भाजप कार्यकर्त्यांची ’50 खोके’ची घोषणाबाजी; महायुतीतील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर वॉर्ड क्रमांक १७३ मध्ये महायुतीतील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आलाय. भाजप उमेदवार शिल्पा केळुस्कर आणि शिंदे गटाच्या पूजा कांबळे यांच्यातील ‘मैत्रीपूर्ण’ लढतीने शुक्रवारी हिंसक वळण घेतले. प्रचारफेरी दरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी शिंदे गटाला डिवचण्यासाठी ‘५० खोके, एकदम ओके’ अशा घोषणा दिल्या. यामुळे संतापलेल्या शिंदे गटाच्या समर्थकांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. या घटनेवर मंत्री संजय शिरसाट यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, “आमच्यामुळेच तुम्ही सत्तेत आहात” अशी भाजपला आठवण करून दिली. आमदार अतुल भातखळकर यांनी संबंधितांवर कारवाईचे आश्वासन दिले असले, तरी मतदानाच्या आधी घडलेल्या या प्रकारामुळे महायुतीतील विसंवाद स्पष्ट झालाय. लाडक्या बहिणींना मकरसंक्रांतीची भेट; ३ हजार रुपयांच्या दाव्याने राजकीय वातावरण तापले ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे एकत्रित ३,००० रुपये १४ जानेवारीपूर्वी खात्यात जमा होणार असल्याचे दावे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. १५ जानेवारी रोजी राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी मतदान होत असल्याने, मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर निधी वाटप करण्याच्या या हालचालींवर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. भाजप उमेदवार तेजस्वी घोसाळकर यांच्यासह महायुतीच्या अनेक नेत्यांनी ही रक्कम जमा होणार असल्याचे पोस्टर्स शेअर केलेत. मात्र, मतदानाच्या अवघ्या एक दिवस आधी असा आर्थिक लाभ देणे हा निवडणूक आचारसंहितेचा भंग असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. निवडणुकीच्या तोंडावर हा सरकारी लाभ आहे की राजकीय डावपेच, यावरून चर्चेला उधाण आलेय. अंबरनाथमध्ये भाजपला मोठा धक्का; शिवसेना-राष्ट्रवादीची नवी युती अंबरनाथ नगरपरिषदेत सत्तास्थापनेसाठी सुरू असलेल्या राजकीय पेचाला आता पूर्णविराम मिळाला असून, खासदार श्रीकांत शिंदे यांनी मोठी खेळी करत भाजपला धक्का दिलाय. काँग्रेसचे १० नगरसेवक फोडून सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपला शह देत शिंदेंच्या शिवसेनेने अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केलीय. नवनिर्वाचित ३२ नगरसेवकांचे शिवसेना २७, राष्ट्रवादी ४ व १ अपक्ष पाठबळ असलेले पत्र जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेय. जरी नगराध्यक्षपदी भाजपच्या तेजश्री करंजुले विजयी झाल्या असल्या, तरी बहुमत सिद्ध करण्यात शिवसेना यशस्वी ठरलीय. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यातील या प्रतिष्ठेच्या लढाईत अखेर शिवसेनेने सत्तेचे समीकरण जुळवलेय. भीषण अपघातात माजी गृहमंत्र्यांच्या कन्येचा दुर्दैवी मृत्यू; मित्राच्या वाढदिवसावरून परतताना काळाचा घाला मध्य प्रदेशचे माजी गृहमंत्री बाला बच्चन यांची कन्या प्रेरणा बच्चन वय २६ यांचा इंदूरमध्ये झालेल्या भीषण कार अपघातात मृत्यू झाला. मित्राचा वाढदिवस साजरा करून परतत असताना, त्यांची भरधाव कार तेजाजी नगर परिसरात एका ट्रकला धडकली. या अपघातात प्रेरणासह प्रखर कासलीवाल आणि मनू संधू या दोन तरुणांचाही जागीच मृत्यू झाला, तर एक तरुणी गंभीर जखमी आहे. मुंबईतून एमबीए पूर्ण केलेली प्रेरणा राजकारणाऐवजी प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठीची तयारी करत होती. मात्र, या अपघाताने तिचे स्वप्न अधुरे राहिले. या घटनेमुळे बडवानी जिल्ह्यातील त्यांच्या ‘कासेल’ या मूळ गावी शोककळा पसरली असून, तिथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. EDच्या कारवाईविरोधात TMCचे आंदोलन; महुआ मोइत्रांसह 8 खासदार ताब्यात पॉलिटिकल कंसल्टन्सी फर्म ‘आय-पॅक’च्या कार्यालयावर अंमलबजावणी संचालनालयाने टाकलेल्या धाडींचे पडसाद आज राजधानीत उमटले. या कारवाईचा निषेध करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कार्यालयाबाहेर निदर्शने करणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या ८ खासदारांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये महुआ मोइत्रा, डेरेक ओ’ब्रायन आणि कीर्ति आझाद यांसारख्या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. “भाजप केंद्रीय यंत्रणांचा वापर करून विरोधकांची राजकीय हेरगिरी करत आहे,” असा गंभीर आरोप महुआ मोइत्रा यांनी यावेळी केला. तर, भाजपने स्वतःच कोळसा घोटाळ्याचे टेंडर काढून भ्रष्टाचार केल्याचा पलटवार कीर्ति आझाद यांनी केला. दरम्यान, या कारवाईच्या निषेधार्थ पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी कोलकात्यात भव्य रॅली काढणार असून, बंगालमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापलेय. वेनेझुएला नंतर अमेरिकेचा मोर्चा मेक्सिकोकडे; ट्रम्प यांची लष्करी हल्ल्याची धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वेनेझुएलातील लष्करी कारवाईनंतर आता आपला मोर्चा मेक्सिकोकडे वळवलाय. वेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना ताब्यात घेतल्यानंतर, ट्रम्प यांनी आता मेक्सिकोमधील ‘ड्रग कार्टेल्स’वर अर्थात अंमली पदार्थ तस्करी विरोधात थेट जमिनीवरून हल्ले करण्याची धमकी दिलीय. नार्को-आतंकवादाचा नायनाट करण्यासाठी ही कारवाई आवश्यक असल्याचे ट्रम्प यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केले. अमेरिकेत होणारी अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी मेक्सिकोमधील तस्करांचे तळ उद्ध्वस्त करण्याची त्यांची योजना आहे. या धमकीमुळे अमेरिका आणि मेक्सिको या शेजारील देशांमधील तणाव कमालीचा वाढला असून, मेक्सिको सरकारच्या अधिकृत प्रतिसादाकडे आता जगाचे लक्ष लागलेय. सुझुकीची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर ‘e-Access’ लाॅंच; किंमत 1 लाख 88 हजार रुपये सुझुकी मोटरसायकल इंडियाने आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर ‘e-Access’ भारतीय बाजारपेठेत अधिकृतपणे लॉन्च केली असून तिची एक्स-शोरूम किंमत 1 लाख 88 हजार रुपये निश्चित केलीय. या स्कूटरमध्ये ३.०७ kWh क्षमतेची सुरक्षित LFP बॅटरी देण्यात आली असून ती एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ९५ किलोमीटरची रेंज देते. ५.५ bhp पॉवर आणि १५ Nm टॉर्कसह या स्कूटरचा टॉप स्पीड ७१ किमी प्रतितास आहे. ही स्कूटर चार आकर्षक ड्युअल-टोन रंगांत उपलब्ध असून DC फास्ट चार्जरच्या मदतीने केवळ दोन तासांत पूर्ण चार्ज होऊ शकते. ही स्कूटर आता सुझुकीच्या सर्व डीलरशिपवर बुकिंगसाठी उपलब्ध आहे. दरम्यान, बजाज चेतक आणि टीव्हीएस आयक्यूब यांसारख्या स्पर्धकांच्या तुलनेत ‘e-Access’ची किंमत ५० हजार रुपयांपर्यंत जास्त असल्याने ग्राहकांच्या प्रतिसादाकडे सर्वांचे लक्ष लागलेय. स्मरणशक्ती आणि मेंदू तल्लख करण्यासाठी टीप्स; आव्हानात्मक उपक्रमांमुळे मेंदू राहतो सक्रिय धावपळीच्या जीवनशैलीत मानसिक आरोग्य आणि स्मरणशक्ती टिकवून ठेवणे मोठे आव्हान ठरतेय. मात्र, दैनंदिन जीवनात काही साधे बदल केल्यास मेंदूची कार्यक्षमता लक्षणीयरीत्या वाढवता येते, असे तज्ज्ञांचे मत आहे. मेंदू तल्लख ठेवण्यासाठी नियमित व्यायाम अत्यंत आवश्यक आहे, ज्यामुळे मेंदूतील रक्तभिसरण सुधारते. आहारात अक्रोड, बदाम, पालेभाज्या आणि ओमेगा-३ युक्त पदार्थांचा समावेश करावा. तसेच, पुरेशी आणि शांत झोप घेतल्याने स्मृती दृढ होण्यास मदत होते. डिजिटल उपकरणांचा अतिवापर टाळून ध्यानधारणा केल्यास एकाग्रता वाढते. याशिवाय, कोडी सोडवणे किंवा नवीन भाषा शिकण्यासारख्या आव्हानात्मक उपक्रमांमुळे मेंदू सक्रिय राहतो. या आरोग्यदायी सवयींचा अवलंब केल्यास मानसिक थकवा दूर होऊन विचार करण्याची क्षमता विस्तारते, असे तज्ज्ञांचे मत आहे. अभिनेत्री तारा सुतारिया आणि वीर पहाड़ियाचा ब्रेकअप; एपी ढिल्लोंच्या कॉन्सर्टमधील वादाची चर्चा बॉलीवूड अभिनेत्री तारा सुतारिया आणि तिचा प्रियकर वीर पहाड़िया यांच्यात ब्रेकअप झाल्याचे वृत्त समोर आलेय. २०२५ च्या सुरुवातीला डेटिंग सुरू केल्यानंतर जुलै महिन्यात या दोघांनी आपले नाते जाहीर केले होते. मात्र, फिल्मफेअरच्या ताज्या अहवालानुसार, हे जोडपे आता शांतपणे एकमेकांपासून वेगळे झालेय. नुकत्याच झालेल्या एपी ढिल्लोंच्या मुंबई कॉन्सर्टनंतर त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चांना उधाण आले. या कार्यक्रमात तारा आणि एपी ढिल्लोंच्या केमिस्ट्रीचे कौतुक झाले, तर गर्दीत उभा असलेला वीर काहीसा नाराज दिसल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यानंतर सोशल मीडियावर ‘पेड पीआर’द्वारे आपल्या प्रतिमेला धक्का लावण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही ताराने केला होता. अद्याप दोघांनीही या ब्रेकअपवर अधिकृत भाष्य केलेले नाही. ‘रोहितच आमचा कर्णधार’, जय शाहांचे विधान चर्चेत; 2 ट्रॉफी जिंकून संपवला भारताचा दुष्काळ भारत आणि श्रीलंकेत ७ फेब्रुवारीपासून टी-२० विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेपूर्वी मुंबईतील एका सोहळ्यात आयसीसी चेअरमन जय शाह यांनी मोठे विधान केले. सध्याचा कर्णधार सूर्यकुमार यादव मंचावर उपस्थित असतानाही शाह यांनी रोहित शर्माचा उल्लेख ‘आमचा कर्णधार’ असा केला. शाह म्हणाले की, “रोहितने आपल्याला दोन मोठ्या ट्रॉफी जिंकून दिल्यात, त्यामुळे माझ्यासाठी तोच कर्णधार आहे.” रोहितने २०२४ चा टी-२० विश्वचषक आणि २०२५ ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून भारताचा दुष्काळ संपवलाय. आता घरच्या मैदानावर होणाऱ्या २०२६ च्या विश्वचषकात जेतेपद राखण्याची आणि रोहितचा वारसा पुढे नेण्याची मोठी जबाबदारी सूर्यकुमार यादववर असेल.