी असेल. जुलै 2022 नंतर भारतीय संघाचा हा पहिलाच इंग्लंड वनडे दौरा आहे. या महत्त्वपूर्ण दौऱ्यासाठी निवडकर्त्यांनी संघात काही मोठे बदल केले आहेत. स्टार फलंदाज विराट कोहली, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू अक्षर पटेल यांचे संघात पुनरागमन झाले आहे. या दिग्गज खेळाडूंसह भारतीय संघ जुलैमध्ये इंग्लडला रवाना होणार आहे.
टीव्हीनंतर आता यूट्यूबवर;
‘सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेचा डिजिटल प्रवास सुरु Top 10 News:
अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान मिळविणारी ‘सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिका आता नव्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. महाराष्ट्राच्या घराघरांत स्थान मिळवलेली ही मालिका २० जूनपासून ‘मराठी वारसा’ या लोकप्रिय यूट्यूब वाहिनीवर पहायला मिळणार आहे. ‘मराठी दूरचित्रवाणीच्या इतिहासात प्रथमच एखादी मालिका अशा स्वरूपात पुनरागमन करत आहे. फुले दांपत्यांनी समाजपरिवर्तनासाठी दिलेला लढा, शिक्षणाची क्रांती आणि समतेचा संदेश नव्या पिढीपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचावा, हाच या पुनर्प्रवासामागील आमचा उद्देश आहे. ही मालिका केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून सामाजिक जाणीव जागवणारी आणि प्रेरणा देणारी चळवळ आहे’,असं डॉ.अमोल कोल्हे यांनी सांगितलं. ‘सध्या ही मालिका सर्वप्रथम ‘मराठी वारसा’ या लोकप्रिय यूट्यूब वाहिनीवर पहायला मिळणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर डिजीटल माध्यमांवर विस्तार करण्याचा आमचा विचार असल्याचेही त्यांनी म्हटले.




