200 रुपये किलोने विकणारे टोमॅटो आले 2 रुपये किलोवर; रस्त्यावर फेकून केला ‘लाल चिखल’

छत्रपती संभाजीनगर – सध्या राज्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. कारण टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे. 200 रुपये किलोन विक्री होणारे टोमॅटो सध्या दोन रुपयांवर आले आहे. त्यामुळे येथील जाधव मंडीमध्ये टोमॅटोला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर ओतून लाल चिखल केला आहे. दर घसरल्यामुळं शेतकरी आक्रमक झाले आहेत.
दीडशे ते दोनशे रुपये किलोने विक्री होणारे टोमॅटो सध्या दोन रुपये किलोनं विकले जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी रस्त्यावर टोमॅटो ओतून सरकारचा निषेध केला.
टोमॅटोचे दर दोनशे रुपयांवर गेल्याने शेतकऱ्यांनी टोमॅटोचे उत्पादन वाढवले होते. त्यासाठी शेतकऱ्यांनी मोठा खर्चही केला. पण आवक वाढल्याने टोमॅटोच्या दरात घट झाली आहे. केवळ टोमॅटोच नाही तर वांग्यांच्या दरातही घट झाली आहे. त्यामुळं टोमॅटोबरोबर शेतकऱ्यांनी वांगी देखील रस्त्यावर फेकून दिली.
भाव कोसळल्याने नाशिकच्या पिंपळगांव बाजार समितीतही टोमॅटो फेकून शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. पिंपळगाव बाजार समितीत सुरुवातीला तीन ते चार हजार असा बाजारभाव मिळालेल्या टोमॅटोच्या दरामध्ये अचानक मोठी घसरण झाली. 20 किलोच्या कॅरेटला अवघा 100 ते 170 रुपये दर मिळाला. त्यामुळे बाजार समितीमध्ये टोमॅटो घेऊन आलेले शेतकरी संतप्त झाले.
शेतकऱ्यांचा खर्चही निघेना
लाखो रुपये खर्चून टोमॅटोचे पीकं घेतले असून, सध्याच्या मिळालेल्या भावात मजुरी सुटणे अवघड असल्यामुळं शेतकरी संताप व्यक्त करत आहेत. मधल्या काळात टोमॅटोमुळे शेतकरी लखपती झाल्याच्या बातम्या सोशल मीडियावर प्रसारित झाल्या होत्या.
आता कमी दरामुळे लाखो रुपयांचे भांडवल खर्च झालेल्या टोमॅटो शेतकऱ्यांचा खर्चही निघणे कठीण झाले आहे. आधीच पावसाने दडी मारल्यामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत आहे. अशातच शेतमालाला दर नसल्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसत आहे.





