‘PADU’ यंत्रावरून राजकीय वाद; राज ठाकरेंनी उपस्थित केले प्रश्न मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर PADU मशीन म्हणजेच प्रिंटींग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट या नवीन यंत्राच्या समावेशामुळे राजकीय वातावरण तापलेय. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी या यंत्राच्या पारदर्शकतेवर संशय व्यक्त करत, “आधी माहिती का दिली नाही?” असा सवाल केलाय. प्रशासक भूषण गगराणी यांनी स्पष्ट केले की, PADU हे स्वतंत्र मतदान यंत्र नसून केवळ तांत्रिक बिघाड झाल्यास वापरले जाणारे ‘बॅकअप’ यंत्र आहे. ईव्हीएममधील कंट्रोल युनिटमध्ये बिघाड झाल्यास, आधीच नोंदवलेली मते पाहण्यासाठी याचा वापर होईल. मुंबई महापालिकेला अशी १४० यंत्रे प्राप्त झाली आहेत. तांत्रिक सुविधेसाठी हे यंत्र असले तरी, राजकीय पक्षांनी मात्र निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेय. भंडाऱ्यात निर्दयीपणाचा कळस! फेकून दिलेली नवजात बालिका सापडली जिवंत माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्यातील लाखणी येथे उघडकीस आलीय. पिंपळगाव सडक परिसरात एका झाडाखाली काळ्या प्लास्टिक बॅगेत बांधून फेकून दिलेली १० दिवसांची नवजात बालिका जिवंत सापडली. बॅगेतील हालचाल पाहून वाटसरूंनी पोलिसांना पाचारण केले. लाखणी पोलिसांनी तत्परता दाखवत चिमुकलीला तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले असून सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. अनैतिक संबंधातून हा प्रकार घडला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. या प्रकरणी अज्ञात पालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे. ‘हरिजन’ आणि ‘गिरिजन’ शब्दांच्या वापरावर बंदी; हरियाणा सरकारचे कडक आदेश हरियाणा सरकारने प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणि घटनात्मक भाषेचा आदर राखण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललेय. राज्यातील सर्व सरकारी विभाग, सार्वजनिक संस्था आणि शैक्षणिक संस्थांमध्ये ‘हरिजन’ आणि ‘गिरिजन’ या शब्दांच्या वापरावर आता पूर्णपणे बंदी घालण्यात आलीय. मिळालेल्या माहितीनुसार, यापुढे कोणत्याही सरकारी दस्तऐवजात, पत्राचारात किंवा आदेशांमध्ये या शब्दांचा प्रयोग टाळून त्याऐवजी ‘अनुसूचित जाती’ SC आणि ‘अनुसूचित जमात’ ST या घटनात्मक संज्ञांचा वापर करणे अनिवार्य असेल. काही विभागांमध्ये अजूनही जुन्या शब्दांचा वापर होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सरकारने हे कडक निर्देश जारी केलेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुचवलेल्या घटनात्मक ओळखीला प्राधान्य देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. ‘त्या’ तरुणीच्या नादाने तरुणाने गमावले 2 कोटी; ऑनलाइन मैत्री पडली महागात सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तीशी केलेली मैत्री किती घातक ठरू शकते, याचा प्रत्यय लखनऊमध्ये आलाय. ‘भाविका शेट्टी’ नावाच्या तरुणीशी व्हॉट्सॲपवर मैत्री करणे एका तरुणाला तब्बल १ कोटी ९२ लाख रुपयांना पडलेय. विशेष म्हणजे, ज्या तरुणीवर विश्वास ठेवून ही गुंतवणूक केली, ती प्रत्यक्षात एक पुरुष असल्याचे तपासात उघड झालेय. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी इमरान गाजी वय ३४ याने बनावट ओळख निर्माण करून पीडित सुलभ पांडे यांच्याशी संवाद साधला. गुंतवणुकीवर भरघोस परताव्याचे आमिष दाखवून त्याने वेळोवेळी १ कोटी ९२ लाख रुपये उकळले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडिताने तक्रार नोंदवली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून मंगळवारी आरोपीला बेड्या ठोकल्या. आरोपीने बनावट आधार आणि पॅनकार्डच्या मदतीने विविध बँकांमध्ये खाती उघडून हा व्यवहार केला होता. सायबर पोलीस आता या प्रकरणातील इतर साथीदारांचा शोध घेत आहेत. भारतीय नागरिकांना त्वरित इराण सोडण्याचे आवाहन; सुमारे 2500 हून अधिक लोकांचा मृत्यू इराणमधील ढासळलेली अर्थव्यवस्था आणि चलनातील घसरणीमुळे सुरू झालेल्या आंदोलनाने आता हिंसक वळण घेतले असून, यात आतापर्यंत सुमारे 2500 हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने आपल्या नागरिकांसाठी तातडीची ‘ट्रॅव्हल ॲडव्हायझरी’ जारी केलीय. परराष्ट्र मंत्रालयाने भारतीयांना पुढील सूचना मिळेपर्यंत इराणचा प्रवास न करण्याचा सल्ला दिलाय. तसेच, तेथे वास्तव्यास असलेल्या अंदाजे १०,००० भारतीय नागरिक, विद्यार्थी आणि व्यावसायिकांना लवकरात लवकर इराण सोडण्यास सांगितलेय. इराणच्या या परिस्थितीवर अमेरिका आणि भारताचे बारीक लक्ष असून परिस्थिती गंभीर होत असल्याचे दिसत आहे. चांदीचा प्रति किलो दर 2,87,990 रुपयांवर; ही आहेत भाववाढीची 5 कारणे जागतिक बाजारातील अनिश्चिततेमुळे बुधवारी चांदीच्या दराने ऐतिहासिक उच्चांक गाठला. MCX वर चांदीचा भाव एकाच दिवसात १२,८०३ रुपयांनी वधारून प्रति किलो २,८७,९९० रुपयांवर पोहोचलाय. व्हेनेझुएला, इराण आणि रशिया-युक्रेनमधील वाढता भू-राजकीय तणाव. डॉलरचे घसरलेले मूल्य, ज्यामुळे मौल्यवान धातूंना मागणी वाढलीय. गुंतवणूकदारांचा चांदीवरील वाढता विश्वास. सोलर पॅनेल आणि इलेक्ट्रिक वाहनांमुळे वाढलेली औद्योगिक मागणी. मागणीच्या तुलनेत जागतिक स्तरावर असलेला पुरवठ्याचा तुटवडा. ही चांदीच्या दरवाढी मागे कारणे सांगितली जात आहे. तज्ज्ञांच्या मते, चांदीचा कल सध्या सकारात्मक असला तरी यात मोठी अस्थिरता असू शकते. किंमत ३ लाखांपर्यंत जाण्याची शक्यता असली, तरी गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगून दीर्घकालीन विचार करावा, असा सल्ला देण्यात आलाय. आता व्हॉट्सॲपवर मिळणार आधार कार्ड; जाणून घ्या सोपी पद्धत आधार कार्ड आता अधिक सोप्या पद्धतीने थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर उपलब्ध झालेय. केंद्र सरकारच्या ‘MyGov Helpdesk’ या सुविधेमुळे नागरिकांना आता कोठेही न जाता मोबाईलवरच आधार कार्ड डाऊनलोड करता येईल. यासाठी तुम्हाला फक्त ९०१३१५१५१५ हा सरकारी क्रमांक फोनमध्ये सेव्ह करून त्यावर व्हॉट्सॲपवरून ‘नमस्ते’ असा मेसेज पाठवावा लागेल. त्यानंतर चॅटमध्ये विचारल्याप्रमाणे डिजीलॉकर पर्याय निवडून तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल. तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर एक ओटीपी येईल, तो दिल्यावर लगेच आधार कार्डची पीडीएफ फाईल तुम्हाला मिळेल. ही सेवा पूर्णपणे सुरक्षित असून यामुळे कागदपत्रे सोबत बाळगण्याची चिंता मिटली आहे. केवळ एका मेसेजवर आधार उपलब्ध झाल्याने सर्वसामान्यांची मोठी सोय झालीय. ट्रकसोबतच्या भीषण धडकेत टाटा पंच ठरली सरस; सुरक्षेच्या चाचणीत पटकावले ‘5 स्टार’ रेटिंग टाटा मोटर्सने आपल्या लोकप्रिय ‘टाटा पंच’चे २०२६ चे नवीन अपडेटेड मॉडेल बाजारात दाखल केले असून, सुरक्षेच्या बाबतीत या कारने नवा इतिहास रचलाय. नुकत्याच झालेल्या क्रॅश टेस्टमध्ये या कारची एका अवजड ट्रकसोबत जोरदार टक्कर करण्यात आली. या भीषण अपघातात कारच्या बोनटचे नुकसान झाले असले, तरी प्रवाशांची केबिन आणि आतील डमी पूर्णपणे सुरक्षित राहिले. भारत एनसीएपी द्वारे करण्यात आलेल्या या चाचणीत नवीन पंचला प्रौढ आणि लहान मुलांच्या सुरक्षेसाठी ‘५-स्टार’ रेटिंग मिळालेय. ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी आता सर्व व्हेरिएंटमध्ये ६ एअरबॅग्स अनिवार्य करण्यात आल्यात. या कारची सुरुवातीची किंमत ५.५९ लाख रुपये एक्स शोरूम असून टॉप मॉडेल १०.५४ लाख रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. आधुनिक फीचर्स आणि भक्कम बांधणीमुळे ही कार पुन्हा एकदा चर्चेत आलीय. कियारा आडवाणी ठरली ‘इन्स्टाग्राम क्वीन’; भारतातील सर्वात ‘एंगेजिंग’ अभिनेत्रीचा मान बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री कियारा आडवाणीने सोशल मीडियावर नवा विक्रम प्रस्थापित केलाय. अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या इंडस्ट्री रिपोर्टनुसार, कियारा भारताची ‘मोस्ट एंगेजिंग’ अभिनेत्री ठरली असून तिने दाक्षिणात्य सुपरस्टार विजय थलपती आणि राम पोथिनेनी यांनाही मागे टाकलेय. तिच्या साधेपणा आणि स्टाईलमुळे कियाराचा चाहतावर्ग मोठा आहे. २०२५ मधील ‘मेट गाला’मधील पदार्पणानंतर ती जागतिक स्तरावरही चर्चेत आली. वैयक्तिक आयुष्यात, अलीकडेच तिने मुलगी ‘सरायाह’ची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर केली, ज्याला चाहत्यांनी मोठी पसंती दिली. सध्या कियारा दाक्षिणात्य अभिनेता यशसोबत ‘टॉक्सिक’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त असून, तिचा हा प्रभाव ब्रँड विश्वातही कायम आहे. राजकोटमध्ये केएल राहुलचा ऐतिहासिक धमाका; मोडीत काढला अझरुद्दीनचा विक्रम न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात केएल राहुलने अवघ्या ८७ चेंडूत झंझावाती शतक झळकावले. ९ चौकार आणि १ षटकारासह त्याने नाबाद ११२ धावांची खेळी केली. यासह राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियमवर वनडे शतक ठोकणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरलाय. या शतकासह राहुलने माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांचा ७ शतकांचा विक्रम मागे टाकला. राहुलच्या नावावर आता ९३ सामन्यांत ८ वनडे शतके आहेत. तब्बल दोन वर्षांनंतर राहुलने शतकाचा दुष्काळ संपवला असून, गेल्या ४ डावांतील त्याची ही तिसरी ५० पेक्षा जास्त धावसंख्या आहे. शतक पूर्ण केल्यावर त्याने आपल्या लेकीसाठी केलेले अनोखे सेलिब्रेशन सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.