1) शेतकऱ्यांना ३० जूनपर्यंत कर्जमाफी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना ३० जून २०२६ पूर्वी कर्जमाफीचा निर्णय घेणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. कर्जमाफीच्या अनुषंगाने एक समिती आम्ही गठीत केली आहे. एप्रिलपर्यंत या समितीने शिफारस करायची आहेत. त्या आधारावर पुढची प्रक्रिया करून तीन महिन्यात म्हणजे ३० जून २०२६ पर्यंत कर्जमाफी करण्यात येईल असे फडणवीस यांनी जाहीर केले. मुख्यमंत्री म्हणाले, आमच्या जाहीरनाम्यात कर्जमाफीचा निर्णय होता. पण ही तात्कालिक बाब आहे. दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. कर्जाची वसुली जूनपर्यंत होते, त्यामुळे जूनपर्यंत मुदत आहे. याबाबत आंदोलकांशी झालेल्या सकारात्मक चर्चा झाली असून या भूमिकेशी सर्व नेत्यांनी सहमती दर्शवली आहे. अन्य विषयांवर पुढच्या आठवड्यात बैठक घेणार आहे. ===================== 2) संजय राऊतांचा राजकारणातून ब्रेक शिवसेनेची धडाडती तोफ म्हणून ओळखले जाणारे खासदार ‘संजय राऊत’ यांना गंभीर आजार झाल्याची माहिती समोर आली आहे. स्वतः संजय राऊत यांनी याबाबत माहिती दिली आहे. यामुळे संजय राऊत यांनी पुढील दोन महिने सार्वजनिक जीवनापासून पूर्णपणे दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महानगरपालिका तसेच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक राहिले असताना संजय राऊत यांनी राजकारणापासून ब्रेक घेत आहे. दरम्यान, राऊत यांनी राजकारणापासून ब्रेक घेणे हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. संजय राऊत यांनी काहीवेळापूर्वीच आपल्या ट्विटर हँडलवर एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. यामध्ये संजय राऊत यांनी प्रकृतीची गंभीर समस्या उद्भवल्याचे नमूद केले आहे ===================== 3) राज्यात पुढील ५ दिवस तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता राज्यातील काही भागांमध्ये आज ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पावसाच्या सरी पडतील, असा अंदाज आहे. तर छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नाशिक आणि नंदूरबार तसेच रायगड, पालघर आणि ठाणे जिल्ह्यांमध्येही हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे. याशिवाय जालना, परभणी, हिंगोली, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्येही ढगाळ हवामानासह काही ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. ======================= 4) Pimpri News : मुलाच्या लग्नापूर्वीच आईवर काळाचा घाला; सुवासिनींचे जेवण राहिले अर्धवटच पिंपरी : अवघे तीन दिवसांवर मुलाचे लग्न. घरात लगीनघाई, पाहुण्यांची ये-जा, खरेदीची लगबग सुरू होती. पण आनंदात न्हाऊन निघालेल्या घरावर काळाने असा घाला घातला की सर्व काही क्षणात संपले. चिंचवड येथील मोहननगर परिसरात शुक्रवारी सकाळी पाण्याच्या टाकीत बुडून एका आईचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. आशा संजय गवळी (वय ५२, रा. मोहननगर, चिंचवड) असे मृत्यूमुखी पडलेलया महिलेचे नाव असून, त्यांच्या मृत्यूने संपूर्ण परिसर शोकाकुल झाला आहे. गवळी कुटुंबातील छोट्या मुलाचे लग्न येत्या ४ नोव्हेंबर रोजी कोल्हापूर येथे होणार होते. ३ नोव्हेंबर रोजी साखरपुड्याचा कार्यक्रम होणार होता. घरात लग्नाचे धार्मिक विधी सुरू होते. सगळी मंडळी तयारीत गुंतलेली. लग्नासाठी कपडे, दागिने, मानपानाचे साहित्य सर्व काही तयार होते. दरम्यान, शुक्रवारी देवीचा वार असल्याने घरात ‘सुवासिनींचे जेवण’ ठेवण्यात आले होते. स्वयंपाकाची तयारी सुरू असतानाच पाण्याची टंचाई जाणवली. त्यामुळे आशा या सोसायटीच्या पार्किंगमधील जमिनीखालच्या टाकीतून पाणी काढण्यासाठी गेल्या. त्यांनी झाकण उघडून बादली टाकली, मात्र पाणी खोल असल्याने बादलीत पाणी घेताना त्यांचा तोल गेला आणि त्या टाकीत पडल्या अन् त्यांचा मृत्यू झाला. ======================= 5) “देशसेवा करण्यात मोठा आनंद आहे…” – पंतप्रधान मोदी पंतप्रधान मोदी म्हणाले, देशाची एकता कमकुवत करणाऱ्या कोणत्याही गोष्टीपासून प्रत्येक नागरिकाने दूर राहिले पाहिजे. हे एक राष्ट्रीय कर्तव्य आहे, सरदार साहेबांना खरी श्रद्धांजली आहे. आज देशाला याचीच गरज आहे. हाच प्रत्येक भारतीयासाठी एकता दिनाचा संदेश आणि संकल्प आहे. काॅंग्रेसनेच खुद्द पटेलांबद्दल अनेक चुकीचे विचार रुजवले होते. देशसेवा करण्यात मोठा आनंद… पंतप्रधान मोदी म्हणाले, सरदार पटेल एकदा म्हणाले होते की देशाची सेवा करण्यापेक्षा मोठा आनंद नाही. माझाही असा विश्वास आहे की देशाची सेवा करण्यासाठी स्वतःला समर्पित करण्यापेक्षा मोठा आनंद नाही. आज देशात विक्रमी संख्येने महामार्ग आणि द्रुतगती महामार्ग बांधले जात आहेत. वंदे भारत आणि नमो भारत सारख्या गाड्या भारतीय रेल्वेचे रूपांतर करत आहेत. आता लहान शहरे देखील विमानतळ सुविधांनी जोडली जात आहेत. ही आधुनिक पायाभूत सुविधा जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलत आहे. त्यामुळे पूर्व आणि पश्चिम, उत्तर आणि दक्षिणेतील अंतर देखील कमी झाले आहे. याचे श्रेयशा दूरदृष्टीच्या नेत्यांकडे जाते. ===================== 6) “दाऊद दहशतवादीच, मी विकी गोस्वामीबद्दल बोलत होते” ; ममता कुलकर्णीचा ‘यु-टर्न ‘ अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवरील विधानामुळे प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णी सध्या चर्चेत आहे. ममता कुलकर्णीने,”दाऊदने मुंबई बॉम्बस्फोट घडवले नाहीत आणि तो दहशतवादी नाही” असे खळबळजनक विधान केले होते. पण आता तिने या विधानावरून यू-टर्न घेतला आहे. माध्यमांशी बोलताना ममता यांनी स्पष्ट केले की, माझ्या विधानाचा गैरसमज झाला आहे. “मी तिथे दाऊद इब्राहिमबद्दल नाही तर विक्की गोस्वामीबद्दल बोलत होते. दाऊद खरोखरच दहशतवादी होता.” मी कधीही दाऊदला भेटली नाही. “सध्या, माझा राजकारणाशी किंवा चित्रपट उद्योगाशी कोणताही संबंध नाही. मी अध्यात्मात पूर्णपणे बुडलेली आहे. मी सनातन धर्माची अनुयायी आहे. कोणत्याही प्रकारच्या राष्ट्रविरोधी घटकाशी संबंध ठेवणे माझ्यासाठी अशक्य आहे,” असं ममता कुलकर्णी यांनी सांगितले. ===================== 7) माझं वैयक्तिक मत आहे कि RSS वर बंदी घालण्यात यावी : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशातील बहुतेक कायदा आणि सुव्यवस्थेच्या समस्यांसाठी जबाबदार असल्याने त्यावर पुन्हा बंदी घालण्यात यावी तसेच हे माझे वैयक्तिक मत आहे,” असेही त्यांनी सांगितले. त्यासोबतच “देशातील बहुतेक कायदा आणि सुव्यवस्थेच्या समस्यांसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप जबाबदार आहेत” असा दावा खरगे यांनी केला. त्यांच्या या विधानाने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या विधानाबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनीराष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी मत व्यक्त केले. ===================== 8) सोन्याच्या किमतीत आज किंचित वाढ झाली Gold Price। भारतात सोन्याच्या किमतीत घट झाली. त्या तुलनेत आज किमतीत किंचित वाढ झाली आहे. भारतात २४ कॅरेट सोन्याची किंमत गुरुवार, ३० ऑक्टोबर रोजी प्रति ग्रॅम ₹१२,१४८ होती, जी आज ₹१२,२६८ प्रति ग्रॅम झाली आहे. त्याचप्रमाणे, २२ कॅरेट सोन्याची किंमत, जी काल प्रति ग्रॅम ₹११,१३५ होती, ती आज ₹११० ने वाढून ₹११,२४५ झाली आहे. १८ कॅरेट सोन्याची किंमत देखील प्रति ग्रॅम ₹९० ने वाढून ₹९,२०१ प्रति ग्रॅम झाली आहे. या वर्षी आतापर्यंत सोन्याची किंमत ५०% पेक्षा जास्त वाढली आहे. ===================== 9) ‘भूल भुलैया 4’मध्ये अनन्या पांडे साकारणार ‘मंजुलिका’ बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनने ‘भूल भुलैया 2’ आणि ‘भूल भुलैया 3’मध्ये जबरदस्त कामगिरी करून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता चाहत्यांमध्ये ‘भूल भुलैया 4’ची मोठी उत्सुकता आहे. मात्र या वेळी विद्या बालन आणि तब्बू यांची या फ्रँचायझीतून एक्झिट होण्याची चर्चा रंगली आहे. कारण मेकर्सना ‘नवी मंजुलिका’ मिळाल्याचे बोलले जात आहे आणि ती म्हणजे अभिनेत्री अनन्या पांडे! अनन्या पांडेने ३० ऑक्टोबर रोजी आपला २७ वा वाढदिवस साजरा केला. तिने आपल्या कुटुंबीय आणि मित्रांसोबतचा सेलिब्रेशनचा एक फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केला. पोस्टमध्ये अनन्याने लिहिलं, “हा वाढदिवस खूप खास होता, सर्वांच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद.” या पोस्टवर कार्तिक आर्यननेही एक खास व्हिडिओ शेअर करत अनन्याला शुभेच्छा दिल्या. हा व्हिडिओ त्यांच्या आगामी चित्रपट ‘तू मेरी मैं तेरा’ च्या शूटिंगदरम्यानचा बिहाइंड-द-सीन होता. ===================== 10) ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताचा ४ विकेट्सनी उडवला धुव्वा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ४ विकेट्सनी बाजी मारली. मेलबर्न येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना अभिषेक शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर १८.४ षटकांत सर्वबाद १२५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने मिचेल मार्शच्या शानदार खेळीच्या जोरावर १३.२ षटकांत ६ गडी गमावून विजयावर शिक्कामोर्तब केला. त्याचबरोबर मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. =====================