महावितरणकडून वीज क्षेत्राचे खासगीकरण; 13 मंडळांत फ्रेंचायझी, मुख्यमंत्री फडणवीसांवर आरोप महावितरणच्या १३ मंडळांतील वीज वितरणाची जबाबदारी खासगी कंपन्यांना फ्रेंचायझी तत्त्वावर देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. या निर्णयामुळे मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामगार संघटनांना दिलेल्या “खासगीकरण न करण्याच्या” आश्वासनाचा भंग केल्याचा आरोप ‘महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन’ने केलाय. महावितरणने फ्रेंचायझी दिलेल्या मंडळांमध्ये जालना, छत्रपती संभाजीनगर (शहर व ग्रामीण), नांदेड, परभणी, हिंगोली, वाशीम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, सोलापूर, धाराशिव व बीड या शहरांचा समावेश आहे. फेडरेशनचे अध्यक्ष मोहन शर्मा यांनी याला तीव्र विरोध दर्शवत म्हटले की, पूर्वी नागपूर, जळगाव आणि संभाजीनगरमध्ये फ्रेंचायझी मॉडेल पूर्णतः अपयशी ठरले होते. नफ्यात असलेल्या सरकारी कंपन्यांचे खासगीकरण केवळ भांडवलदारांच्या फायद्यासाठी केले जात असल्याचा दावा करत, कामगार संघटनांनी आता राज्य सरकारविरोधात संघर्षाचा पवित्रा घेतलाय. ‘फ्रेंचायझी’ मॉडेल म्हणजे वीज वितरणाचे सरकारी काम काही ठराविक काळासाठी खासगी कंपनीकडे सोपवणे होय. यात वीज तयार करणे आणि ती मुख्य केंद्रापर्यंत आणणे हे काम सरकारचेच राहील, पण तुमच्या घरापर्यंत वीज पोहोचवणे आणि त्याचे बिल वसूल करणे हे काम ‘खासगी कंत्राटदार’ करेल. मनपा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार बिनविरोध; निवडीला मनसे, काँग्रेसचे हायकोर्टात आव्हान राज्यातील २९ महापालिका निवडणुकांमध्ये जवळपास ६७ जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने राजकीय वातावरण तापले आहे. या निवडींविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि काँग्रेसने सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सत्ताधारी महायुतीने दबावतंत्र आणि पैशांचा वापर करून उमेदवारांना अर्ज मागे घेण्यास भाग पाडल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केलाय. या याचिकेद्वारे राज्य निवडणूक आयोगाच्या तटस्थतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, संपूर्ण प्रकरणाची हायकोर्टाच्या निगराणीखाली चौकशी करण्याची मागणी करण्यात आलीय. “लोकप्रतिनिधित्व कायद्यात बिनविरोध निवडीची संकल्पना नाही,” असा दावा करत चौकशी पूर्ण होईपर्यंत या जागांचे निकाल जाहीर करू नयेत, अशी विनंतीही न्यायालयात करण्यात आलीय. विशेषतः कल्याण-डोंबिवली, जळगाव आणि ठाणे येथील मोठ्या संख्येने झालेल्या बिनविरोध निवडी आता न्यायप्रविष्ट झाल्यात. ‘मी परळी धनंजय मुंडेंना देऊन टाकली’; पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धडाका सुरू असताना भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी एक खळबळजनक विधान केलेय. “मी परळी आता धनंजय मुंडेंना देऊन टाकलीय, आता मला माळाकोळीवर प्रेम करू द्या,” असे वक्तव्य त्यांनी नांदेडमधील एका सभेत केले. राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे मुंडे बहीण-भाऊ सध्या महायुतीत एकत्र आहेत. मात्र, परळी मतदारसंघावर पंकजा मुंडे यांचा दावा कायम मानला जात असतानाच, त्यांनी स्वतःहून परळी धनंजय मुंडेंसाठी सोडल्याचे संकेत दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आगामी निवडणुकीत परळीतून नेमकी उमेदवारी कुणाची असणार, याबाबत या विधानामुळे आता राजकीय चर्चांना उधाण आलेय. भाषण करताना नारायण राणे यांना भोवळ; प्रकृती बिघडल्याने समर्थकांमध्ये चिंता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची कृषी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी भाषण करताना प्रकृती बिघडली. चिपळूण येथील ‘कृषी व पशुधन प्रदर्शन २०२६’ मध्ये संबोधित करताना राणेंना अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि व्यासपीठावरच भोवळ आली. सुरक्षा रक्षकांनी त्यांना तातडीने आधार देत खुर्चीवर बसवले. वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे हा त्रास झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. विशेष म्हणजे, कालच राणे यांनी वयोमानाचे कारण देत राजकीय निवृत्तीचे संकेत दिले होते. मुलांच्या राजकीय स्थिरतेनंतर आता व्यवसायाकडे लक्ष देण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. या घटनेनंतर काही काळ विश्रांती घेऊन ते विश्रामगृहाकडे रवाना झाले असून, त्यांच्या प्रकृतीबाबत समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ‘शरद पवारांकडे आमदारांचे संख्याबळ नाही; राज्यसभेसाठी मोठा तमाशा होईल’; ओवेसींचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा राज्यसभेचा कार्यकाळ मार्चमध्ये संपत असून, आगामी काळात त्यांना खासदार म्हणून निवडून येणे कठीण असल्याचे विधान एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी केलेय. महापालिका निवडणुकांच्या प्रचारादरम्यान ओवेसींनी राज्याच्या राजकीय समीकरणांवर भाष्य केले. ओवेसी म्हणाले की, पवारांकडे राज्यसभेवर पुन्हा निवडून जाण्यासाठी आवश्यक आमदारांचे संख्याबळ सध्या शिल्लक नाही. “त्यांच्याकडे सत्ता कुठे आहे? पुरेसे आमदार नसताना ते पुन्हा वरिष्ठ सभागृहात कसे जाणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राज्यसभेच्या या जागेसाठी भविष्यात मोठा राजकीय ‘तमाशा’ पाहायला मिळेल, असे संकेतही त्यांनी दिले. पवारांसोबतच मल्लिकार्जुन खरगे आणि रामदास आठवले यांसारख्या अनेक दिग्गजांचा कार्यकाळ संपत असल्याने आगामी राज्यसभा निवडणूक चुरशीची ठरणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; महागाई भत्त्यात 2% वाढीची शक्यता नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. नोव्हेंबरच्या अखिल भारतीय औद्योगिक श्रमिक ग्राहक किंमत निर्देशांक आकडेवारीनुसार, जानेवारी २०२६ पासून महागाई भत्त्यात २% वाढ होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे सध्याचा ५८% वर असलेला डीए आता ६०% वर पोहोचेल. जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार ५०,००० रुपये असेल, तर ५८% नुसार त्याला २९,००० रुपये डीए मिळत होता. आता ६०% प्रमाणे तो ३०,००० रुपये होईल, म्हणजेच दरमहा १,००० ची थेट वाढ होईल. तज्ज्ञांच्या मते, ८ व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीपूर्वी डीए जितका जास्त वाढेल, तितकाच फायदा ‘फिटमेंट फॅक्टर’ ठरवताना होईल. यामुळे भविष्यात कर्मचाऱ्यांचा मूळ पगार आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता निर्माण झालीय. ONGC च्या तेल विहिरीला भीषण आग; आंध्र प्रदेशात घटना, तीन गावे रिकामी आंध्रप्रदेशातील कोनसीमा जिल्ह्यातील राजोल भागात सोमवारी ओएनजीसीच्या तेल विहिरीतून मोठ्या प्रमाणात गॅस गळती होऊन भीषण आग लागली. विहिरीच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना अचानक मोठा स्फोट झाला आणि कच्च्या तेलासह वायूने पेट घेतला. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने इरुसुमांडासह परिसरातील तीन गावे तातडीने रिकामी केली आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना वीज आणि गॅस शेगड्या बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आलेय. ओएनजीसी आणि ‘दीप इंडस्ट्रीज’चे पथक आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. सध्या संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून आहेत. सायंकाळी 6 वाजेपर्यंत कोणतीही जीवीतहानीची घटना समोर आलेली नाही. अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला; जेडी व्हेन्स यांच्या घराच्या खिडक्यांची तोडफोड अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हेन्स यांच्या ओहायो राज्यातील सिनसिनाटी येथील घरावर रविवारी मध्यरात्री अज्ञाताने हल्ला केला. या हल्ल्यात घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या असून, गुप्तचर विभागाने तातडीने कारवाई करत एका संशयिताला ताब्यात घेतलेय. सुदैवाने, घटनेच्या वेळी जेडी व्हेन्स आणि त्यांचे कुटुंब घरी उपस्थित नव्हते. रविवारी दुपारीच ते शहराबाहेर गेले होते. एका व्यक्तीने भिंत ओलांडून आत घुसण्याचा प्रयत्न केल्याचे समजते, मात्र तो घरात प्रवेश करू शकला नाही. व्हेन्स यांनी अलीकडेच वेनेझुएलातील अमली पदार्थ तस्करीविरोधी अमेरिकन लष्करी कारवाईचे समर्थन केले होते, त्या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाला का, याचा तपास यंत्रणा करत आहेत. अद्याप या प्रकरणावर व्हाईट हाऊसने अधिकृत भाष्य केलेले नाही. विजय थलापतीचा अखेरचा चित्रपट ‘जन नायकन’; शो हाऊसफुल्ल, तिकीट २ हजार रुपयांवर दाक्षिणात्य सुपरस्टार विजय थलापती याचा कारकिर्दीतील अखेरचा चित्रपट ‘जन नायकन’ ९ जानेवारी रोजी पोंगलच्या मुहूर्तावर प्रदर्शित होतोय. या चित्रपटासाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता असून कर्नाटकात आगाऊ बुकिंगला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. बंगळुरूमधील विशेष शोची तिकिटे २,००० रुपयांपर्यंत विकली गेली असूनही सर्व शो ‘हाऊसफुल्ल’ झालेत. ३३ वर्षांच्या अभिनय कारकिर्दीनंतर वयाच्या ५१ व्या वर्षी विजयने निवृत्ती जाहीर केलीय. तामिळनाडू विधानसभा निवडणूक २०२६ वर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला असून, ‘तामिळगा वेत्री कझगम’ या आपल्या राजकीय पक्षाद्वारे ते पूर्णवेळ समाजकारणात सक्रिय होणार आहेत. ६९ व्या चित्रपटासह विजय रुपेरी पडद्याला कायमचा निरोप देणार असल्याने जगभरातील चाहत्यांसाठी हा भावनिक क्षण ठरतोय. मुस्तफिझूर रहमानला डच्चू, बांगलादेश संतापला; IPL च्या प्रसारणावर घातली बंदी बीसीसीआयच्या निर्देशानंतर कोलकाता नाईट रायडर्सने बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिझूर रहमान याला संघातून मुक्त केले. या कारवाईचा निषेध म्हणून बांगलादेश सरकारने देशात आयपीएलच्या प्रसारणावर अनिश्चित काळासाठी बंदी घातलीय. माहिती व प्रसारण मंत्रालयाने ५ जानेवारी रोजी सर्व टीव्ही चॅनल्सना हे आदेश दिले. मुस्तफिझूरला ९.२० कोटींना विकत घेऊनही अचानक बाहेर काढल्याने बांगलादेशमध्ये तीव्र संताप आहे. या राजकीय तणावामुळे बांगलादेशने टी-२० विश्वचषक २०२६ साठी भारत दौऱ्यावर येण्यासही नकार दिला असून, आपले सामने श्रीलंकेत हलवण्याची मागणी आयसीसीकडे केलीय.