Top 10 News: 1. अखेर चाकणकरांनी दिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली असून रुपाली चाकणकर यांनी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे सुपूर्द केला आहे. रुपाली चाकणकर यांनी सोशल मीडियावर राजीनाम्याबाबत एक पोस्ट केली आहे. ज्यात त्यांनी म्हटलं आहे कि, खरात प्रकरणाबाबत पहिल्या दिवशीच मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. त्याच्या आर्थिक व्यवहारात, त्याच्या गैरकृत्यात दुरान्वये संबंध नाही, आजही तीच स्पष्ट व ठाम भूमिका आहे. तपासादरम्यान या सर्व बाबी निष्पन्न होतीलच. खोटे, असत्य व कुठलाही पुरावा नसताना जे आरोप माध्यमांमधून होत आहेत, ते वेदनादायक आहे. सत्य प्रखरतेने सिद्ध होईलच, असे चाकणकर यांनी एक्सवर म्हटले आहे. 2. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा राज्य सरकारने पुरग्रस्त बाधित पशुपालकांना दिलासा दिला आहे. जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरग्रस्त भागांमध्ये पशुधनाचे मोठे नुकसान होऊन अनेक जनावरे मृत्युमुखी पडली किंवा वाहून गेली. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने बाधित पशुपालकांसाठी विशेष मदत पॅकेज जाहीर केले आहे. राज्य शासनाने राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीच्या निकषांमध्ये शिथिलता आणून, सर्व मृत किंवा बेपत्ता पशुधनासाठी तसेच गोठ्यांच्या नुकसानीसाठी सुधारित दराने मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, मृत पशुधनासाठी शवविच्छेदन अहवाल, बेपत्ता प्रकरणात पंचनाम्याची प्रत, लाभार्थ्यांचा आधार व बँक खात्याची माहिती जोडणे बंधनकारक असेल. 3. गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबाबत मोठा दावा मंत्री पंकजा मुंडे यांनी एका कार्यक्रमादरम्यान “गोपीनाथ मुंडे यांचे नाव जगाला विसरू देणार नाही, मी अशी शपथ चितेवर घेतली आहे.” यावरून आता करुणा मुंडे यांनी पंकजा मुंडेंना थेट सवाल केला आहे. करुणा मुंडे म्हणाल्या, “पंकजाताई, तुम्ही कधीपर्यंत गोपीनाथ मुंडेंच्या नावावर भावूक विधान करून राजकारण करणार आहात? तुम्हाला जर मुंडे साहेबांना न्याय द्यायचा असेल, तर तुम्ही मागणी करा की मुंडे साहेबांचा एक्सीडेंट होता की मर्डर होता? घातपात होता की अपघात? या गोष्टीसाठी तुम्ही कधी CBI किंवा SIT चौकशीची मागणी केली का?” करुणा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबाबत गंभीर दावा केला. त्या म्हणाल्या, “मला सर्व गोष्टी माहित आहेत. गोपीनाथ मुंडे साहेबांचा घातपात झाला होता. मी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना चौकशीसाठी निवेदन देणार आहे. मी धनंजय मुंडे यांची बायको होते. आमच्या बेडरूममध्ये धनंजय मुंडे यांनी राजकारण केले आहे. मला सर्व गोष्टी माहित असल्याचेही करुणा मुंडे म्हणाल्या. Gopinath Munde 4. सर्वसामान्यांना दिलासा! वीज बिलाचा भार होणार हलका ऐन उन्हाळ्यात वीज दरात कपातीचा निर्णय वीज कंपन्यांनी घेतल्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यभरात 1 एप्रिलपासून नवीन दर लागू होणार आहे. महावितरणने पाच वर्षात वीजदर कपातीसाठी मांडलेला प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे. घरगुती, औद्योगिक, वाणिज्यिक अशा सर्व प्रवर्गातील ग्राहकांसाठीचे वीजदर 2030 पर्यंत टप्प्याटप्प्याने दरवर्षी कमी होणार आहेत. कोणत्याही प्रवर्गात वीजदर वाढणार नाहीत. नवीन दरपत्रकानुसार सर्वच युनिट स्लॅबमध्ये कपात करण्यात आली. महावितरणच्या 2025-26 ते 2029-30 या पाच आर्थिक वर्षांच्या बहुवार्षिक वीजदर याचिकेवर महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने आपला आदेश प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार महावितरण, बेस्ट, अदानी आणि टाटा पॉवर या प्रमुख वीज कंपन्यांनी सादर केलेल्या प्रस्तावाला राज्य वीज नियामक आयोगाने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे घरगुती वीज ग्राहकांच्या खिशावरील भार कमी होणार आहे. Top 10 News 5. गॅस टंचाई सांगत जादा पैसे उकळणे हॉटेल चालकांना पडणार महागात गॅस टंचाईच्या काळात उपाहारगृह चालकांनी ग्राहकांकडून अतिरिक्त पैसे आकारण्यास सुरुवात केली आहे. काही उपाहारगृह चालकांनी याबाबतचा उल्लेख बिलात करण्यास सुरुवात केली. याबाबत तक्रारी आल्यानंतर नवी दिल्लीतील केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडून उपाहारगृहाचालकांना सूचना देण्यात आल्या आहेत. ग्राहकांकडून जादा पैसे आकारू नयेत, अशा सूचना केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडून देण्यात आल्या आहेत. ‘सीसीपीए’कडून मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहे. कोणत्याही हॉटेल, रेस्टाॅरंट, बार चालकांनी गॅस टंचाईचे कारण सांगून ग्राहकांकडून जादा पैसे घेऊ नये. उपाहारगृहाच्या आहारतालिकेत (मेन्यू कार्ड) असा उल्लेख करणे ही अनुचित व्यापार पद्धती मानली जाईल, अशा सूचना सीसीपीएने देशभरातील उपाहारगृह चालकांना दिल्या आहेत. 6. देशात लॉकडाऊन नाही; पंतप्रधान मोदींकडून स्पष्ट पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर देशात लॉकडाऊन लागू करण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच चुकीची माहिती आणि अफवा पसरू नयेत, यासाठी अचूक व विश्वासार्ह माहितीचा प्रसार करण्यावर भर देण्याचे निर्देश देण्यात आले. याशिवाय पंतप्रधानांनी ‘टीम इंडिया’च्या भावनेतून केंद्र आणि राज्यांनी समन्वयाने काम केल्यास देश या परिस्थितीला यशस्वीपणे सामोरे जाईल, असा विश्वास व्यक्त केला. बैठकीत राज्यांनी पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरेसा साठा असल्याची माहिती दिली. Top 10 News केंद्र सरकारने कमर्शियल एलपीजीचे वाटप २० टक्क्यांनी वाढवून ते पूर्वीच्या मागणीच्या ७० टक्क्यांपर्यंत नेले आहे. तसेच राज्यांनी पुरवठा साखळी सुरळीत ठेवावी, तसेच साठेबाजी आणि नफेखोरीविरोधात कठोर कारवाई करावी, असे निर्देश पंतप्रधानांनी दिले. pm modi 7. पंतप्रधान होताच बालेन शाहांची मोठी कारवाई नेपाळचे नवनियुक्त पंतप्रधान बालेन शाह पदभार स्वीकारताच अॅक्शन मोडवर पाहायला मिळाले. गेल्या वर्षी ‘Gen-Z’च्या आंदोलनादरम्यान झालेल्या विद्यार्थ्यांच्या हत्याप्रकरणी माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली आणि माजी गृहमंत्री रमेश लेखक यांना शनिवारी पहाटे अटक करण्यात आली. केपी शर्मा ओली यांना शनिवारी सकाळी भक्तपूर येथील ‘गुंडू’ भागातील त्यांच्या निवासस्थानातून त्यांना ताब्यात घेण्यात आले. तर रमेश लेखक यांना पहाटे ५ च्या सुमारास भक्तपूरच्या ‘सूर्यविनायक’ येथील त्यांच्या घरातून त्यांना अटक करण्यात आली. तपास आयोगाच्या अहवालानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. 8. ‘लग्नानंतर पुरूषने लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणं गुन्हा नाही’ अलाहाबाद हायकोर्टाने लिव्ह-इन रिलेशनशिपबाबत सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. एखादा विवाहित पुरुष दुसऱ्या प्रौढ महिलेसोबत संमतीनेच लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असेल, तर तो कायद्यानुसार गुन्हा ठरत नाही, जोपर्यंत कोणत्याही कायद्याचं उल्लंघन होत नाही, तोपर्यंत अशा रिलेशनला गुन्हा म्हटलं जाऊ शकत नाही, केवळ समाजाच्या दृष्टिकोनामुळे न्यायालय तिला चुकीचं ठरवू शकत नाही, असे निरीक्षण अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका प्रकरणात नोंदवले. विवाहित पुरुष ज्या महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतो, त्या महिलेच्या कुटुंबीयांकडून धमक्या दिल्या जात असून, संरक्षण देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले. संबंधित महिलेने आपल्या कुटुंबाकडून ‘ऑनर किलिंग’ची भीती व्यक्त करत संरक्षणाची मागणी केली होती. याप्रकरणी आता न्यायालयाने महिलेच्या कुटुंबीयांना त्यांच्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ न करण्याची तंबी देत कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. सोलापुरात रंगणार ३५० महिला मल्लांचा महासंग्राम 9. सोलापूरनगरीत रंगणार महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा महासंग्राम स्व. सिद्धाराम साखरे यांच्या स्मरणार्थ निर्झरा केअर फाऊंडेशन आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चौथी वरिष्ठ गट महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा २८ मार्चपासून सुरू होत आहे. सोलापूरच्या सिद्धेश्वर पेठ परिसरातील हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर ही स्पर्धा रंगणार असून, ४२ जिल्ह्यांतील ३५० हून अधिक महिला कुस्तीपटू यात सहभागी होणार आहेत. Top 10 News यंदाच्या महिला महाराष्ट्र केसरी विजेतीला मानाची चांदीची गदा आणि ‘किया सोनेट’ ही आलिशान कार देऊन गौरवण्यात येणार आहे. उपविजेत्या मल्लाला ‘बुलेट’ दुचाकी, तर प्रत्येक वजनी गटातील सुवर्णपदक विजेतीला ५१ हजार रुपयांचे रोख बक्षीस मिळणार आहे. ट्रिपल महाराष्ट्र केसरी भाग्यश्री फंडच्या अनुपस्थितीत, अमृता पुजारी, अपेक्षा पाटील, सृष्टी भोसले आणि वाइल्ड कार्ड प्रवेश मिळालेली प्रतीक्षा बागडी यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळेल. 10. ‘धुरंधर २’नंतर सारा अर्जुनला मिळाली बिग बजेट प्रोजेक्टची संधी? आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या चित्रपटामुळे अभिनेत्री सारा अर्जुनला मोठी लोकप्रियता मिळाली. एकीकडे धुरंधर २ चं यश अनुभवत असताना सारा अर्जुनला मोठी संधी मिळाली आहे .मिळालेल्या माहितीनुसार, साराला आणखी एक बिग बजेट प्रोजेक्टची संधी मिळाली आहे. सारा अर्जुनला झोया अख्तरच्या आगामी चित्रपटाची ऑफर मिळाली आहे. सारा आता झोया अख्तरच्या ‘टायगर बेबी’ बॅनरखाली बनणाऱ्या चित्रपटात दिसणार असल्याचं बोललं जातंय. या चित्रपटात सारा अर्जुन आणि ईशान खट्टरसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. अर्जुन वरैन सिंग या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृतरित्या माहिती देण्यात आलेली नाही. Top 10 News हेही वाचा: Pune Temperature : पुणेकर घामाघूम! पारा ४० पार जाताच निसर्गाचा ‘हा’ मोठा ट्विस्ट; पुढचे ४८ तास महत्त्वाचे