FASTag : फास्टॅगमधून टोल कलेक्शन वाढले; पहिल्या तिमाहीत 20,682 कोटींचे संकलन

नवी दिल्ली : फास्टॅगच्या माध्यमातून टोल कलेक्शन यंत्रणात कार्यक्षमरित्या काम करीत आहे. त्यामुळे या यंत्रणेच्या माध्यमातून टोल संकलन वाढत असल्याची आकडेवारी समोर येत आहे. एप्रिल- जून या पहिल्या तिमाहीत राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर फास्टॅगच्या माध्यमातून झालेले टोल कलेक्शन 19.6 टक्क्यानी वाढून 20,682 कोटी रुपये झाले आहे.
नॅशनल इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन या संस्थेने जारी केलेल्या माहितीनुसार या तिमाहीत टोल भरणार्या ग्राहकांची संख्या 16.2% वाढून 1,173 दशलक्ष इतकी झाली आहे. गेल्या वर्षी या कालावधीत ही संख्या 1,009 इतकी होती. आगामी काळातही ग्राहकांची संख्या आणि टोल कलेक्शन वाढत राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने एक एप्रिल 2025 पासून रस्त्यावरील टोल दरात चार ते पाच टक्क्यांची वाढ केली होती. त्यामुळे टोल संकलन वाढले आहे. मात्र आता विविध महामार्गावरील टोल दरांचे सुसूत्रीकरण करण्याची मोहीम चालू असून यामुळे प्रत्यक्षात कमी टोल द्यावा लागेल असे समजले जाऊ लागले आहे. त्याचबरोबर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी खासगी वाहनांना फास्टॅग आधारित वार्षिक पास देण्याची सुरुवात लवकरच करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
प्राप्त माहितीनुसार 15 ऑगस्टपासून ही यंत्रणा कार्यरत होण्याची शक्यता आहे. या पासचा दर वार्षिक तीन हजार रुपये असल्याचे सांगितले जाते. यामुळे रस्त्यावरील वाहनाची कोंडी कमी होण्यास मदत होईल आणि रस्त्यावरील वाहतूक वेगात होईल असे रस्ते वाहतूक मंत्रालयाला वाटते.





