सर्व माजी पंतप्रधानांची दखल घेतली

नेहरू केंद्रात उभे राहणार प्रधानमंत्री संग्रहालय
नवी दिल्ली – एनडीए सरकारने देशातील सर्वच माजी पंतप्रधानांनी देशाच्या विकासात दिलेल्या योगदानाची दखल घेऊन त्यांचे कार्य लोकांपुढे आणण्याचा प्रयत्न हाती घेतला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. आज भारतीय जनता पक्ष खासदारांच्या बैठकीत बोलताना त्यांनी ही माहिती दिली. त्यांनी म्हटले आहे की, राजधानीत प्रधानमंत्री संग्रहालय उभारले जात असून त्याचे उद्घाटन 14 एप्रिल रोजी होणार आहे.
दिल्लीत ज्या ठिकाणी नेहरू केंद्र आहे त्याचेच रूपांतर आता प्रधानमंत्री संग्रहालयात करण्यात आले आहे. मोदी यांनी म्हटले आहे की केवळ आमच्याच सरकारने देशातील माजी पंतप्रधानांच्या योगदानाची दखल घेण्यासाठी पावले उचलली आहेत. या संग्रहालयाचे उद्घाटन आंबेडकर यांच्या जयंती निमित्त होणार आहे.
यंदा डॉ. आंबेडकर यांची जन्मशताब्दी साजरी होत आहे. या निमित्त 6 एप्रिल ते 14 एप्रिल या अवधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याची माहितीही यावेळी देण्यात आली. आंबेडकर सेंटरमध्ये भाजपच्या संसदीय पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीला पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा, अमित शहा, राजनाथ सिंह, आदी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान, भाजप खासदारांनी पंतप्रधान गरीब कल्याण योजना आणखी सहा महिन्यांनी वाढवल्याबद्दल पंतप्रधानांचे अभिनंदन आणि आभार मानण्याचा ठरावही मंजूर केला. केंद्र सरकारने शनिवारी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना आणखी सहा महिने वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सप्टेंबरपर्यंत प्रत्येक लाभार्थींना या योजनेत 5 किलो मोफत रेशन दिले जाणार आहे. अन्न सुरक्षा योजनेत सवलतीच्या दराचे पैसे मोफत योजनेत भरावे लागणार नाहीत.

