१) एकनाथ शिंदेंच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; नांदेडचे दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी कार्तिक एकादशीच्या निमित्ताने आज पंढरपुरात पहाटे विठ्ठलाची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते विधीवत संपन्न झाली. पहाटे २ वाजून २० मिनिटांनी ही महापूजा सुरू झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांचा मुलगा खासदार श्रीकांत शिंदे आणि नातू रुद्रांश यांच्यासह शासकीय महापूजेसाठी विठ्ठल मंदिरात दाखल झाले होते. यंदा कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापूजेचा मानाचा वारकरी होण्याचा बहुमान नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील रामराव बसाजी वालेगावकर आणि त्यांच्या पत्नी सुशिलाबाई रामराव वालेगावकर यांना मिळाला. वालेगावकर दाम्पत्य गेल्या २० वर्षांपासून वारी करत आहे. या दाम्पत्याला शासकीय महापूजेचा मानाचा वारकरी होण्याचा बहुमान मिळाल्यानंतर त्यांना आनंदाश्रू अनावर झाले होते. पांडुरंगाच्या कृपेमुळे आम्हाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेला उपस्थित राहण्याचा मान मिळाला, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. ===================== २) महायुतीच्या काळात फुटकी कवडीही मिळाली नाही; शिंदेंच्या आमदाराचा भाजपला घरचा आहेर “महायुतीच्या एक वर्षाच्या काळात एक फुटकी कवडी सुद्धा आमदारांना मिळाली नाही. ” असे विधान करत शिंदेसेनेच्या आमदाराने आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला आहे. त्यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. भाजपच्या बंडखोरांना पुन्हा पक्षात घेतल्याबद्दल शिंदे सेनेचे आमदार किशोर पाटील यांनी मनातली खदखद एका जाहीर कार्यक्रमात बोलून दाखवली. शिवसेनेच्या पाचही आमदारांनी ठरवलं, तर जळगाव परिषदेवर शिवसेनेचा अध्यक्ष बसणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच भाजपचे नेते युतीबद्दल बोलतात पण हे कधी पलटी खातील, याचा भरोसा नाही, असे म्हणत त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. . ===================== ३) ‘सारखंच फुकटात कसं मिळेल? अजित पवारांच्या विधानावरून प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल नागपुरात कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर अजित पवार यांनी ‘सारखंच फुकटात कसं मिळेल?’ शेतकऱ्यांनी कर्ज फुकटात मिळण्याची सवय लावून घेऊ नये. तुम्ही देखील हातपाय हालवा,’ असे विधान केले होते. त्यावरून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. ‘राज्यातील शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात असं तुम्हाला वाटतं का?’ असा सवाल अजित पवार यांना केला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी एक्सवर यासंदर्भात एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “अजित पवार, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात असे वाटते का तुम्हाला? तुम्ही म्हणालात, ‘सरकार शेतकऱ्यांचे कर्ज किती काळ माफ करत राहणार?’ पण खरा प्रश्न असा आहे की, तुम्ही आणि तुमचे सरकार शेतकऱ्यांचे हक्क किती काळ नाकारत राहणार? कधीपर्यंत हजारो कोटी रुपयांचे कॉर्पोरेट कर्ज माफ केले जाईल आणि शेतकऱ्यांच्या मदतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातील?” ===================== ४) पुण्यात झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू पुणे शहरातील कोरेगाव पार्क परिसरात रविवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात बंडगार्डन मेट्रो स्टेशनजवळ पहाटे साडेचारच्या सुमारास झाला. मिळालेल्या माहितीनुसार, एक कार अचानक नियंत्रण सुटून मेट्रो स्टेशनच्या खांबावर जाऊन आदळली. धडकण्याचा आवाज इतका जबरदस्त होता की आसपासच्या परिसरात काही क्षणांतच लोकांची गर्दी जमली. स्थानिकांनी तत्काळ पोलिसांना आणि रुग्णवाहिकेला कळवले. या अपघातात कारमधील दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघेही पिंपरी चिंचवडचे असल्याची माहिती समोर आली आहे. ===================== ५) “काँग्रेसच्या डोक्यावर बंदूक ताणून राजदने मुख्यमंत्रीपद हिसकावले” ; मोदींचा महाआघाडीवर हल्ला बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी आरा याठिकाणी एका भव्य सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण महाआघाडीवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी, आरजेडीने काँग्रेसच्या गळ्यावर बंदूक ठेवून मुख्यमंत्रीपद हिसकावून घेतले” असे म्हणत जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदींनी आरा याठिकाणी सभेला संबोधित करताना महाआघाडीतील अंतर्गत कलह उघडकीस आणला. याविषयी त्यांनी,” आरजेडीने काँग्रेसच्या गळ्यावर बंदूक धरून मुख्यमंत्रीपद हिसकावून घेतले. काँग्रेस आणि आरजेडीमध्ये जोरदार लढाई सुरू आहे. त्यानंतर, काँग्रेसला मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर करावा लागला” असे पंतप्रधान मोदींनी म्हटले. ===================== ६) राहातील काही भागात आज अतिमुसळधार पावसाचा इशारा राज्यात गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस हजेरी लावताना दिसतोय. आजही अनेक भागात सकाळीच पावसाने जोरदार हजेरी लावली. काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण झालंय. नोव्हेंबर महिन्याला सुरूवात झाली असून पाऊस अजूनही सुरू असल्याचे दिसतंय. पावसामुळे शेतींचे मोठे नुकसान झाले. आजही भारतीय हवामान विभागाकडून पावसाचा मोठा इशारा देण्यात आला. फक्त राज्यच नाही तर देशातील काही भागात आज अतिमुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा कायम असल्याने पुढील काही दिवसही पाऊस असण्याचे संकेत आहेत. कोकण, मध्य महाराष्ट्र, गुजरात, गोवा, पश्चिम बंगाल, सिक्किम,बिहार या भागात पावसाचा अलर्ट आहे. कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मोठा इशारा अंदमान निकोबार येथे अतिमुसळधार पाऊस होईल. मध्य महाराष्ट्रात 5 तारखेपर्यंत मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाचा आहे. पुढील काही दिवसही पावसाचे संकट देशावर कायम असल्याचे बघायला मिळतंय. पंजाबनंतर महाराष्ट्रात पावसाने मोठे थैमान घातले. पूर्ण शेती वाहून गेली. हाताला आलेले पिक शेतकऱ्यांचे गेले. मात्र, आता अजूनही पावसाने आपला कहर थांबवला नसलयाचे स्पष्ट दिसतंय. ===================== ७) ब्रिटनमध्ये १० जणांवर चाकू हल्ला, २ संशयितांना अटक इंग्लंडमध्ये एका व्यक्तीने लंडनला जाणाऱ्या ट्रेनमध्ये अनेक प्रवाशांवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अचानक झालेल्या हल्ल्याने लोकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, “सर्वत्र रक्ताचे डाग” होते आणि भीतीने अनेक प्रवासी बाथरूममध्ये लपले होते. डोनकास्टरहून लंडन किंग्ज क्रॉसला जाणाऱ्या ट्रेनमध्ये ही घटना घडली. ब्रिटिश ट्रान्सपोर्ट पोलिसांनी सांगितले की, केंब्रिजशायरमधील हंटिंगडन स्टेशनवर ट्रेन थांबवण्यात आली आणि घटनास्थळी दोन संशयितांना अटक करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की दहा लोक जखमी झाले आहेत, त्यापैकी नऊ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. ===================== ८) मेक्सिकोमध्ये भीषण आग ; अनेक मुलांसह २३ जणांचा होरपळून मृत्यू Mexico Fire। मेक्सिकोच्या सोनोरा राज्यात लागलेल्या भीषण आगीमुळे उत्सवाचा आनंद शोकात बदलला, हर्मोसिलो शहरातील एका डिस्काउंट स्टोअरमध्ये अनेक मुलांसह किमान २३ जणांचा मृत्यू झाला आणि डझनभराहून अधिक जण जखमी झाले. देश ‘डे ऑफ द डेड’ साजरा करत असताना ही घटना घडली, हा पारंपारिक उत्सव कुटुंबे त्यांच्या मृत प्रियजनांचे स्मरण करतात. रंगीबेरंगी मिरवणुका आणि मेणबत्त्यांच्या प्रकाशात, या अपघाताने उत्सवाचे दुःखात रूपांतर केले. सोनारा राज्याचे अॅटर्नी जनरल गुस्तावो सालास यांनी सांगितले की, बहुतेक मृत्यू विषारी वायू श्वासोच्छवासामुळे झाले आहेत कारण आगीनंतर संपूर्ण दुकानात धूर वेगाने पसरला. त्यांनी सांगितले की फॉरेन्सिक पथकांनी मृतदेहांची तपासणी सुरू केली आहे. ===================== ९) लवकरच कियारा अडवाणीचं बॅालिवूडमध्ये कमबॅक होणार प्रसिद्ध अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या मातृत्वाचा पुरेपूर आनंद घेत आहे. तिने नुकतेच पती सिद्धार्थ मल्होत्रासह तिच्या पहिल्या बाळाचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. आई झाल्यानंतर कियाराने बॅालिवूडमध्ये कमबॅक कधी कमबॅक करणार अशी चर्चा होती. अखेर याचे उत्तर मिळाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बॉलिवूडची प्रसिद्ध ट्रॅजेडी क्वीन मीना कुमारी यांच्या जीवनावर आधारित एक बायोपिक सिनेमा येणार आहे. या सिनेमाची अॅाफर कियाराला मिळाली आहे. गेल्या वर्षी सिद्धार्थ पी. मल्होत्राने “कमल और मीना” नावाच्या बायोपिकची घोषणा केली होती. तेव्हापासून चाहते या सिनेमात मीना कुमारीची भूमिका कोण साकारणार याची आतुरतेने वाट पाहत होते. १०) केन विल्यमसनने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जाहीर केली निवृत्ती न्यूझीलंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार केन विल्यमसनने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. यामुळे पुढील टी-२० विश्वचषकापासून केवळ चार महिन्यांआधी या छोट्या फॉरमॅटमधील त्याच्या ९३ सामन्यांची कारकीर्द संपुष्टात आली. ३५ वर्षीय विल्यमसनने पुरुषांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंडचा दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून निरोप घेतला.