१) पुण्यासह अनेक शहरांमध्ये थंडीचा इशारा; जळगाव सर्वात थंड हवामान विभागाने (IMD) पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवस थंडीचा इशारा दिला आहे. सोमवारी काही भागात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. शनिवारी पुण्यात रात्रीचे तापमान ११.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. सोमवारपर्यंत पारा हाच पातळीवर राहण्याची शक्यता आहे. शिवाय शहराच्या अनेक भागात कमाल तापमान आता ३० अंश सेल्सिअसपेक्षा कमी आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, रविवारी सकाळी पुण्यात १०.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शिवाजीनगर आणि पाषाण येथे अनुक्रमे १०.६ अंश सेल्सिअस आणि १०.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शनिवारी जळगावमध्ये किमान तापमान ८.७ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. जे सरासरीपेक्षा सहा अंश सेल्सिअस कमी आहे. यामुळे ते महाराष्ट्रातील सर्वात थंड ठरले. २) संगमनेरमध्ये एक कोटी रुपयांची रोकड जप्त राज्यात सध्या नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू आहे. एकीकडे निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या पथकाने तपासणी दरम्यान एका वाहनातून तब्बल एक कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर आयोगाकडून शहरात येणाऱ्या प्रत्येक वाहनावर काटेकोर पाळत ठेवली जात आहे. यादरम्यान आयोगाच्या पथकाने शहराच्या मुख्य प्रवेशद्वारावर एक वाहन थांबवून तपासणी केली. तसेच वाहनातील सर्व कागदपत्रे तपासल्यानंतर अधिकाऱ्यांना वाहनातील व्यक्तींच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्या. ३) पिंपरीत पीएमपीची बस जळून खाक पिंपरीतून भोसरीकडे निघालेल्या पीएमपीएमएलच्या बसला रविवारी सकाळी ११.४० वाजता आग लागल्याची घटना घडलीय. ही बाब चालकाच्या लक्षात येताच त्याने यांत्रिक दरवाजे उघडले. यामुळे बसमधील १५ प्रवासी वेळीच बाहेर पडल्याने सुखरूप बचावले. रविवारी सकाळी पीएमपीएमएलची बस पिंपरीतून भोसरीच्या दिशेने निघाली. यावेळी बसमध्ये १५ प्रवासी, वाहक आणि चालक होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाचा थांबा घेतल्यानंतर बस नेहरूनगरच्या दिशेने रवाना झाली. बस लोखंडे कामगार भवनासमोर आल्यावर बसच्या इंजिनमधून धूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. या बसला यात्रिक दरवाजे असल्याने सर्व प्रवासी बसमध्ये अडकले असते. मात्र चालकाने प्रसंगावधान राखत बसचे दरवाजे उघडले आणि त्यानंतर प्रवाशांना धोक्याची सूचना देत स्वतःही बसमधून खाली उतरला. ४) राज्य सरकारकडून उद्धव ठाकरे अन् आदित्यांवर मोठी जबाबदारी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून जोरदार तयारी सुरू आहे. मात्र ठाकरे गटाला तगडी लढत देण्यासाठी भाजपसह शिंदे गटाने देखील मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यावरून सातत्याने आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्याचदरम्यान आता राज्य सरकारकडून ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांना महत्त्वाची जबाबदारी सोपण्यात आली आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या सार्वजनिक न्यासाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. उद्धव ठाकरे, माजी मंत्री सुभाष देसाई आणि युवा नेते आदित्य ठाकरे यांची पाच वर्षांसाठी ट्रस्टी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ५) बिहारचे नितीश कुमारच मुख्यमंत्री नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयानंतर, राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्यास सज्ज आहे. नवे मुख्यमंत्री नितीश कुमारच असतील. युतीमध्ये मंत्रिमंडळ स्थापनेबाबत एकमत झाले असून त्यानुसार, प्रत्येक सहा आमदारांमागे एक मंत्रीपद शक्य आहे. या आधारे, जेडीयूच्या कोट्यात १४ मंत्री असण्याची अपेक्षा आहे. भाजपकडे प्रत्येकी १५ मंत्री असू शकतात. एलजेपीच्या रामविलास पासवान कोट्यातून तीन आणि जीतन राम मांझी आणि उपेंद्र कुशवाह यांच्या पक्षातून प्रत्येकी एक मंत्री नियुक्त केला जाऊ शकतो. ६) मंत्रिमंडळ फेरबदलासाठी राहुल गांधींची मंजुरी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना त्यांच्या मंत्रिमंडळ फेरबदलासाठी मंजुरी दिली आहे. बिहार निवडणुकीत काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या पराभवानंतर दिल्लीत राहुल गांधी यांच्याशी भेट घेत असताना सिद्धरामय्या यांनी सुमारे वीस मिनिटे राज्याच्या राजकारणावर चर्चा केली. हायकमांडकडून मंजुरी मिळाल्याने, सिद्धरामय्या २० नोव्हेंबर रोजी अडीच वर्षे पूर्ण केल्यानंतरही मुख्यमंत्री म्हणून राहण्यासाठी त्यांच्या १०-१२ मंत्र्यांना वगळू शकतात आणि त्यांची स्थिती मजबूत करू शकतात. परंतु सध्याच्या काँग्रेस सरकारच्या पाच वर्षांच्या कार्यकाळाच्या अर्ध्या टप्प्यात मुख्यमंत्री होऊ इच्छिणारे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासाठी हा एक गंभीर धक्का असेल. ७) पाकिस्तानमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट; ७ जणांचा मृत्यू कराची : पाकिस्तानमधील फटाक्यांच्या बेकायदेशीर कारखान्यामध्ये झालेल्या स्फोटात किमान ७ जण ठार झाले आहेत आणि इतर काही जण जखमी झाले आहेत. हा स्फोट सिंध प्रांतातल्या हैदराबाद जिल्ह्यात लतिफाबाद भागातल्या फटाक्यांच्या कारखान्यामध्ये शनिवारी रात्री झाला, असे बचाव अधिकाऱ्यांनी सांगितले. लघारी गोथ नदीच्या किनाऱ्यावरील एका घरामध्ये परवाना न घेता हा फटाक्यांचा कारखाना चालवला जात होता. तेथे हा स्फोट झाला. स्फोटानंतर घराचा एक मोठा भाग कोसळला. आतापर्यंत ७ मृतदेह इमारतीच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहेत. आणखी काही जण या ढिगाऱ्याखाली गाडले गेले असण्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे. बचावकार्य पूर्ण झाल्यानंतरच स्फोटाचे नेमके कारण समजू शकेल, अससे बचाव पथकाच्या प्रवक्त्याने सांगितले. ८) अभिनेता इमरान खानचे कमबॅक; भूमी पेडणेकर दिसणार मुख्यभूमिकेत अभिनेता इमरान खानने ‘जाने तू या जाने ना’ सिनेमातून बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तो काही सिनेमांमध्ये दिसला आणि गायब झाला. आता तो पुन्हा एकदा कमबॅकसाठी सज्ज झाला आहे. दिग्दर्शक दानिश असलमच्या आगामी सिनेमात इमरान खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात इमरान खानसोबत अभिनेत्री भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. एका मुलाखतीत इमरान खान म्हणाला, “माझा हा सिनेमा ब्रेक के बाद सारखाच आहे. हा सिनेमा दानिश आणि माझ्या आयुष्यातील अनुभवांवर आहे.सिनेमाचं शूट पूर्ण झालं असून आता पोस्ट प्रोडक्शनचं काम सुरु आहे. लवकरच सिनेमाच्या रिलीज डेटची घोषणा होणार आहे. ९) ‘दिल दियां गल्लां…’ गाण्यावर सलमान आणि तमन्नाचा रोमॅंटिक डान्स कतारची राजधानी दोहा येथे ही दबंग रिलोडेड टूर आहे. जिथे हजारो चाहत्यांनी बॉलीवुडच्या या धमाकेदार शोचा आनंद लुटला. यावेळी अभिनेता सलमान खान सोबत तमन्ना भाटिया आणि इतर कलाकार देखील उपस्थित आहेत. सध्या सलमान आणि तमन्नाचा डान्सचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. दोहा येथे परफॉर्मन्सवेळी सलमान खान आणि तमन्ना भाटियाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. सलमानच्या सुपरहिट गाण्यांवर सर्वांना परफॉर्म केलं. सलमानने स्वत: ‘ओ ओ जाने जा ना’,’स्वॅग से स्वागत’,’दीदी तेरा देवर दीवाना’,’कभी तू छलिया लगती हो’,’जीने के है चार दिन’ या सुपरहिट गाण्यांवर परफॉर्म केलं. ‘दिल दियां गल्लां’वर परफॉर्म करताना व्हीडिओमध्ये तमन्ना लाल रंगाच्या आऊटफिटमध्ये एकदम हॉट दिसत आहे. तर ब्लॅक सूट बूटमध्ये सलमान खान डॅशिंग आणि हँडसम दिसत आहे. १०) आयपीएलचे मिनी ऑक्शन 16 डिसेंबरला पार पडणार आयपीएलच्या 19 व्या मोसमासाठी एकूण 10 फ्रँचायजींनी 15 नोव्हेंबरला संध्याकाळी 5 वाजता रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर केली होती. आयपीएलने रिटेन्शननंतर अवघ्या काही तासांनीच मिनी ऑक्शची तारीख जाहीर केली. आयपीएलने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन ही अधिकृत माहिती दिली. यानुसार 16 डिसेंबरला हे मिनी ऑक्शन होणार आहे. अबुधाबीतील एतिहाद एरीनामध्ये हे मिनी ऑक्शन पार पडणार आहे.