पुणे | विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी टोकन पद्धत

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासाच्या सुमारे 305 कोटी 63 लाख रुपयांच्या आराखड्यांना मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय शिखर समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
यात श्री क्षेत्र पंढरपूर येथील दर्शन मंडप व दर्शन रांग या सुविधेसाठी 129 कोटी 49 लाख रुपयांच्या कामांचाही समावेश आहे. यामध्ये अद्ययावत असा दर्शन मंडप उभारण्यात येणार आहे.
पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी नेहमीच भाविक येत असतात. आषाढी आणि कार्तिक वारीसाठी लाखो वारकरी आणि भाविक पर्यटक पंढरुपरात येतात. त्यांच्यासाठी अद्ययावत असा दर्शन मंडप उभारण्यात येणार आहे.
सुमारे 16 हजार चौरस मीटरच्या या मंडपात पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर सहा हजार भाविकांची सोय करण्यात येईल.
यामध्ये प्रामुख्याने भाविकांना कमीत कमी वेळेत विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन व्हावे, यासाठी टोकन पद्धतीने प्रवेश दिला जाणार आहे. निश्चित केलेल्या वेळेतच भाविकांना मंडप व रांगेत प्रवेश दिल्याने गर्दीचेही नियंत्रण होणार आहे. याशिवाय दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक, माता-बालकांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे.
भाविकांना मिळणाऱ्या सुविधा
सर्वांना वेळेनिहाय टोकन पद्धतीने प्रवेश देण्यात येईल.
यवॉक पद्धतीच्या एक किलोमीटरची दर्शन रांगही असेल.
या मंडप आणि दर्शन रांगेमुळे भाविकांना सुरक्षित, सुसह्य आणि सोयी-सुविधांनी युक्त अशी दर्शनाची सोय उपलब्ध होणार
स्कायवॉक असल्याने स्थानिकांना दर्शन रांगेचा त्रास होणार नाही.
भाविकांचा दर्शनासाठी लागणार वेळ कमी होणार आहे.
मंडप आणि रांगेत पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, लिफ्ट, वैद्यकीय सुविधा उपलब्ध
अन्नछत्राच्या माध्यमातून जेवण उपलब्ध करून दिले जाणार

