राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत मोठी अपडेट Top 10 news: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली होती. अशातच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेने जोर धरला होता त्या चर्चा अजूनही थांबत नाहीयेत. दरम्यान , विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून आता शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी मोठे भाष्य केले आहे.बारामतीत आम्ही चार पाच जण सुनेत्रा पवारांना भेटलो आणि त्यांना म्हटलं की, काही मदत लागली तर सांगा. कोणताही किंतू मनात बाळगू नका. विलीनीकरणाची चर्चा अजित पवारांसोबत सुरु होती तेव्हादेखील सुनेत्रा वहिनींसोबत एकदोन वेळा भेट झाली होती. सुनेत्रा वाहिनी किंवा पार्थ पवार यांच्यासाठी आम्ही सपोर्टिव्ह आहोत. त्यांच्यासाठी अडथळे निर्माण करण्याची आमची इच्छा नाही, असे जयंत पाटील यांनी म्हटले. यावर आता अजितदादा गटाचे नेते काही प्रतिक्रिया देणार का, हे बघावे लागेल. सध्याच्या चर्चेत आणि राजकारणात पडायचं नाही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक काळात वळसे पाटलांची तब्येत नाजुक असल्याने ते डॉक्टरांच्या सल्ल्याने मुंबईत होते. त्यामुळे मतदारसंघात वळसे पाटील फारच आजारी असल्याची चर्चा होती. त्यावर वळसे पाटलांनी स्पष्टीकरण दिलं. मला काहीही झालेलं नाही, मी भक्कम आहे. फक्त अजितदादा गेल्यानं, मला भावना आवरत नाहीत असं सांगताना माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील भावुक झाल्याचं दिसून आलं. सध्या सुरु असलेल्या राजकीय चर्चेत जायचं नाही अन् त्या चर्चांमध्ये पडायचंही नाही असं स्पष्ट करताना दिलीप वळसे पाटलांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर सुरु असलेल्या राजकारणावर काही बोलणार नसल्याचं अप्रत्यक्षपणे स्पष्ट केलं. हर्षवर्धन सपकाळ यांच्या अडचणीत वाढ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुण्यातील पर्वती पोलीस ठाण्यात हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात भाजपकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनी फिर्याद दिली. गुन्हा दाखल झाल्याने टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना करणं भोवल्याचं दिसत आहे. समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य करणे आणि दंगल निर्माण होईल अशी परिस्थिती करणारे वक्तव्य केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. देवेंद्र फडणवीसांनी सपकाळांना ठणकावलं टिपू सुलतानच्या फोटोवरून राज्यातील राजकराणातील नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध पेटलंय. टिपू सुलतानला शिवरायाच्या समकक्ष पाहायला पाहिजे, असं म्हणणाऱ्या हर्षवर्धन सपकाळ यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलेच सुनावले आहे. मालेगाव महानगरपालिकेचे नवनियुक्त उपमहापौर शान-ए-हिंद निहाल अहमद यांनी आपल्या दालनात टिपू सुलतानचा फोटो लावला होता. त्यानंतर वाद निर्माण झाला होता. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ज्याप्रकारे टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांची केली, या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. त्यांना लाज वाटली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांच्या विरोधात लढाई करून स्वराज्याची निर्मिती केली. तर दुसरीकडे हजारो हिंदूंची कत्तल करणाऱ्या टिपू सुलतान आहे. या दोघांना एकसमान आदर दिला जावा, अशी काँग्रेसची मागणी असेल, तर मतांच्या लांगूलचालनासाठी या लोकांनी कितीही बूट चाटले तरी महाराष्ट्र आणि देश अशा गोष्टी सहन करून घेणार नाही,” असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. देवाभाऊ म्हणजे कामधेनू -धनंजय मुंडे Top 10 news: परळीतील महापशुधन एक्सपोच्या निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परळीत आले होते. याच व्यासपीठावर पंकजा मुंडेही उपस्थित होत्या. त्यावेळी भाषण करत असताना धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणीस यांचा उल्लेख कामधेनू असा केला. देवाभाऊ म्हणजे कामधेनू आहेत, त्यांना आमच्या मनातील इच्छा माहीत आहेत अशा शब्दात धनंजय मुंडेंनी बीडमधल्या कार्यक्रमात आपल्या भावना मांडल्या. त्यांना आपल्या मनातील इच्छा माहीत असल्याने जास्त बोलू नको असा निरोप मुख्यमंत्र्यांनी दिल्याची पुष्टीही धनंजय मुंडेंनी जोडली. विशेष म्हणजे धनंजय मुंडेंनी हे वक्तव्य केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या डोक्यात टपली मारली. त्यामुळे मुंडेंच्या या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण आलं आहे. मुलुंड अपघात प्रकरणी पाच अधिकाऱ्यांना अटक अन् कंपनीवर गुन्हा मुलुंड मेट्रोचा स्लॅब पडून झालेल्या अपघात प्रकरणानंतर सरकार अॅक्शन मोडवर आले असून आतापर्यंत ५ जणांना अटक करण्यात आलीय. यासह मिलन रोड बिल्डटेक या रिलायन्स अस्तालदी कंपनीच्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. अवधुत इनामदार हे डीबी हिल एलबीजी कंपनीशी सबंधित असल्याची माहिती आहे.मुलुंड दुर्घटनेला जबाबदार धरत एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सत्यजीत साळवे यांचं निलंबन करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेत. मेट्रो ब्रीज मार्गाचे सेफ्टी आणि स्ट्रक्चरल ऑडिट करावं, असे निर्देशही शिंदेंनी दिले आहेत. मेट्रो मार्गाचं बांधकाम करणाऱ्या लुई बर्गर कंपनीला एक कोटींचा दंड तर अपघाताला जबाबदार असणाऱ्या मिलन इंफ्रा कंपनीला पाच कोटींचा दंड ठोठावण्यात आलाय. महाशिवरात्रीचा उत्साह, मंदिरांमध्ये शिवभक्तांची गर्दी आज देशभरात महाशिवरात्रीचा पवित्र सण मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पार पडत आहे. भगवान शंकर आणि माता पार्वतीच्या विवाहाचा दिवस म्हणून महाशिवरात्रीचा सण साजरा होतो. हिंदू धर्मात महाशिवरात्रीच्या व्रताला अत्यंत पवित्र आणि महत्त्वपूर्ण मानले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी लाखो भक्त कडक व्रत करून महादेवाची पूजा-आराधना करतात. आज सकाळपासूनच राज्यभरातील मंदिरे गर्दीने फुलून गेली आहेत. राज्यातील बीड, त्र्यंबकेश्वर, कुणकेश्वर यासह अनेक ठिकाणच्या शंकराच्या मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. डोंबिवलीत पहाटे भीषण आग, 29 दुचाकी जळून खाक डोंबिवली पूर्वेतील चेडा नगर परिसरात पहाटे भीषण आग लागल्याची घटना घडली. रविकिरण सोसायटीतील राज अपार्टमेंट, जय भारत स्कूलजवळील बेसमेंट पार्किंगमध्ये पहाटे अचानक आग लागली. या आगीत पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एकूण 29 दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्या. आग लागल्यानंतर काही मिनिटांतच धुराचा प्रचंड लोट इमारतीत पसरला. यामुळे झोपेत असलेले रहिवासी घाबरून उठले आणि भीतीच्या वातावरणात इमारतीबाहेर धाव घेतली. आगीचा भडका उडाल्याने पाच जण किरकोळ जखमी झाले असून, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळते.घटनेची माहिती मिळताच कल्याण-डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत अग्निशामक दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या पथकाने काही वेळातच आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत बेसमेंटमधील बहुतेक दुचाकींचे मोठे नुकसान झाले होते. आग नेमकी कशामुळे लागली, याबाबत अद्याप स्पष्ट कारण समोर आलेले नाही. SIR द्वारे नागरिकत्व हिरावण्याचा प्रयत्न Top 10 news: ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) च्या ६८ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित एका विशाल जनसभेला संबोधित करताना खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्र सरकार आणि जातीय शक्तींवर तीव्र हल्ला चढवला. बिहारमधील आमदार आणि महाराष्ट्रातील नवनिर्वाचित नागरी संस्थांच्या उपस्थितीत ओवैसी यांनी एसआयआर सोशल इम्पॅक्ट रेकॉर्ड/सर्वेक्षणाबाबत एक नवीन आणि खळबळजनक दावा केला. त्यांनी आरोप केला की भाजप आता NRC आणि NPR ऐवजी SIR द्वारे नागरिकांचे नागरिकत्व हिरावून घेण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. त्यामुळे आता त्यांच्या या दाव्यामुळे नवीन वाद निर्माण होऊ शकतो. तारिक रहमान १७ फेब्रुवारीला घेणार पंतप्रधानपदाची शपथ १७ फेब्रुवारी रोजी ढाका एका मोठ्या राजकीय क्षणाचे साक्षीदार होणार आहे. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे अध्यक्ष तारिक रहमान देशाचे पुढचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. या शपथविधीमुळे बीएनपीचे औपचारिकपणे सत्तेत पुनरागमन होईल. हा समारंभ बांगलादेश संसदेच्या दक्षिणेकडील प्रांगणात होण्याची अपेक्षा आहे. दिवसाची सुरुवात नवनिर्वाचित खासदारांच्या शपथविधीने होईल. त्यानंतर नवीन पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल. तारिक रहमान यांना मुख्य निवडणूक आयुक्त एएमएम नासिर उद्दीन शपथ देतील. सार्वत्रिक निवडणुकांनंतर संवैधानिक प्रक्रियेनुसार सत्तांतर होईल. संपूर्ण दक्षिण आशियामध्ये त्यावर बारकाईने लक्ष ठेवले जाण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.