टोमॅटो, कांद्याचे उत्पादन वाढले; महागाईवरील दबाव कमी होण्याची शक्यता

मुंबई – पावसाळ्यात विषम पर्जन्यमानामुळे टोमॅटो, बटाटे आणि कांद्याच्या उत्पादनावर आणि पुरवठ्यावर परिणाम झाला होता. मात्र आता परिस्थिती निवडळली आहे. या तिन्ही पिकाचे उत्पादन वाढले आहे. अशा परिस्थितीत या कृषी उत्पादनाची उपलब्धता वाढून दर कमी होतील असे बँक ऑफ बडोदाच्या अभ्यासावालात नमूद करण्यात आले आहे.
या तीन कृषी उत्पादनाच्या महागाईमुळे किरकोळ किमतीवर आधारित महागाई ऑक्टोबर महिन्यामध्ये 6.21% च्या पुढे गेली होती. मात्र नोव्हेंबर महिन्यामध्ये ही महागाई कमी होऊन 5.5 टक्के झाली आहे. नोव्हेंबरमध्ये एकूण कृषी उत्पादनाची महागाई 7.45 टक्क्यांनी वाढली होती. डिसेंबरमध्ये ती 6.1 टक्क्यानी वाढली आहे. यामुळे एकूणच महागाईच्या आकडेवारीवरील दबाव कमी होईल आणि 2025 चा वार्षिक महागाईचा दर 4.7 ते 4.8 टक्क्यादरम्यान राहील.
महागाई सहा टक्क्याच्या पुढे असल्यानंतर रिझर्व बँक व्याजदरात कपात करणे अपेक्षित नसते. जर पुढील एक- दोन महिन्यांमध्ये महागाईचा दर खरोखरच 6% च्या खाली राहिला तर रिझर्व बँक पुढाकार घेऊन व्याजदर कपात करण्याचा निर्णय घेऊ शकेल असे अहवालात सुचित करण्यात आले आहे.
चांगला पाऊस झाल्यामुळे रब्बीतील पीक विक्रमी होणार आहे. खरिपातील पीकही विक्रमी होणार आहे. त्यामुळे ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ या मुख्य अन्य घटकाच्या किमती नियंत्रणात राहणार आहेत. शिवाय केंद्र सरकार आपल्याकडील राखीव साठा उपलब्ध करत आहे. त्याचबरोबर आयात निर्यातीवर काही मर्यादा आणल्या आहेत. त्यामुळे या आघाडीवर परिस्थिती वेगात सुधारू शकते असे अहवालात म्हटले आहे.





