गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या राजीनाम्याची मागणी – मुख्यमंत्र्यांचे अभय असल्यामुळेच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी राज्यात ‘थैमान’ घातलेय, त्यांनी पुण्यातील एका कुख्यात गुंडाच्या भावाला, ज्याच्यावर खून आणि खंडणीचे गुन्हे दाखल होते, त्याला शस्त्र परवाना मंजूर केलाय. परब यांनी कदम यांच्या हाकालपट्टीची मागणी करत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे सांगितलेय. घायवळ शस्त्र परवान्यावर कदमांची प्रतिक्रिया – पुण्यात दहशत निर्माण करणारा कुख्यात गुंड नीलेश घायवळचा भाऊ सचिन याला शस्त्र परवाना देण्यासाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शिफारस केल्याची माहिती समोर आलीये. विरोधी पक्षाकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जातेय. यावर कदम यांनी प्रतिक्रिया दिलीय. “माझ्यावर आरोप करणाऱ्यांना कदाचित माहिती नसेल की संबंधित पोलीस आयुक्तांच्या स्वाक्षरीने शस्त्र परवाना दिला जातो. प्रलंबित गुन्हा असलेल्या किंवा गुन्हा दाखल असलेल्या व्यक्तीला शस्त्र परवाना देण्याची शिफारस मी कधीच केली नाही.” आता कुणबी समाजाचा आझाद मैदानात ठिय्या – राज्यातील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आता ओबीसी समाजानेही आक्रमक भूमिका घेतलीये. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानावर केलेल्या बेमुदत उपोषणानंतर राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य करत शासन निर्णय जारी केला. या निर्णयानंतर कुणबी आणि ओबीसी समाजात तीव्र असंतोष निर्माण झालाय. आरक्षणातील त्यांच्या हक्कांवर गदा येत असल्याचा आरोप करत आज मुंबईच्या आझाद मैदानात कुणबी समाजाने शक्तीप्रदर्शनासह आंदोलनाचा निर्धार व्यक्त केला. एसटी कर्मचारीही संपावर जाणार – विद्युत क्षेत्रातील खासगीकरणाविरोधात राज्यातील महावितरण, महापारेषण, महानिर्मिती कंपनीतील अधिकारी- कर्मचारी महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अभियंता अधिकारी कृती समितीच्या नेतृत्वात बुधवारी मध्यरात्रीपासून संपावर गेले आहे. त्यामुळे वीज यंत्रणा सलाईनवर असतांनाच महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीकडून एसटी कर्माऱ्यांच्या विविध मागणीसाठी १३ ऑक्टोबरपासून आंदोलनाची घोषणा केली गेली आहे. प्रत्येक घरात एक सरकारी नोकरी – तेजस्वी बिहार विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजलाय. येथील निवडणुका दोन टप्प्यांत होणार आहेत. ६ आणि ११ नोव्हेंबरला मतदान होईल आणि १४ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केलीय. आरजेडीचे नेते तथा बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी एक मोठी घोषणा केलीय. बिहारमध्ये आमचं सरकार आल्यानंतर प्रत्येक घरात एक सरकारी नोकरी देण्याच्या संदर्भातील कायदा करणार असल्याची घोषणा त्यांनी केलीय. हंगेरियन लेखक लास्झलो यांना साहित्यातील नोबेल – या वर्षीचा साहित्यातील नोबेल पुरस्कार हंगेरियन लेखक लास्झलो क्रास्नाहोरकाई यांना मिळालाय. स्वीडनच्या स्वीडिश अकादमीने याची घोषणा केली. लास्झलो क्रॅस्नाहोरकाई हे खोलवर विचार करायला लावणाऱ्या, उदासीन कथा लिहितात. त्यांच्या “सॅटांटांगो” आणि “द मेलान्कोली ऑफ रेझिस्टन्स” या पुस्तकांवरून चित्रपट बनवले गेले आहेत. विजेत्याला ११ दशलक्ष स्वीडिश क्रोनर अर्थात १०.३ कोटी रुपये, सुवर्णपदक आणि प्रमाणपत्र मिळेल. हा पुरस्कार १० डिसेंबर रोजी स्टॉकहोममध्ये प्रदान केला जाईल. ब्रिटनची 9 विद्यापीठे भारतात कॅम्पस उघडणार – ब्रिटनची 9 विद्यापीठे भारतात आपला कॅम्पस सुरू करतील अशी घोषणा ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी मुंबईत केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी स्टार्मर यांच्या नेतृत्वात भारत-ब्रिटन संबंधांत मोठी प्रगती झाल्याचे स्पष्ट केले. मोदींच्या गत जुलै महिन्यातील लंडन दौऱ्यात दोन्ही देशांनी व्यापक आर्थिक आणि व्यापार करारावर स्वाक्षरी केली होती. मोदींनी सांगितले की, या करारामुळे दोन्ही देशांमधील आयात सुलभ होईल, व्यापार वाढेल आणि तरुणांना रोजगार मिळेल. शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स, निफ्टी वधारले – भारतीय शेअर बाजारात आज गुरुवारी पुन्हा एकदा तेजी परतली. एक दिवसाच्या घसरणीनंतर बाजाराने आज दमदार पुनरागमन केले. सेन्सेक्स 398 अंकांनी वाढून 82,172 वर बंद झाला, तर निफ्टी 135 अंकांनी वाढून 25,181वर स्थिरावला. फार्मा, आयटी आणि मेटल क्षेत्रातील शेअर्समध्ये झालेल्या जोरदार खरेदीमुळे बाजाराला भक्कम आधार मिळाला. परदेशी गुंतवणूकदारांच्या सलग दुसऱ्या दिवशीच्या खरेदीमुळे बाजारातील गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला. सारा खानने केले दुसरे लग्न – “बिदाई” आणि “बिग बॉस” फेम अभिनेत्री सारा खान पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकलीय. अभिनेत्रीने तिचा जुना प्रियकर, अभिनेता-निर्माता क्रिश पाठकसोबत नोंदणी लग्न केलंय. दोघांनी ६ ऑक्टोबर रोजी जवळच्या मित्रांसमोर नोंदणी पद्धतीने लग्न केलं. आता हे जोडपे डिसेंबरमध्ये एक भव्य विवाह सोहळा साजरा करणार आहे. साराने इंस्टाग्रामवर त्यांच्या लग्नाची आनंदाची बातमी शेअर केलीय. क्रिकेटपटू रिंकू सिंगकडे खंडणीची मागणी – भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंगला दाऊद इब्राहिमच्या डी-कंपनीच्या नावाने 10 कोटी रुपये खंडणीची मागणी करणारी धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी आरोपी मोहम्मद दिलशाद नौशाद याला अटक केली असून, त्याच्याकडून चौकशीदरम्यान रिंकू सिंग यांच्याविरोधातील खंडणीच्या धमकीचा खुलासा झाला.