‘मुंबई महाराष्ट्राची नाही’; भाजप नेते अण्णामलाईंच्या विधानाने खळबळ “मुंबई हे महाराष्ट्राचे शहर नसून ते एक आंतरराष्ट्रीय शहर आहे,” असे वादग्रस्त विधान तामिळनाडू भाजपचे नेते के. अण्णामलाई यांनी केलेय. मुंबईत भाजप उमेदवाराच्या प्रचारादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केल्याने राज्याच्या राजकारणात नवा वाद पेटलाय. अण्णामलाई यांच्या विधानावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, “अण्णामलाई यांनी १०६ हुतात्म्यांचा अपमान केलाय, त्यांच्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा,” अशी मागणी केलीय. भाजपचे स्टार प्रचारकच असे विधान करत असल्याने विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठवलीय. मुंबईच्या अस्मितेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून यावरून सत्ताधारी आणि विरोधकांत जुंपण्याची शक्यता आहे. ‘सरपंच पती’ प्रथेला आता चाप; केंद्र सरकार देशभरात कठोर कारवाई करणार महिला सरपंचांच्या नावाखाली त्यांचे पतीच ग्रामपंचायतीचा कारभार हाकत असल्याच्या ‘सरपंच पती’ प्रथेविरोधात आता केंद्र सरकारने कठोर पावले उचलली आहेत. पुण्यात आयोजित ‘महिला स्नेही ग्रामपंचायत’ राष्ट्रीय कार्यशाळेत पंचायत राज मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव सुशीलकुमार लोहाणी यांनी ही माहिती दिली. लोहाणी म्हणाले की, महिला लोकप्रतिनिधींना स्वतंत्र निर्णय घेता यावेत यासाठी या प्रथेचे निर्मूलन करणे आवश्यक आहे. केवळ सह्यांपुरते मर्यादित न ठेवता, महिलांना सुरक्षित आणि सन्मानजनक वातावरणात प्रत्यक्ष कारभार करण्याची संधी मिळायला हवी. यासाठी देशभरात विशेष मोहीम राबवून दोषींवर कारवाई केली जाईल. तसेच, महिलांच्या आर्थिक साक्षरतेसाठी आणि आरोग्यासाठी ३५ सूचकांकांचा विशेष डॅशबोर्ड विकसित करण्यात आला असून, ग्रामपंचायतींनी महिला सक्षमीकरणाला प्राधान्य द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तुषार आपटे यांचा स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा; जनआक्रोशापुढे भाजपची माघार बदलापूर येथील बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटे यांनी अखेर स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा दिलाय. अवघ्या २४ तासांपूर्वीच झालेली ही नियुक्ती जनआक्रोश आणि भाजप वरिष्ठांच्या हस्तक्षेपानंतर रद्दबातल ठरली. जामीनावर असलेल्या आपटेंना लोकप्रतिनिधी म्हणून संधी दिल्यामुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. विरोधकांनी या मुद्द्यावरून भाजपच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आंदोलनाचा इशारा दिला होता. पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याचे लक्षात येताच वरिष्ठांनी दिलेल्या स्पष्ट संदेशानंतर, आपटे यांनी शनिवारी स्वतःहून राजीनामा सादर केला. या निर्णयामुळे भाजपने तूर्तास आपली बाजू सावरली असली, तरी संवेदनशील प्रकरणातील अशा नियुक्तीमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगलीय. ओडिशात चार्टर्ड विमान कोसळले; सहा जण जखमी, मोठी दुर्घटना टळली भुवनेश्वरहून राउरकेला येथे जाणाऱ्या ‘इंडिया वन एअर’च्या नऊ आसनी चार्टर्ड विमानाला शनिवारी दुपारी भीषण अपघात झाला. तांत्रिक बिघाडामुळे या विमानाला शेतात आपत्कालीन लँडिंग करावे लागले. या दुर्घटनेत दोन वैमानिकांसह सहा जण जखमी झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दुपारी दीड वाजताच्या सुमारास उड्डाण केल्यानंतर काही वेळातच विमानात बिघाड झाला. वैमानिकाने प्रसंगावधान राखत काटीबंधा कंसाराजवळील शेतात क्रॅश-लँडिंग केले. अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी पोहोचून विमानात अडकलेल्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून या प्रकरणाचा अधिक तपास केला जातोय. इराणमध्ये सर्वोच्च नेत्यांविरुद्ध महिलांचे उग्र आंदोलन; फोटो जाळून पेटवल्या सिगारेट इराणमध्ये महागाई आणि कट्टरपंथी इस्लामिक राजवटीविरुद्ध सुरू असलेल्या जनक्षोभाने आता उग्र रूप धारण केलेय. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओंमध्ये इराणी महिला सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांच्या फोटोंना आग लावून, त्याच अग्नीवर सिगारेट पेटवून आपला संताप व्यक्त करताना दिसतेय. डिसेंबर २०२५ पासून तेहरानसह अनेक शहरांत हे आंदोलन तीव्र झाले असून, आंदोलक ‘खामेनेई मुर्दाबाद’च्या घोषणा देत आहेत. सुधारणांऐवजी आता थेट सत्तापालटाची मागणी होत असून, काही आंदोलक रजा पहलवी यांच्या पुनरागमनाची अपेक्षा व्यक्त करत आहेत. २०२२ मध्ये महसा अमिनीच्या मृत्यूनंतर सुरू झालेल्या ठिणगीने आता पूर्ण इराणमध्ये वणव्याचे रूप घेतले असून, महिलांच्या या कृत्याला प्रस्थापित सत्तेविरुद्धच्या मोठ्या अवज्ञेचे प्रतीक मानले जातेय. हुंदाईच्या गाड्यांवर ‘बंपर डिस्काउंट’; क्रेटासह एक्सटरवर 98 हजार रुपयांपर्यंत बचत नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ‘हुंदाई इंडिया’ने आपल्या ग्राहकांसाठी आकर्षक सवलतींची घोषणा केलीय. जानेवारी २०२६ मध्ये हुंदाईच्या पॅसेंजर कार्सवर तब्बल ९८ हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट दिला जातोय. यामध्ये कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट ऑफर्सचा समावेश आहे. सर्वात मोठी सूट हुंदाई एक्सटर वर मिळत असून, त्यावर ९८ हजार रुपयांपर्यंत फायदा होऊ शकतो. लोकप्रिय एसयूव्ही क्रेटा आणि ‘एन-लाइन’ व्हेरियंटवर ४० हजार रुपयांपर्यंत सवलत आहे. याशिवाय i20 वर ९५ हजार, ग्रँड i10 निओसवर ८९ हजार, तर वेरना आणि अल्काझारवर ७० हजार व ६५ हजार रुपयांपर्यंतची सूट उपलब्ध आहे. सदर सवलती शहर, डीलर आणि स्टॉकच्या उपलब्धतेनुसार बदलू शकतात. त्यामुळे अचूक माहितीसाठी ग्राहकांनी जवळच्या हुंदाई शोरूमला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आलेय. UPI द्वारे काही मिनिटांत मिळणार PFचे पैसे; सुरुवातीच्या टप्प्यात सेवा ‘भीम’ ॲपवर भविष्य निर्वाह निधी पीएफ काढणाऱ्या कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना लवकरच UPI आधारित पीएफ काढण्याची सुविधा सुरू करणार आहे. यामुळे पीएफचे पैसे काढण्याची प्रक्रिया मोबाईलवरून पैसे पाठवण्याइतकीच सोपी होणार आहे. पुढील दोन ते तीन महिन्यांत ही सुविधा सुरू होण्याचे संकेत आहेत. यासाठी EPFO आणि NPCI मिळून तांत्रिक आराखडा तयार करताहेत. सुरुवातीच्या टप्प्यात ही सेवा फक्त ‘भीम’ ॲपवर उपलब्ध असेल. त्यानंतर फोनपे, गुगल पे यांसारख्या प्लॅटफॉर्मवर ती सुरू केली जाईल. सध्या ५ लाख रुपयांपर्यंतच्या क्लेमसाठी किमान ३ दिवस लागतात, परंतु UPI मुळे ही रक्कम तत्काळ खात्यात जमा होऊ शकेल. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत कर्मचाऱ्यांना वेळेवर पैसा मिळण्यास मोठी मदत होईल. 30व्या वर्षी पैशांचे नियोजन; सुखी भविष्यासाठी सोप्या टिप्स वयाची तिशी हा आयुष्यातील असा टप्पा आहे जिथे घेतलेले छोटे निर्णय तुमचे भविष्य सुरक्षित करू शकतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे घराचा खर्च चालवताना प्रत्येक रुपयाचा हिशोब ठेवा आणि उधळपट्टी टाळण्यासाठी बजेट बनवा. पगार हातात आल्यावर आधी बचतीसाठी काही पैसे बाजूला काढा आणि उरलेल्या पैशातच महिना खर्च करण्याची सवय लावा. भविष्यात घर घेणे किंवा मुलांचे शिक्षण यांसारखी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आतापासूनच ध्येय निश्चित करून गुंतवणूक सुरू करा. कर्जाच्या विळख्यात अडकू नका आणि शक्य तितक्या लवकर जुनी देणी फेडण्याचा प्रयत्न करा. अचानक उद्भवणाऱ्या संकटांसाठी किंवा आजारपणासाठी एक आपत्कालीन निधी तयार ठेवा, जो तुम्हाला कठीण काळात आधार देईल. पगार वाढला की लगेच मोठे घर किंवा महागडी गाडी घेण्याचा मोह टाळून साधी राहणी स्वीकारा. निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी तिशीमध्ये केलेली छोटी गुंतवणूक भविष्यात व्याजासह मोठी रक्कम बनून तुमच्या कामी येईल. थोडक्यात, आजची शिस्त उद्याचे आर्थिक स्वातंत्र्य देईल. ‘टॉक्सिक’चा टीझर रिलीज; यशचा राऊडी अवतार, बोल्ड सीन्सची चर्चा ‘केजीएफ’ फेम अभिनेता यशच्या बहुप्रतिक्षित ‘टॉक्सिक: अ फेअरी टेल फॉर ग्रोन अप्स’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर त्याने धुमाकूळ घातलाय. यशच्या वाढदिवसानिमित्त ८ जानेवारी रोजी रिलीज झालेल्या या टीझरमध्ये तो ‘राया’ नावाच्या राऊडी भूमिकेत दिसतोय. टीझरमध्ये हॉलिवूड स्टाईल अॅक्शन, स्मशानभूमीतील धमाके आणि एका अत्यंत बोल्ड कार सीनची झलक पाहायला मिळते. या बिग बजेट चित्रपटात कियारा अडवाणी, नयनतारा आणि हुमा कुरेशी यांची तगडी स्टारकास्ट आहे. हा चित्रपट १९ मार्च २०२६ रोजी प्रदर्शित होणार असून, त्याच दिवशी रणवीर सिंहचा ‘धुरंधर २’ देखील रिलीज होत असल्याने बॉक्स ऑफिसवर मोठी टक्कर पाहायला मिळणार आहे. टी-20 वर्ल्ड कपमधून डच्चू; शुबमन गिलची पहिली प्रतिक्रिया भारतीय टी-२० संघाचा उपकर्णधार असतानाही आगामी टी-२० विश्वचषकासाठी शुबमन गिलला १५ सदस्यीय संघातून वगळण्यात आले. या धक्कादायक निर्णयावर मौन सोडताना गिल म्हणाला, “मी सध्या माझ्या आयुष्यात जिथे असायला हवे, तिथेच आहे. जे माझ्या नशिबात लिहिले असेल, ते मला नक्कीच मिळेल.” निवड समितीच्या निर्णयावर कोणताही वाद न घालता त्याने या निर्णयाचा आदर केला आणि भारतीय संघाला विश्वचषक विजयासाठी शुभेच्छा दिल्या. उपकर्णधारपदावरून थेट संघाबाहेर जावे लागल्याने टीका होत असली, तरी गिलने अत्यंत संयमी भूमिका घेतलीय. आता न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत कर्णधार म्हणून स्वतःला सिद्ध करण्याचे मोठे आव्हान त्याच्यासमोर असेल.