मोठी अपडेट ! 2 हजारांच्या नोटा जमा करण्याचा उद्या शेवटचा दिवस.. 87 टक्के नोटा आल्या परत; RBI गव्हर्नर दास यांनी दिली महत्वाची माहिती

मुंबई – रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी शुक्रवारी सांगितले की, 2,000 रुपयांच्या (2000 note) नोटांपैकी 87 टक्के नोटा बॅंकांमध्ये जमा करण्यात आल्या आहेत. देशात दोन हजारांच्या एकूण 3 लाख 56 हजार कोटी मुल्याच्या नोटा चलनात होत्या.त्यापैकी 3 लाख 44 हजार कोटी रूपये मुल्याच्या दोन हजाराच्या नोटा आत्तापर्यंत परत आल्या असल्या तरी अजून 12 हजार कोटी रूपयांच्या नोटा अद्याप परत आलेल्या नाहींत असे त्यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. आरबीआयने या नोटा बदलून देण्याची मुदत एक आठवड्याने वाढवली आहे. (RBI)
महागाईच्या संबंधात बोलताना गव्हर्नर दास म्हणाले की महागाईचा दर हा चार टक्क्यांपेक्षा अधिक असता कामा नये यासाठी आम्ही आग्रही आहोत. आणि जोपर्यंत हा दर कमी होत नाही तो पर्यंत आमचे चलनविषयक धोरण महागाईच्या नियंत्रणाच्या अनुषंगानेच असेल. केंद्र सरकारच्या आर्थिक व्यवस्थेबाबत रिझर्व्ह बॅंकेला कोणतीही चिंता नाही असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
2000 रुपयांच्या नोटा बदलण्याचा उद्याचा ( 7 ऑक्टोबर 2023) शेवटचा दिवस आहे. तुमच्याकडे अजूनही 2000 रुपयांच्या नोटा शिल्लक असतील, तर त्या बँक शाखेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जमा करण्याची ही शेवटची संधी आहे.





