Tokyo Olympics : प्रशिक्षकही होणार मालामाल

टोकियो – टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये भारताला मीराबाई चानूमुळे पहिले रौप्यपदक जिंकून दिले आहे. अशातच आता ऍथलीट्सच्या प्रशिक्षकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने शनिवारी (24 जुलै) ऍथलीट्ससोबत टोकियो ऑलिम्पिकमध्ये असणाऱ्या आणि त्यांना ट्रेनिंग देणाऱ्या प्रशिक्षकांसाठी रोख बक्षिसाची घोषणा केली आहे.
ज्या प्रशिक्षकाने ऍथलीटला सुवर्णपदक जिंकण्यासाठी मदत केली आहे, त्या प्रशिक्षकाला 12.5 लाख रुपये दिले जाणार आहेत. तसेच ज्या प्रशिक्षकाने ऍथलीटला रौप्यपदक जिंकण्यासाठी मदत केली आहे, त्याला 10 लाख रुपये आणि कांस्यपदकासाठी मदत करणाऱ्या प्रशिक्षकाला 7.5 लाख रुपये दिले जाणार आहे.
भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष राजीव मेहता म्हणाले, जे प्रशिक्षक खेळाडूंसोबत येथे आहेत आणि त्यांना ट्रेनिंग दिली आहे, अशा प्रशिक्षकांना रोख बक्षिसे दिली जातील. त्यांच्यासाठी हे मनोबल वाढवणारे असेल. विजय शर्मा, मीराबाई चानू यांच्या प्रशिक्षकांना 10 लाख रुपये मिळणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
तसेच ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेत्या राष्ट्रीय क्रीडा महासंघाला (एनएसएफ) प्रत्येकी 25 लाख रुपयांचा बोनस देण्याशिवाय 75 लाख रुपयांचा रोख पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय रौप्यपदक विजेत्यांना 40 लाख रुपये, तर कांस्यपदक जिंकणाऱ्यांना 25 लाखांचे रोख बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रत्येक ऍथलीटला 1 लाख आणि पदक विजेत्या 30 लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहे.





