सुनेत्रा पवारांविरोधात ५५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात Top 10 News : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या पोटनिवडणुकीसाठी ६ एप्रिल हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा दिवस होता. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीकडून जोरदार प्रयत्न करण्यात आले. पण ही निवडणूक बिनविरोध होणार नाही यामागचे कारण म्हणजे सुनेत्रा पवार यांच्याविरोधात ५५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.बारामती निवडणूक अधिकारी स्वप्निल रावडे यांनी ही माहिती दिली. दरम्यान, बारामती पोटनिवडणूक लढण्यासाठी अनेक दिग्गज नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी दिली असून ते निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी या निवडणुकीतून माघार घेतली असली तरी करून मुंढे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय शरद पवारांचा पार्थ पवारांना मोलाचा सल्ला Top 10 News बारामतीच्या पोटनिवडणुकीत विनंती करुनही काँग्रेस पक्षाने सुनेत्रा पवार यांच्याविरोधात उमेदवार रिंगणात उतरवल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काहीशी नाराजी आहे. याच मुद्द्यावरुन अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी काँग्रेसविषयी तीव्र नाराजी व्यक्त करत काँग्रेसची महाराष्ट्रातील डाऊनफॉलची सुरुवात झालीय असं म्हटलं. मात्र त्यांच्या या विधानावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सल्ला देणारं विधान केलंय. त्यांनी या मुद्द्यावर बोलताना,मला असं वाटतं की राजकारणामध्ये काही महत्त्वाच्या निर्णयांवर स्टेटमेंट करायला एकप्रकारची परिपक्वता लागते. ती कितपत आहे, हे आज मी सांगू शकत नाही.” असं म्हटलंय. हे वक्तव्य करुन शरद पवार यांनी पार्थ पवार यांना कोणतेही राजकीय भाष्य करताना ते जबाबदारीने आणि तर्कसंगत करावे, असा अप्रत्यक्ष संदेश दिल्याची चर्चा सध्या रंगलीय. Top 10 News “कुटुंबीयांच्या पूर्वपुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने…” दिवंगत नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी काँग्रेसची महाराष्ट्रातील डाऊनफॉलची सुरुवात झालीय असं म्हणत पक्षावर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला आता महाराष्ट्र काँग्रेसने उत्तर दिलंय. याविषयी एक पोस्ट करत,”धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पूर्वपुण्याईवर आताच खासदार झालेल्या मुलाने काँग्रेस पक्षाच्या डाऊनफॉल बद्दल बोलणं, म्हणजे जरा जास्तच नाही का झालं? स्वतःच्या वडिलांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूनंतर लगेच जमीन घोटाळ्यातील चौकशीतून बचावासाठी राजकीय सोय म्हणून शांत राहणाऱ्या, महाशक्तिसमोर सरेंडर झालेल्या या कृतघ्न मुलाने काँग्रेस पक्षाबद्दल न बोललेलंच बरं राहील.या मुलाच्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्नाटक सरकारने त्यांच्या राज्यात FIR नोंद करून घेतला, तिथे सरकार काँग्रेस पक्षाचे आहे, काँग्रेस पक्षाचेच बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील अधिकृत उमेदवार त्या संशयास्पद अपघाताचा महाराष्ट्रात गुन्हा नोंद करा, निवडणूकीतून माघार घेईन, अशी मागणी करत आहेत. यावरही या कृतघ्न मुलाने बोलायला हवे ?” असं म्हणत सडेतोड उत्तर दिलंय. महिलांचं शोषण केल्याची खरातची कबुली नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याला 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सध्या अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू असून यावेळी चौकशीत धक्कादायक समोर येतीय. चमत्कार आणि वशीकरण नव्हे तर हातचलाखीने महिलांना धमकवल्याची तसंच शोषण केल्याची अशोक खरातनं कबुल केल्याच सांगण्यात येतंय. ज्या गोष्टींना लोक चमत्कार आणि वशीकरण समजतात, ती हातचलाखी असल्याचं अशोक खरातने मान्य केल्याची सूत्रांची माहिती आहे. दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए, असं म्हणत भोंदू अशोक खरातने एसआयटीच्या चौकशीत केलेल्या काळ्या कारनाम्याची कबुली दिल्याची सूत्रांची माहिती आहे. महिलांना जाळ्यात ओढण्यासाठी वापरलेल्या ट्रिक्सला विज्ञानानाचे नाव दिल्याचं समोर आलं आहे. या काळया कारनाम्यात खरातला अन्य कुणाची मदत होती का? याचा तपास सुरू असल्याचं म्हटलं जातंय. राज्यात पुन्हा एकदा ‘या’ जिल्ह्यात यलो अलर्ट Top 10 News : राज्यात अवकाळी पावसाने विश्रांती घेतली असून उन्हाचा चटका हळूहळू वाढू लागला आहे. आज पूर्व विदर्भातील चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईत सकाळी गारवा आणि दुपारी कडाक्याचं ऊन जाणवत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. सतत बदलणार तापमानामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांसमोर नवे संकट आणले आहे. अनेक जिल्ह्यातील गावांमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या दमदार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. विशेषतः मका, द्राक्ष या पिकाला मोठा फटका बसला असून शेतात उभे असलेले पीक आडवे पडल्याने शेतकरी हतबल झाला आहे. आधीच वाढत्या खर्चामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर या अवकाळी पावसाने आणखी संकट ओढवले आहे. देशातील 1 टक्के लोकांकडे 40 टक्के संपत्ती भारतातील आर्थिक विषमता दिवसेंदिवस तीव्र होत असल्याचं धक्कादायक चित्र ‘Wealth Tracker India 2026’ या अहवालातून समोर आलंय. Centre for Financial Accountability (CFA) च्या या अहवालानुसार, देशातील फक्त 1,688 अतिश्रीमंत व्यक्तींकडे सुमारे 166 लाख कोटी रुपयांची संपत्ती आहे, जी देशाच्या एकूण GDP च्या जवळपास 50 टक्के इतकी आहे. हा अहवाल ‘Tax the Top’ मोहिमेअंतर्गत 1 एप्रिल 2026 रोजी जाहीर करण्यात आला. यामध्ये देशातील संपत्तीचे वितरण अत्यंत असंतुलित असल्याचं स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे. अहवालानुसार, देशातील टॉप 1 टक्के लोकांकडे 40 टक्क्यांहून अधिक संपत्ती आहे. तर खालच्या 50 टक्के लोकांकडे एकूण उत्पन्नाच्या फक्त 15 टक्के हिस्सा आहे. यामुळे श्रीमंत अधिक श्रीमंत आणि गरीब अधिक गरीब होत असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे. एकीकडे देशाची अर्थव्यवस्था वाढत असली, तरी संपत्तीतील वाढती दरी ही गंभीर चिंता बनली आहे. श्रीमंत आणि गरीब यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी ठोस धोरणांची गरज असल्याचं या अहवालातून अधोरेखित झालंय. ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात दाखल केलेला महाभियोग प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेतृत्वात विरोधी पक्षांच्या खासदारांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांत महाभियोग नोटीस दिली होती. महाभियोग प्रस्ताव फेटाळल्यानं हा विरोधी पक्षांना मोठा झटका मानला जात आहे.मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील महाभियोग प्रस्ताव राज्यसभेच्या सभापतींनी फेटाळून लावला आहे. विरोधी पक्षांच्या खासदारांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्याची मागणी केली होती. मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवण्यासाठी तृणमूल काँग्रेसच्या नेतृत्वात विरोधी पक्षांच्या खासदारांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांत महाभियोग नोटीस दिली होती. मात्र, राज्यसभेच्या सभापतींनी ही नोटीस स्वीकारण्यास नकार दिला आहे.दरम्यान , मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव दाखल करण्याची ही देशातील पहिलीच वेळ आहे. एका रात्रीत इराणला संपवू शकतो अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधात पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत मोठं वक्तव्य केलंय. अमेरिका फक्त एका रात्रीत संपूर्ण इराणला उद्ध्वस्त करू शकते आणि ती रात्र कदाचित उद्याची रात्रही असू शकते, अशी थेट धमकी ट्रम्प यांनी दिलीय. त्यांच्या या वक्तव्यामुळे पश्चिम आशियातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जातीय. व्हाईट हाऊसमध्ये माध्यमांशी संवाद साधताना डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन सैन्याच्या मोठ्या रेस्क्यू ऑपरेशनचाही खुलासा केला. त्यांनी, इराणच्या हद्दीत कोसळलेल्या अमेरिकन पायलटला वाचवण्यासाठी आतापर्यंतचं सर्वात मोठं बचाव अभियान राबवण्यात आलं असल्याचं म्हटलंय.दरम्यान, इराणकडूनही तीव्र प्रतिक्रिया देण्यात आली आहे. देशाचे सर्वोच्च नेते मोजताबा खामेनी यांनी स्पष्ट केलं की, नेत्यांची हत्या झाली तरी इराण मागे हटणार नाही. डोनाल्ड ट्रम्प यांचे ताजे वक्तव्य आणि इराणकडून त्याला मिळालेलं उत्तर यामुळे दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढण्याची चिन्हं दिसत आहेत. इराणला शस्त्रसंधी अमान्य पश्चिम आशियातील संघर्ष आणखी भडकण्याची चिन्हे आहेत. अमेरिका आणि इराणला ४५ दिवसांच्या शस्त्रसंधीचा प्रस्ताव देण्यात आला होता. इराणने मात्र तो फेटाळून लावला आहे. ‘‘युद्धविराम करणे म्हणजे शत्रूंना नव्याने हल्ले करण्यासाठी लागणारी शक्ती जमवण्याची संधी देण्यासारखेच आहे. कोणताही शहाणा माणूस असे करणार नाही,’’ असे इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बगाई म्हणाले. तर इस्रायली विमानांनी इराणवर अक्षरशः आग ओकत दक्षिण पार्स वायू क्षेत्रावर हल्ला चढवला. हे जगातील सर्वांत मोठं वायू उत्पादन क्षेत्र म्हणून ओळखले जाते. अगदी कतारपर्यंत याचा विस्तार आहे. इराणकडून जॉर्डनमधील अमेरिकी तळांनाही लक्ष्य करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.इजिप्त, पाकिस्तान आणि तुर्कीये या देशांनी मध्यस्थी करत शस्त्रसंधीचा प्रस्ताव सादर केल्याने अवघ्या जगालाच सकारात्मक तोडग्याची अपेक्षा होती. सुरज चव्हाण होणार बाबा? बिग बॉस मराठी’ सीझन 5 चा विजेता सुरज चव्हाण पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पण यावेळी चर्चेचे कारण त्याचे कोणतेही नवीन गाणे किंवा सिनेमा नसून, त्याची पत्नी संजना चव्हाण हिची एक सोशल मीडिया पोस्ट आहे. संजनाने शेअर केलेल्या एका फोटोमुळे ती प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आले आहे. संजनाने नुकतेच आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिचे बेबी बंप दिसत आहे आणि पोस्टमध्ये तिने देवकी सिनेमातील गाणे देखील जोडले आहे. त्यामुळे खरंच संजना प्रेग्नेंट आहे की हा तिचा एआय आधारित फोटो आहे? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडलाय. विशेष म्हणजे यापूर्वी 17 मार्च रोजी देखील संजनाने अशीच एक सूचक पोस्ट शेअर केली होती. त्यावेळीही चाहत्यांनी तिचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली होती. आता पुन्हा एकदा तशाच प्रकारची पोस्ट आल्याने चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.