पुणे जिल्ह्यात टोमॅटो दराचा चिखल; नारायणगावात क्रेटला फक्त 50 ते 120 रुपये दर

मंगेश रत्नाकर
नारायणगाव – महिन्या भरापूर्वी टोमॅटो दर चांगले मिळत होते, शेतकऱ्याना बऱ्याच कालावधीनंतर चांगला बाजारभाव मिळत असल्याने आनंदाचे वातावरण होते. मात्र, 15 दिवसांपासून टोमॅटोच्या दरात घसरण होताना दिसत आहे. नारायणगावच्या टोमॅटो बाजारात शनिवारी (दि. 7) झालेल्या लिलावात क्रेटला सरासरी 50 ते 120 रुपये भाव मिळाला आहे.
शेतकऱ्यांना कधी अवकाळी पाऊस धोका देतो, तर कधी अस्मानी तर कधी सुलेमानी संकटांनी घेरलेला असतो. गेल्यावर्षी मोठ्या प्रमाणावर टोमॅटो उत्पादन झाल्याने बाजारभाव पूर्णपणे कोसळले होते. अक्षरशः बाजारभाव कमी मिळाल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकून देत आंदोलनदेखील केले होते.
या वर्षी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी लागवड कमी केल्याने आवक कमी झाली होती. परिणामी बाजारभाव चांगला मिळाला होता. सद्यःस्थितीत नारायणगाव बाजार समितीत बारामती व जुन्नर तालुक्यातील ग्रामीण भागातून टोमॅटोची आवक होत आहे. गेल्या काही दिवसांपासून आवक वाढली असून शनिवारी झालेल्या लिलावात जवळपास 5275 क्रेटची आवक झाली होती.
गेल्या महिन्यात टोमॅटो उत्पादकांचे मोठे होल्डींग लावणारा टोमॅटो आता रुसला आहे. सरासरी 2600 रुपये प्रतिक्रेट विकला गेलेला टोमॅटो सध्या 50 रुपये प्रतिक्रेट भाव झाल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. लाखो रुपये खर्च करून टोमॅटोचे पीक घेतले. मात्र, दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याचा उत्पादन खर्च तर दूरच, परंतु वाहतूक आणि मजुरी खर्च निघणेही कठीण झाले आहे.
महिनाभरापूर्वी टोमॅटोला बाजारभाव चांगला मिळतो या कारणाने शेतकरी थोडाफार सुखावला होता मात्र हा आनंद काही काळापुरताच मर्यादित होता असे वाटू लागले. दिवसागणिक ज्या प्रमाणात टोमॅटोची आवक वाढते आहे. त्याच प्रमाणात दरातदेखील घसरण व्हायला सुरुवात झाली आहे. सर्वसाधारणपणे एक एकर टोमॅटो उत्पादनासाठी एक ते दीड लाख रुपये खर्च येतो. मात्र, आजची टोमॅटो दराची घसरण बघता उत्पादन खर्चही निघेल की नाही या चिंतेत शेतकरी राजा आहे.
– जालिंदर डुकरे, टोमॅटो व्यापारी, नारायणगाव
उत्पादन खर्च फिटत नसल्याने शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत शासनाने नाफेडमार्फत टोमॅटोची खरेदी करावी, टोमॅटोला 50 रुपये किलोचा दर द्यावा, तसेच शासनाने व केंद्र शासनाने शेतकऱ्यांचा विचार करत टोमॅटोला 26 रुपये प्रतिकिलो अनुदान द्यावे, अशी मागणी टोमॅटो उत्पादक करीत आहेत.
– संदीप जाधव, टोमॅटो व्यापारी, नारायणगाव
नाशिक जिल्ह्यातील टोमॅटो पिंपळगाव बसवंत, सिन्नर, नाशिक व नवीन झालेले हिवरगाव पावसा (संगमनेर) येथील बाजारसमितीत विक्रीसाठी जात आहे. पिंपळगाव बसवंत येथे दररोज साडेचार ते पाच लाख क्रेट टोमॅटोची आवक होत आहे. तर सद्यःस्थितीत नारायणगाव बाजार समितीत बारामती व जुन्नर तालुक्यातील ग्रामीण भागातून टोमॅटोची आवक होत आहे.
– माऊली खंडागळे, संचालक, जुन्नर बाजार समिती





