राज्यात 23 महानगरपालिकेत भाजपची सत्ता ? भाजपने पुन्हा इतिहास रचला – फडणवीस राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी आज मतमोजणी होतेय. ८९३ वॉर्डमध्ये एकूण १५,९३१ उमेदवारांनी निवडणूक लढवली. सायंकाळी 5 वाजेपर्यंत मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नवी मुंबई, कोल्हापूर, सांगली मिरज कुपवाड , सोलापूर, अहिल्यानगर, नांदेड, जळगाव, जालना, अकोला, पनवेल, मिरा-भाईंदर , धुळे, पिंपरी-चिंचवडसह एकूण 23 ठिकाणी भारतीय जनता पक्ष आघाडीवर होता. लातूरमध्ये काॅंग्रेसला तर परभणीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाला एकहाती सत्ता मिळालीय. महानगरपालिका निवडणुकीतील विजयाबद्दल मुंबईतील भाजप कार्यालयात जल्लोष साजरा करण्यात येत होता. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले. यावेळी भाजपचे पंकजा मुंडे, आशिष शेलार, चित्रा वाघ, मंगलप्रभात लोढा यांसह इतर नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपने पुन्हा इतिहास रचला, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नितीन नवीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष होणार; 20 जानेवारीला होणार अधिकृत घोषणा भारतीय जनता पार्टीच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला असून, येत्या २० जानेवारीला पक्षाला नवे नेतृत्व मिळणार आहे. सध्याचे कार्याध्यक्ष नितिन नवीन यांची या पदावर बिनविरोध निवड होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. के. लक्ष्मण यांनी या निवडीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केलाय. या कार्यक्रमानुसार, १९ जानेवारीला दुपारी २ ते ४ या वेळेत उमेदवारी अर्ज भरले जातील. २० जानेवारीला मतमोजणी होऊन नूतन अध्यक्षांच्या नावाची घोषणा केली जाईल. ४५ वर्षीय नितीन नवीन हे बिहारमधील बांकीपूरचे पाचवेळा आमदार राहिले असून, ते भाजपचे आतापर्यंतचे सर्वात तरुण अध्यक्ष ठरू शकतात. जे.पी. नड्डा यांचा कार्यकाळ संपल्यानंतर १४ डिसेंबर रोजी त्यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. अमेरिका-इराण संघर्ष, मध्यपूर्वेत युद्धाची ठिणगी; पुढील 48 तास जगासाठी निर्णायक २०२६ वर्षाची सुरुवात जागतिक तणावाने झालीय. इराणमधील अंतर्गत बंडाळी आणि अमेरिकेची वाढती लष्करी हालचाल यामुळे मध्यपूर्वेत महायुद्धाची चिन्हे दिसत आहेत. इराणने सुरक्षेच्या कारणास्तव आपली हवाई सीमा पूर्णपणे बंद केलीय, तर अमेरिकेने प्रत्युत्तर म्हणून ‘यूएसएस अब्राहम लिंकन’ ही अण्वस्त्रसज्ज युद्धनौका तैनात केलीय. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमध्ये शांतता प्रस्थापित होत असल्याचा दावा केला असला, तरी अमेरिकेचे लष्करी पाऊल अधिक आक्रमक दिसतेय. या संघर्षाचा सर्वाधिक फटका भारताला बसण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यास भारतात महागाई वाढू शकते. तसेच, इराणमध्ये राहणाऱ्या हजारो भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, केंद्र सरकारने त्यांना मायदेशी आणण्यासाठी हालचाली सुरू केल्यात. पुढचे ४८ तास जगासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. दहशतवाद्यांकडून 26/11 सारख्या हल्ल्याची धमकी; सागरी सीमांवर ‘हाय अलर्ट’ भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशानंतर हताश झालेल्या लष्कर-ए-तैयबाचा डेप्युटी चीफ सैफुल्ला कसूरी याने भारताला पुन्हा सागरी मार्गाने हल्ल्याची धमकी दिलीय. पाकिस्तानच्या मुरीदके येथे बोलताना कसूरीने “२०२६ मध्ये समुद्रावर आमचे वर्चस्व असेल,” असे प्रक्षोभक विधान केले. भारतीय हवाई दलाने केलेल्या कारवाईमुळे दहशतवादी संघटनांमध्ये खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर लष्कर आपल्या ‘वॉटर फोर्स’द्वारे मुंबईतील २६/११ सारखा कट रचण्याच्या तयारीत असल्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी वर्तवलीय. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर, लष्करचे शेकडो प्रशिक्षित स्कूबा डायव्हर्स सक्रिय असल्याची माहिती समोर आलीय. खबरदारीचा उपाय म्हणून भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाने सागरी सीमांवर कडक गस्त वाढवत ‘हाय अलर्ट’ जारी केलाय. रुपया आतापर्यंतच्या नीचांकी पातळीवर; डॉलरच्या तुलनेत ९०.८४ वर बंद कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून सुरू असलेल्या सातत्यपूर्ण विक्रीमुळे शुक्रवारी भारतीय रुपया ५० पैशांनी घसरून ९०.८४ वर बंद झाला. ही गेल्या दोन महिन्यांतील एका दिवसातील सर्वात मोठी घसरण ठरलीय. जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता आणि अमेरिकेतील उत्पादक क्षेत्रातील सकारात्मक आकडेवारीमुळे डॉलर अधिक मजबूत झालाय. तसेच, भारताची व्यापारी तूट वाढल्याने रुपयावर दबाव निर्माण झालाय. बाजार तज्ज्ञांच्या मते, भारत-अमेरिका व्यापार कराराबाबतची अनिश्चितता आणि भू-राजकीय तणावामुळे रुपया नजीकच्या काळात ९०.५० ते ९१.२५ च्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, गुरुवारी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमुळे स्थानिक विदेशी मुद्रा बाजार बंद होता. पैसे चुकीच्या खात्यात गेले? घाबरू नका; RBI चा नवा नियम वाचवेल तुमचे हजारो रुपये डिजिटल पेमेंटच्या युगात घाईघाईत चुकीच्या UPI आयडीवर पैसे पाठवले जाण्याच्या घटना वाढल्या आहेत. मात्र, अशा वेळी घाबरून न जाता काही सोप्या स्टेप्स फॉलो केल्यास पैसे परत मिळवता येतात. पैसे परत मिळवण्यासाठी सर्वात आधी संबंधित UPI ॲपच्या उदा. Google Pay, PhonePe ‘सपोर्ट’ सेक्शनमध्ये तक्रार नोंदवा. त्यानंतर आपल्या बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधून ट्रांजॅक्शन रेफरन्स नंबर द्यावा. जर बँकेकडून प्रतिसाद मिळाला नाही, तर NPCI च्या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी. शेवटचा पर्याय म्हणून RBI च्या बँकिंग लोकपालकडे दाद मागता येईल. २०२६ मध्ये UPI व्यवहारांनी १५ अब्जांचा टप्पा ओलांडला असून यंत्रणा अधिक मजबूत झालीय. तरीही, मोठी रक्कम पाठवण्यापूर्वी नाव-नंबरची खात्री करणे हाच सुरक्षिततेचा सर्वोत्तम उपाय असल्याचे तज्ज्ञ सांगतात. टाटा सिएरा SUV डिलिव्हरी सुरु; वेटिंग पिरियड साधारण 1 ते 2 महिने टाटा मोटर्सच्या बहुप्रतिक्षित ‘सिएरा’ SUV ची डिलिव्हरी १५ जानेवारीपासून अधिकृतपणे सुरू झालीय. १६ डिसेंबर २०२५ रोजी प्री-बुकिंग करणाऱ्या पहिल्या ७०,००० ग्राहकांना प्राधान्याने कार सोपवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, कंपनीने ‘आधी येईल त्यास प्राधान्य’ या तत्त्वावर डिलिव्हरी देण्याचे जाहीर केले असून, कोणत्याही विशिष्ट व्हेरिएंटला झुकते माप दिले जाणार नाही. सिएराची सुरुवातीची किंमत ११.४९ लाख ते १८.४९ लाख रुपये एक्स-शोरूम दरम्यान आहे. यात स्मार्ट प्लस, प्युअर, ॲडव्हेंचर आणि अकंप्लिश्ड असे चार ट्रिम लेव्हल उपलब्ध आहेत. टॉप मॉडेलमध्ये ट्रिपल स्क्रीन सेटअप आणि ‘लेव्हल-२ ADAS’ सारखी सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात आलीत. सध्या या गाडीचा वेटिंग पिरियड साधारण १ ते २ महिने असून, ही SUV हुंदाई क्रेटा आणि किया सेल्टोसला तगडी झुंज देणार आहे. स्वतःचे घर खरेदी करावे की भाड्याने राहावे? हे साधे गणित समजून घ्या नोकरीनिमित्त शहरात राहणाऱ्या अनेकांसाठी घर खरेदी करायचे की भाड्याने राहायचे, हा मोठा प्रश्न असतो. याचे सोपे उत्तर तुमच्या खिशावर पडणाऱ्या ओझ्यावर अवलंबून आहे. जर तुमच्या घराचा मासिक हप्ता म्हणजेच ईएमआय हा घराच्या भाड्यापेक्षा दुप्पट किंवा त्यापेक्षा जास्त असेल, तर सध्या भाड्याने राहणेच अधिक शहाणपणाचे ठरते. कारण भाड्याने राहिल्यामुळे तुमचे दरमहा पैसे वाचतात, जे तुम्ही म्युच्युअल फंड किंवा इतर योजनांमध्ये गुंतवून भविष्यासाठी मोठी रक्कम जमा करू शकता. मुंबई किंवा बेंगळुरू सारख्या मोठ्या शहरांत घरांच्या किमती खूप जास्त असल्याने तिथे भाड्याने राहणे फायद्याचे ठरते. याउलट छोट्या शहरांत घराचे भाडे आणि ईएमआय यात फारसा फरक नसतो, त्यामुळे अशा ठिकाणी स्वतःचे घर घेणे अधिक सोयीचे असते. जर तुम्ही एखाद्या शहरात १० वर्षांपेक्षा जास्त काळ राहणार असाल आणि तुमचा ईएमआय घराच्या भाड्याच्या आसपास असेल, तरच घर खरेदीचा निर्णय घेणे योग्य ठरते. अन्यथा, घाईघाईत कर्ज घेण्यापेक्षा भाड्याने राहून पैशांची बचत करणे हा एक उत्तम आर्थिक पर्याय आहे. मृणाल ठाकूर आणि धनुषचं व्हॅलेंटाईन डेला लग्न? सोशल मीडियावर चर्चांना उधाण दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष आणि बॉलीवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर यांच्या लग्नाच्या अफवांनी सध्या सोशल मीडियावर खळबळ माजवलीय. ताज्या चर्चांनुसार, हे दोन्ही कलाकार येत्या १४ फेब्रुवारीला म्हणजेच व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर विवाहबंधनात अडकण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी ‘सन ऑफ सरदार २’ च्या प्रीमियरदरम्यान दोघांची जवळीक पाहून त्यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यावेळी मृणालने धनुष केवळ ‘चांगला मित्र’ असल्याचे सांगत अफवा फेटाळल्या होत्या. मात्र, आता एका विश्वासार्ह सूत्रानुसार, हे दोघे एकमेकांना डेट करत असून लवकरच अधिकृत घोषणा करू शकतात. अद्याप दोघांनीही या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही, तरीही चाहत्यांमध्ये या ‘पॉवर कपल’बद्दल मोठी उत्सुकता निर्माण झालीय. अर्शदीपला बाहेर ठेवल्याने अश्विन संतापला; टीम मॅनेजमेंटवर ओढले ताशेरे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेत स्टार गोलंदाज अर्शदीप सिंगला पहिल्या दोन सामन्यांतून वगळल्याने अनुभवी फिरकीपटू आर. अश्विनने संताप व्यक्त केलाय. राजकोटमध्ये भारतीय गोलंदाजांची धुलाई झाल्यानंतर अश्विनने संघ व्यवस्थापनाच्या निर्णयावर सडकून टीका केली. अश्विन म्हणाला की, “अर्शदीपने नेहमीच संघासाठी चांगली कामगिरी केलीय, तो सन्मानाने संघात येण्यास पात्र आहे. वर्कलोड मॅनेजमेंटच्या नावाखाली त्याला बाहेर बसवून त्याच्या आत्मविश्वासाशी खेळले जातेय.” अर्शदीपचा वनडे रेकॉर्ड दमदार असतानाही त्याला संधी न मिळाल्याने अश्विनने आश्चर्य व्यक्त करत गोलंदाजांवरच नेहमी अन्याय का होतो, असा सवाल विचारलाय.