जिथे शक्य असेल, तिथे युती करा – अमित शहांचा अजित पवार गटाला सल्ला – राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजताच राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांची महत्त्वपूर्ण भेट घेतली. प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनी शाहांशी केलेल्या 15 मिनिटांच्या चर्चेत महापालिका निवडणुकांचे रणनीती ठरवण्यात आली असून, अमित शाह यांनी स्थानिक पातळ्यांवर लवचिक भूमिका घेण्याचे संकेत दिल्याचे समजते. या बैठकीत अमित शाह यांनी अजित पवार गटाला स्पष्ट सूचना दिल्या आहेत. “राज्यात ज्या-ज्या ठिकाणी शक्य असेल, तिथे युती करून निवडणुका लढा,” असा सल्ला शाहांनी दिला आहे. भाजप आणि मित्रपक्षांनी एकत्र येऊन जास्तीत जास्त जागा जिंकण्यावर भर द्यावा, अशी रणनीती आखण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी निकाल घोषित केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या तयारीला वेग आला आहे. तुमचे नाव मतदार यादीत आहे की नाही? – ‘मताधिकार’ ॲपवर घरबसल्या मिळवा माहिती – राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. 15 जानेवारी 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानाच्या दिवशी आपला नंबर कोणत्या केंद्रावर आहे किंवा मतदार यादीत नाव आहे की नाही, यासाठी मतदारांची होणारी धावपळ थांबवण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने यंदा हायटेक पाऊल उचलले आहे. आयोगाने ‘मताधिकार’ हे खास मोबाईल ॲप लाँच केले असून, याद्वारे मतदारांना घरबसल्या सर्व माहिती मिळणार आहे. मतदार यादीतील आपले नाव शोधण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवरून ‘मताधिकार’ हे ॲप डाऊनलोड करा. ॲप ओपन केल्यानंतर Voter List Search असे ऑप्शन येईल. Voter List Search या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपले नाव शोधण्यासाठी दोन सोपे पर्याय देण्यात आले आहेत. नावावरून आणि ओळखपत्र क्रमांकावरून शोधता येईल. माणिकराव कोकाटेंचे मंत्रिपद जाणार? 2 वर्षांच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब- सदनिका घोटाळ्याचे प्रकरण भोवले- नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने आज सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना सदनिका घोटाळ्यात ठोठावलेली 2 वर्षांची शिक्षा कायम ठेवली. लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार 2 वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षा झालेल्या मंत्र्यांचे मंत्रिपद जाते. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोकाटेंचे मंत्रिपद काढून घेणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना मुख्यमंत्री कोट्यातून मिळालेल्या सदनिकांबाबत बनावट कागदपत्रे सादर करून त्या लाटल्याप्रकरणी नाशिक जिल्हा न्यायालयाने प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास व 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. या निकालानंतर अवघ्या दोन तासांत त्यांना जामीन मंजूर झाल्याने कोकाटे यांचे मंत्रीपद तत्काळ धोक्यात आले नव्हते. मात्र, आता या प्रकरणात महत्त्वाचा टप्पा समोर आला असून जिल्हा सत्र न्यायालयानेही त्यांच्यावर सुनावलेली दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवली आहे. बंगालमध्ये SIR ची मसुदा मतदार यादी जाहीर – 58.20 लाख मतदारांची नावे वगळली – निवडणूक आयोगाने मंगळवारी पश्चिम बंगालच्या SIR ची मसुदा मतदार यादी जारी केली आहे. राज्यात 58 लाख 20 हजार 898 मतदारांची नावे वगळण्यासाठी चिन्हांकित करण्यात आली आहेत. यापैकी 24 लाख 16 हजार 852 नावे मृत मतदारांची आहेत. 19 लाख 88 हजार 76 मतदार असे आहेत जे कायमस्वरूपी दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत. याव्यतिरिक्त, 12 लाख 20 हजार 38 मतदार बेपत्ता, 1 लाख 38 हजार 328 दुबार किंवा बनावट, आणि 57 हजार 604 नावे इतर कारणांमुळे वगळण्याच्या प्रस्तावात आहेत. ज्यांची नावे वगळण्यात आली आहेत, ते फॉर्म-6 भरून कागदपत्रांसह दावा करू शकतात. यासोबतच घरोघरी जाऊन माहिती गोळा करण्याचे काम पूर्ण झाले आहे. आता पुढे दावा, आक्षेप आणि सुनावणीची प्रक्रिया सुरू होईल. SIR चा दुसरा टप्पा फेब्रुवारी 2026 पर्यंत चालेल आणि अंतिम मतदार यादी 14 फेब्रुवारी 2026 रोजी जारी केली जाईल. नॅशनल हेराल्ड प्रकरणात मोठा दिलासा – न्यायालयाने ईडीची तक्रार फेटाळली – दिल्लीतील एका न्यायालयाने मंगळवारी नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात काँग्रेस खासदार राहुल गांधी, सोनिया गांधी आणि इतर 5 जणांविरुद्ध दखल घेण्यास नकार दिला. तसेच, अंमलबजावणी संचालनालयाची तक्रार फेटाळून लावली. राऊज एव्हेन्यू कोर्टाचे विशेष न्यायाधीश विशाल गोगने यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, हे प्रकरण कोणत्याही एफआयआरवर आधारित नसून, एका खाजगी तक्रारीवर आधारित आहे. त्यामुळे ईडीने प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट अंतर्गत दाखल केलेली तक्रार विचार करण्यायोग्य नाही. ईडीचा आरोप आहे की, नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राची प्रकाशक, असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड कंपनीच्या 2,000 कोटींहून अधिक मालमत्तांवर फसवणुकीने ताबा मिळवला गेला. ईडीनुसार, मालमत्तेचे अधिग्रहण यंग इंडियन नावाच्या कंपनीमार्फत करण्यात आले, ज्यात गांधी कुटुंबाची बहुसंख्य भागीदारी आहे. ‘मनरेगा’ची जागा ‘विकसित भारत’ घेणार नाव बदलावरून संसदेत गदारोळ – केंद्र सरकारने मंगळवारी १६ डिसेंबर रोजी लोकसभेत ‘विकसित भारत-जी राम जी विधेयक, २०२५’ सादर केले. हे विधेयक महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम (मनरेगा) चे स्थान घेणार आहे. ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी विरोधकांच्या तीव्र गोंधळात हे विधेयक आवाजी मतदानाने मांडले. विधेयकाला विरोध करताना काँग्रेससह विरोधी पक्षांनी महात्मा गांधींचे नाव वगळणे हा त्यांचा अपमान असल्याचे म्हटले. काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी हा रोजगार कायद्याचा हक्क कमकुवत करण्याचा आणि राज्यांवर आर्थिक भार टाकण्याचा प्रयत्न असल्याचे सांगत विधेयक मागे घेण्याची किंवा संसदीय समितीकडे पाठवण्याची मागणी केली. चौहान यांनी विरोधकांचे आरोप फेटाळत, “महात्मा गांधी आमच्या हृदयात आहेत,” असे स्पष्ट केले. या नव्या विधेयकात १२५ दिवसांच्या रोजगाराची हमी देण्यात आली असून त्यासाठी १.५१ लाख कोटी रुपयांहून अधिक निधीची तरतूद केल्याचे त्यांनी सांगितले. भारतात लवकरच ‘फोर डे वर्क वीक’? – तीन दिवसांची ‘सशुल्क’ सुट्टी – केंद्र सरकारने देशातील कामगार कायद्यांमध्ये मोठा बदल करण्याचे संकेत दिले आहेत. ‘फोर डे वर्क वीक’ म्हणजेच आठवड्यातून फक्त चार दिवस काम आणि तीन दिवस सशुल्क सुट्टीचा पर्याय कंपन्यांना उपलब्ध होणार आहे. श्रम मंत्रालयाने नवीन लेबर कोड्समध्ये कामाच्या तासांची विभागणी करण्याची लवचिकता दिली आहे. मात्र, कर्मचाऱ्याला दररोज १२ तास काम करून आठवड्यातील एकूण ४८ तासांचा कोटा पूर्ण करावा लागेल. ४८ तासांपेक्षा जास्त काम झाल्यास, तो ओव्हरटाइम मानला जाईल आणि त्यासाठी दुप्पट मजुरी देण्याचे बंधन कंपन्यांवर असेल. या नव्या नियमांमुळे कंपन्यांना वेळापत्रक ठरवण्याचे स्वातंत्र्य मिळेल, तसेच कर्मचाऱ्यांना त्यांच्या सोयीनुसार कामाचे आणि विश्रांतीचे दिवस निवडता येतील. तथापि, हे पर्याय स्वीकारायचे की नाही, हे कंपन्या आणि कर्मचारी परस्पर सहमतीने ठरवतील. रुपया घसरला, शेअर बाजार कोसळला – प्रमुख निर्देशांक लाल निशाणीत बंद – विदेशी गुंतवणूकदारांची जोरदार विक्री आणि डॉलरसमोर रुपयाची विक्रमी घसरण यामुळे मंगळवारी १६ डिसेंबर रोजी भारतीय शेअर बाजारात नकारात्मक वातावरण राहिले. प्रमुख निर्देशांक लाल निशाणीत बंद झाले. बीएसई सेन्सेक्स ५३३.५० अंकांनी कोसळून ८४,६७९ वर बंद झाला, तर निफ्टी १६७.२० अंकांनी घसरून २५,८६० वर स्थिरावला. विशेष म्हणजे, डॉलरच्या तुलनेत रुपया प्रथमच ९१ चा स्तर ओलांडून ९१.१४ पर्यंत खाली गेला. धातू, बँकिंग आणि रियल्टी क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी विक्री दिसून आली. तज्ज्ञांच्या मते, अस्थिरता कायम राहण्याची शक्यता आहे. या घसरणीचा गुंतवणूकदारांच्या संपत्तीवरही परिणाम झाला. बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ४६७.७० लाख कोटींवर घसरले, जे मागील दिवशी ४७१.०३ लाख कोटी होते. सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ३.३३ लाख कोटींनी घटले. दुसऱ्या शब्दांत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ३.३३ लाख कोटींची घट झाली. बॉर्डर 2 चा टीझर लॉन्च – 23 जानेवारीला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित – अभिनेता सनी देओल अभिनीत ‘बॉर्डर 2’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. मुंबईत आयोजित भव्य टीझर लॉन्च कार्यक्रमात सनी देओल, वरुण धवन आणि अहान शेट्टी उपस्थित होते. त्यांच्यासोबत चित्रपटाचे दिग्दर्शक अनुराग सिंगही मंचावर दिसले. टीझर लॉन्च कार्यक्रमात चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार आणि निधी दत्ता यांच्यासोबत सह-निर्माते शिव चनाना देखील सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, धर्मेंद्र यांच्या निधनानंतर सनी देओलची ही पहिली प्रमोशनल उपस्थिती आहे. ‘बॉर्डर 2’ 23 जानेवारी 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. सनी देओल व्यतिरिक्त यात वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. ‘बॉर्डर’ चा पहिला भाग 1997 मध्ये प्रदर्शित झाला होता, जो हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक ठरला. KKRची ग्रीनसाठी 25 कोटी 20 लाखांची बोली – IPL इतिहासातील सर्वात महागडा विदेशी खेळाडू- आयपीएलच्या १९ व्या हंगामासाठी अबू धाबी येथे झालेल्या मिनी ऑक्शनमध्ये ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू कॅमेरून ग्रीन याला कोलकाता नाईट रायडर्स संघाने विकत घेतले आहे. केकेआरने कॅमेरून ग्रीन सर्वाधिक २५ कोटी २० लाख रुपये इतकी मोठी बोली लावत आपल्या ताफ्यात सामील केले. ज्यामुळे तो यंदाच्या ऑक्शनमधील सर्वात महागडा आणि आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागड विदेशी खेळाडू ठरला आहे. कॅमेरुन ग्रीनने आतापर्यंत आयपीएलमध्ये २९ सामने खेळले आहेत. फलंदाजीत त्याने ४१.५९ च्या सरासरीने ७०७ धावा केल्या आहेत, तर गोलंदाजीत ४१.५ च्या सरासरीने १६ विकेट्स घेतल्या आहेत.