देवाच्या मनात असेल तर तेही होईल : ठाकरे राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील यशावर समाधान व्यक्त केले असले, तरी बहुमताचा आकडा गाठता न आल्याबद्दल खंत व्यक्त केली. मुंबईचा महापौर शिवसेनेचाच व्हावा ही इच्छा आजही कायम आहे, देवाच्या मनात असेल तर तेही होईल, असे म्हणत त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली. शिवाजी पार्कवरील सभांना होणारी गर्दी आणि प्रत्यक्ष मतदान यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी निवडणूक प्रक्रियेवर शंका घेतली. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता, ‘साम-दाम-दंड-भेद’ वापरून निवडणुका लढवल्या गेल्याचा आरोप केला. गद्दारांना मुंबईकर माफ करणार नाहीत, असेही ठाकरे यावेळी म्हणाले. भाजपने कागदावर शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला असला, तरी जमिनीवरची शिवसेना ते कधीच संपवू शकणार नाहीत, असेही ठाकरे म्हणाले. नगरसेवक हॉटेलमध्ये, उपमुख्यमंत्री बैठकीला गैरहजर; मुंबई महापौर निवडीसाठी राजकीय खलबते मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपा-शिवसेना शिंदे गट महायुतीने ११४ चा बहुमताचा आकडा पार करत ऐतिहासिक विजय मिळवलाय. या विजयानंतर महापौर निवडीपर्यंत नगरसेवकांची एकजूट कायम राखण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘हॉटेल पॉलिटिक्स’ सुरू केले असून, पक्षाच्या नगरसेवकांना वांद्रे येथील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये स्थलांतरित करण्यात आलेय. दुसरीकडे, या राजकीय घडामोडींदरम्यान झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. सलग २५ वर्षांनंतर ठाकरे गटाची सत्ता संपुष्टात आली असून, आता अडीच-अडीच वर्षांच्या संभाव्य फॉर्म्युल्यानुसार मुंबईचा महापौर कोण होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेय. खचू नका, नव्या जोमाने कामाला लागा; अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सल्ला नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अंदाज चुकल्याची कबुली त्यांनी दिली. पुणे आणि पिंपरी-चिंचवडसारख्या बालेकिल्ल्यात पक्षाला अपेक्षित यश मिळाले नसले, तरी पराभवाने खचून न जाता कार्यकर्त्यांनी पुन्हा जोमाने कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले. आगामी जिल्हा परिषद निवडणुकांचे निर्णय स्थानिक पदाधिकारी घेतील, असे स्पष्ट करतानाच त्यांनी महायुतीमधील सहकार्य कायम असल्याचे सांगितले. दरम्यान, पवार कुटुंब कौटुंबिक स्तरावर नेहमी एकत्रच असेल, असेही त्यांनी यावेळी आवर्जून नमूद केले. प्रजासत्ताक दिनावर दहशतवादी सावट; दिल्लीसह प्रमुख शहरांत ‘हाय-अलर्ट’ येत्या २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनापूर्वी दिल्लीसह देशातील अनेक मोठ्या शहरांवर खालिस्तानी आणि बांगलादेशी दहशतवादी संघटनांच्या हल्ल्याचे सावट असल्याने सुरक्षा यंत्रणांनी ‘हाय-अलर्ट’ जारी केलाय. गुप्तचर विभागाच्या अहवालानुसार, परदेशात बसलेले खालिस्तानी हँडलर्स आता पंजाबमधील स्थानिक गँगस्टर्सच्या मदतीने घातपात घडवण्याचा कट रचत आहेत. हे गुन्हेगारी नेटवर्क हरियाणा, दिल्ली-NCR, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये सक्रिय झालेय. या पार्श्वभूमीवर दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून अँटी-ड्रोन सिस्टिम आणि फेस-रिकग्निशन कॅमेऱ्यांद्वारे प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जातेय. पोलिसांनी नागरिकांनाही अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन केलेय. देशातील पहिल्या ‘वंदे भारत’ स्लीपर ट्रेनचा शुभारंभ; अमेरिका आणि युरोपला मागे टाकत आहोत – मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मालदा टाउन स्टेशनवरून हावडा-गुवाहाटी कामाख्या दरम्यान धावणाऱ्या देशातील पहिल्या ‘वंदे भारत’ स्लीपर ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. या आधुनिक ट्रेनमुळे प्रवाशांना विमानासारखा सुखद अनुभव मिळणार असून प्रवासाचा वेळ अडीच तासांनी कमी होणार आहे. यावेळी पंतप्रधानांनी ३,२५० कोटी रुपयांच्या विविध रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांचे लोकार्पण व पायाभरणी केली. तसेच, उत्तर बंगालला देशाच्या इतर भागांशी जोडणाऱ्या चार नवीन ‘अमृत भारत एक्सप्रेस’ गाड्यांनाही त्यांनी रवाना केले. भारतीय रेल्वे आता आत्मनिर्भर होत असून तंत्रज्ञानाच्या बाबतीत आपण अमेरिका आणि युरोपला मागे टाकत आहोत, असे प्रतिपादन मोदींनी यावेळी केले. या प्रकल्पांमुळे बंगाल आणि ईशान्य भारताच्या विकासाला मोठी गती मिळण्याची शक्यता आहे. व्हॉट्सॲप प्रायव्हसी सुरक्षेसाठी 8 महत्त्वाच्या टिप्स; टू-स्टेप व्हेरिफिकेशन सक्रिय करा व्हॉट्सॲपचा वाढता वापर पाहता ऑनलाइन स्कॅमपासून वाचण्यासाठी प्रायव्हसी सेटिंग्स अपडेट करणे आवश्यक आहे. यासाठी प्रथम सेटिंगमधील प्रायव्हसीमध्ये जाऊन ‘लास्ट सीन’, ‘ऑनलाइन स्टेटस’ आणि ‘प्रोफाईल फोटो’ची विजिबिलिटी मर्यादित करा. टू-स्टेप व्हेरिफिकेशन सक्रिय केल्याने दुहेरी सुरक्षा मिळते. वैयक्तिक संभाषणासाठी ‘चैट लॉक’ आणि ठराविक काळानंतर मेसेज गायब होण्यासाठी ‘डिसअपीयरिंग मेसेज’ फिचर वापरा. अनोळखी कॉल्सपासून संरक्षण मिळवण्यासाठी ॲडव्हान्स सेटिंगमध्ये ‘आयपी ॲड्रेस प्रोटेक्ट’ करा. याशिवाय ऑटोमॅटिक मीडिया डाउनलोड आणि रीड रिसिप्ट बंद ठेवल्याने स्कॅमर्सना तुमची ॲक्टिव्हिटी ट्रॅक करणे कठीण होते. या सोप्या उपायांमुळे तुमचे व्हॉट्सॲप चॅट्स आणि वैयक्तिक माहिती अधिक सुरक्षित राहण्यास मदत होईल. फॉर्च्युनरला टक्कर देणार एमजी मॅजेस्टर? 12 फेब्रुवारीला होणार लाँच जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडिया आगामी १२ फेब्रुवारी रोजी भारतीय बाजारपेठेत आपली नवीन फ्लॅगशिप एसयूव्ही ‘एमजी मॅजेस्टर’ लाँच करणार आहे. ही आलिशान एसयूव्ही सध्याच्या टोयोटा फॉर्च्युनरला जोरदार टक्कर देईल असा अंदाज आहे. ५ मीटरपेक्षा जास्त लांबी असलेल्या या गाडीचा आकार फॉर्च्युनरपेक्षा मोठा असून यामध्ये १९ ते २० इंचाचे डायमंड-कट अलॉय व्हील्स देण्यात आलेत. या गाडीत १२.३ इंचाची टचस्क्रीन, पॅनोरॅमिक सनरूफ आणि लेव्हल २ एडास (ADAS) सारखी प्रगत सुरक्षा वैशिष्ट्ये मिळतील. मॅजेस्टरमध्ये २.० लिटरचे सिंगल आणि ट्विन-टर्बो डिझेल इंजिन पर्याय उपलब्ध असतील, जे ८-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आणि ४-व्हील ड्राइव्ह सिस्टमशी जोडलेले असतील. ५० लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत ही गाडी लाँच होण्याची शक्यता आहे. टोल नाके पूर्णपणे कॅशलेस होणार; रोख व्यवहार बंद होणार देशातील टोल नाक्यांवरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी केंद्र सरकारने १ एप्रिलपासून सर्व टोल प्लाझा पूर्णपणे कॅशलेस करण्याचा निर्णय घेतलाय. या नवीन नियमानुसार वाहनचालकांना केवळ फास्टॅग किंवा UPI द्वारेच टोल भरता येईल, रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक सचिव व्ही. उमाशंकर यांनी या बदलाची माहिती दिली असून सध्या २५ टोल नाक्यांवर याची प्रायोगिक तत्त्वावर चाचणी सुरू आहे. या निर्णयामुळे इंधनाची बचत, टोल वसुलीत पारदर्शकता आणि प्रवासाचा वेग वाढण्यास मदत होईल. भविष्यात फिजिकल बॅरियरमुक्त टोलिंग प्रणाली लागू करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात असून वाहनचालकांनी आपले फास्टॅग खाते सक्रिय ठेवणे आता अनिवार्य ठरेल. बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकाला जीवे मारण्याची धमकी; बिश्नोई गँगकडून खंडणीची मागणी प्रसिद्ध गायक बी प्राक याला लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य आरजू बिश्नोई याने जीवे मारण्याची धमकी दिली असून १० कोटी रुपयांची खंडणी मागितलीय. ही धमकी थेट बी प्राकला न देता, त्याचा मित्र आणि पंजाबी गायक दिलनूर बबलू याच्या मोबाईलवर व्हॉइस मेसेजद्वारे पाठवण्यात आलीय. एका आठवड्यात पैसे न दिल्यास गंभीर परिणाम भोगवे लागतील, असा इशारा त्यात देण्यात आलाय. या धक्कादायक प्रकारानंतर दिलनूरने मोहाली पोलिसांत तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी परदेशी नंबरवरून आलेल्या या कॉलचा तपास सुरू केलाय. या घटनेमुळे संगीत विश्वात खळबळ उडाली असून बी प्राकच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. पाण्याच्या संकटामुळे शुबमन गिल सतर्क; सुरक्षेसाठी ३ लाखांचे विशेष मशीन सोबत भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील निर्णायक सामन्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिल एका विशेष वॉटर प्युरिफायरमुळे चर्चेत आलाय. इंदूरमधील भागीरथपुरा भागात दूषित पाण्यामुळे २० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याने गिलने स्वतःच्या सुरक्षेसाठी ३ लाख रुपयांचे हाय-टेक मशीन आपल्या हॉटेल रूममध्ये बसवलेय. केवळ पाणीच नाही, तर अन्नाच्या बाबतीतही बीसीसीआयने खबरदारी घेतलीय. खेळाडूंसाठी विशेष शेफ सोबत असून विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यासाठी त्यांच्या डाएटनुसार वैयक्तिक जेवण तयार केले जातेय. इंदूरमधील भीषण जलसंकटाच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंचा फिटनेस राखण्यासाठी ही पावले उचलली गेलीत.