प्रचाराच्या तोफा आज थंडावणार राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा तोफा आज थंडावणार आहेत. आयोगाच्या नियमानुसार मतदानाच्या २४ तास अगोदर प्रचार थांबवावा लागतो. मात्र यंदा प्रचाराची वेळ वाढली आहे. त्यानुसार या निवडणुकांचा प्रचार आज रात्री 10 वाजता थांबणार आहे. रात्री १० वाजल्यापासून सभा, मोर्चे, ध्वनिक्षेपकाचा वापर, निवडणूक प्रचाराशी संबंधित जाहिरात प्रसिध्दी / प्रसारण या गोष्टींवर पूर्णपणे निर्बंध असतील. राज्यात भाजप विरुद्ध अजित पवार गट आणि शिंदेसेना असा सामना पहायला मिळत आहे. यासाठी फडणवीसांसह अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी देखील जोरदार प्रचार केला.दुसरीकडे काँग्रेस, शरद पवार गट, उद्धव सेना या विरोधी पक्षांचा प्रचार सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांच्या प्रचारासमोर फिका पडल्याचे दिसले. ======================== अनगर नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाची निवडणूक स्थगित अनगर नगरपंचायत अध्यक्षपदाची निवडणूक स्थगित करण्यात आलीय. आता सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार पुढील कार्यवाही होणार आहे. याबाबत जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आदेश जारी केलेत. अनगर नगरपंचायत अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर याच्या विरोधात राज्यभर या ठिकाणच्या दहशतीची मोठी चर्चा झाली होती. आता या निवडीला स्थगिती देण्यात आली असून सुधारित कार्यक्रमानुसारपुढील कार्यवाही होणार आहे. त्यामुळे अनगर नगरपंचायतीची निवडणूक कधी होईल, याबाबत आज सविस्तर स्पष्टता येईल. ———————- भाजप व निवडणूक आयोगाचे साटेलोटे – प्रणिती शिंदे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करताना दिसून येतायत. त्यातच काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केलीय. त्यांनी आम्ही निवडणूक काळात टिकलीचे पाकीट जरी वाटले तरी आमच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल होतो पण भाजप सत्तेचा दुरुपयोग करून मतदानाच्या आदल्या दिवशी बिहारमध्ये महिलांच्या खात्यावर पैसे जमा केले जातात तरी देखील निवडणूक आयोग याकडे दुर्लक्ष करत आहे. भाजप व निवडणूक आयोगाचे साटेलोटे असल्याचे टीका खा. प्रणिती शिंदे यांनी केले. ====================== शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर छापा नगरपालिका निवडणुकीमुळे सध्या शिंदे सेना आणि भाजप यांच्यातील वाद ठिकठिकाणी टोकाला जाताना दिसत आहे. अशातच सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर निवडणूक प्रक्रियेतील भरारी पथकाने छापा टाकला आहे. यावेळी कार्यालयाची झाडाझडती घेतल्याने शिंदे सेनेचे कार्यकर्ते मात्र संतप्त झाले आहेत. सांगोल्यात भाजप, शेकाप आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांच्या युतीने शहाजी बापूंना एकटे टाकले आहे. यातूनच अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत शहाजीबापूंनी सांगोल्यातून मोठी आघाडी घेण्याची तयारी सुरू केली आहे. त्यातच काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सांगोल्यात सभा झाली. या सभेत फडणवीस यांनी बापूंवर कोणतीही टीका केली नसली तरी शेकाप बरोबर झालेल्या युतीमुळे आपल्याला आनंद झाल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते. ===================== भाजपला मत म्हणजे विरोधकांना मत गरपालिकेच्या निवडणुकीवरुन सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. शिवसेनेचे मंत्री दीपक केसरकर यांनी भाजपवर टीका केली आहे. सावंतवाडी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला चार मराठी शब्द बोलता येत नाही, असे म्हणत केसरकर यांनी भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रध्दा सावंत भोसले यांना टोला लगावला. सावंतवाडी हे शहर माफियांच्या हातात जाऊ नये. भाजपला मत म्हणजे विरोधकांना मत असे दीपक केसरकर म्हणाले. नारायण राणे यांच्यासारख्या नेत्याचं भाजपनं ऐकल नाही असेही केरसकर म्हणाले. नारायण राणे यांच्या सोबत माझा संघर्ष झाला, मात्र तो संघर्ष विचारांचा होता. आता आम्ही एकत्र आहोत असेही केसरकर म्हणाले. ================= भाडेकरुंसाठी केंद्राचा मोठा निर्णय केंद्र सरकारनं घरभाडे नियम 2025 लागू केलाय. ज्याद्वारे देशातील रेंटल हाऊसिंग मार्केटला पारदर्शक आणि संघटित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यामुळे भाडेतत्त्वावर घर घेणं सोपं होऊन मनमानी पद्धतीनं घरभाडे वाढवणे, अधिक डिपॉझिट मागणे यासारख्या समस्यांचा सामना करावा लागणार नाही. नव्या आणि औपचारिक रचनेनुसार घरमालक आणि भाडेकरु यांना त्यांचा भाडेकरार ऑनलाईन नोंदणीकृत करावा लागेल. त्यातील नियमानुसार सुरक्षा अनामत रकमेची मर्यादा निश्चित केली जाईल. याशिवाय हे देखील स्पष्ट केलं जाईल की घरभाडे कधी वाढवता येईल आणि किती वाढवता येईल. या नियमामुळं बंगळुरु, हैदराबाद, मुंबई आणि पुण्यासारख्या शहरात भाडेकरुंना दिलासा मिळणार आहे. ====================== दोन बसच्या धडकेत ११ जणांचा जागीच मृत्यू तामिळनाडूतल्या कराईकुडी या ठिकाणी दोन बसेसची टक्कर होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात ११ जण ठार झाले. मृतांमध्ये आठ महिला, दोन पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. या घटनेत ३० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. वरिष्ठ जिल्हा पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार दोन बसेसची धडक इतकी जोरदार होती की ११ जणांचा जागीच मृत्यू झाला.या दोन बसेसची टक्कर नेमकी कशी झाली? नेमकं काय घडलं ते कारण अद्याप स्पष्ट नाही असं पोलिसांनी सांगितलंय. दरम्यान , दोन्ही बसमध्ये एकूण ५५ प्रवासी प्रवास करत होते. या अपघातात झालेल्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलंय . ================== आत्मघातकी हल्ल्याने पाकिस्तान हादरला पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील नोकुंडी भागात फ्रंटियर कॉर्प्स (एफसी) मुख्यालयाजवळ आत्मघातकी हल्ला झाला. एका प्रकल्पांशी संबंधित परदेशी तज्ञ, अभियंते आणि कर्मचाऱ्यांच्या कामासाठी आणि निवासासाठी बांधलेल्या कंपाऊंडवर हा हल्ला झाला. रविवारी रात्री उशिरा एका बलुच बंडखोर गटाने हा हल्ला केला. समोर आलेल्या माहितीनुसार बलुच बंडखोर गटाने प्रथम एफसी मुख्यालयाजवळील या संवेदनशील कंपाऊंडवर पाच मोठे स्फोट केले. त्या नंतर सुरक्षा दलांवर गोळीबार केला. बलुच लिबरेशन फ्रंट (बीएलएफ) ने आत्मघातकी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलीय. ================== म्हात्रेचं ‘बॅक-टू-बॅक’ शतक एकीकडे रांचीमध्ये विराट कोहलीने आपल्या शतकाने फॅन्सची मने जिंकली, तर दुसरीकडे लखनऊमध्ये 18 वर्षांच्या आयुष म्हात्रेने सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत धुमाकूळ घातला. म्हात्रेने सलग दुसरं शतक ठोकत सर्वांनाच थक्क केलं. केवळ 59 चेंडूत नाबाद 104 धावा करत त्याने आंध्रच्या गोलंदाजांना सळो कि पळो करून सोडलं. आयुष म्हात्रेने याआधी विदर्भविरुद्धही नाबाद शतक ठोकले होते. म्हणजे दोन सामन्यांत 214 धावा… आणि एकदाही बाद झाला नाही. आतापर्यंत 3 सामन्यांत 232 धावा ठोकत म्हात्रेने चालू हंगामातील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून आपली छाप सोडली आहे. त्याने आतापर्यंत 19 षटकार ठोकले आहेत. ====================================== ‘लग्नसंस्था जुनी झालीये…’ बॉलिवूडचे महानायक बिग बी यांच्या पत्नी दिग्गज अभिनेत्री जया बच्चन या नेहमी कोणत्या तरी कारणानं चर्चेत असतात, यावेळी देखील त्या एका पॉडकास्टमुळे चरचरीत आल्यात.’वी द वुमन’ या शोमध्ये बोलताना त्यांनी लग्नाविषयी त्यांचं मत मांडलं. पण हे मत फारसं कोणाला रुचलेलं नाही. कारण त्यांना लग्नासंबंधी एक प्रश्न विचारण्यात आला होता त्यावेळी त्यांनी लग्नसंस्था ही जुनी झालीये. असं उत्तर दिलं. त्या एवढंच बोलून थांबल्या नाहीत तर त्यांनी आपली नातं नव्यानं देखील लग्न करून नये असा सल्ला देखील दिला आहे. लग्नापूर्वी मुलं होण्याबद्दलही जया बच्चन यांनी, “प्रेम आवश्यक आहे, तेच महत्त्वाचं आहे, दुसरं काही नाही…”असं म्हणत उत्तर दिलं. ================