1. बीएमसी निवडणुकीत गुणरत्न सदावर्तेंची एन्ट्री? कमळाच्या खुर्चीमुळे राजकीय चर्चांना उधाण मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असतानाच, ठाकरे बंधूंच्या युतीनंतर आता वकील गुणरत्न सदावर्ते चर्चेच्या केंद्रस्थानी आलेत. सदावर्ते यांच्या परळ येथील कार्यालयातील नव्या ‘कमळ’ सदृश राजेशाही खुर्चीने सर्वांचे लक्ष वेधले असून, ते भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार का, अशा चर्चा रंगू लागल्यात. सदावर्ते नेहमीच ठाकरे गटावर आक्रमक टीका आणि देवेंद्र फडणवीसांची स्तुती करताना दिसतात. अशातच त्यांनी वापरलेली कमळाच्या आकाराची भव्य खुर्ची हा आगामी राजकीय वाटचालीचा संकेत मानला जातोय. मराठा आरक्षणाविरोधातील याचिकेमुळे प्रकाशझोतात आलेले सदावर्ते आता थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेय. 2. नाशिक भाजपमध्ये बड्या नेत्यांचा प्रवेश , आमदार देवयानी फरांदेंना अश्रू अनावर – नाशिकमध्ये राजकीय भूकंप घडवत शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस आणि मनसेच्या पाच दिग्गज नेत्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. माजी महापौर विनायक पांडे, यतीन वाघ, माजी आमदार नितीन भोसले, शाहू खैरे आणि दिनकर पाटील यांनी गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत कमळ हाती घेतले. मात्र, या पक्षप्रवेशांमुळे भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आलाय. आमदार देवयानी फरांदे यांनी या प्रवेशांना तीव्र विरोध दर्शवला होता. पक्षातील ‘दलालांनी’ चुकीचे ब्रीफिंग केल्याचा आरोप करत, “निष्ठावंत कार्यकर्त्यांचा बळी दिला जात आहे,” अशा शब्दांत त्यांनी खंत व्यक्त केली. हे बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले. दरम्यान, “पक्षात कोणाचेही आगमन झाले तरी सर्वांनाच तिकीट मिळेल असे नाही, थोडीफार नाराजी असणे स्वाभाविक आहे,” असे स्पष्टीकरण गिरीश महाजन यांनी दिलेय. 3. ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेला भगदाड, माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचा राजीनामा – महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाण्यात शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. शिवसेनेच्या महिला आघाडी प्रमुख आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिलाय. सध्याच्या राजकीय परिस्थितीत काम करण्यास असमर्थ असल्याचे कारण त्यांनी दिले असले, तरी यामागे अंतर्गत नाराजी असल्याचे बोलले जातेय. मिनाक्षी शिंदे यांचे निकटवर्तीय शाखाप्रमुख विक्रांत वायचळ यांची पक्षविरोधी कारवाईच्या आरोपावरून हकालपट्टी करण्यात आली होती. यामुळे शिंदे प्रचंड नाराज होत्या. एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ठाण्यातच ही बंडाळी झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजलीय. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा राजीनामा पक्षासाठी चिंतेचा विषय ठरणार आहे. 4. सावधान! CBI, गृह मंत्रालयाच्या नावाने ई-मेल स्कॅम, पुण्यात निवृत्त अभियंत्याची ३६ लाखांची फसवणूक – डिजिटल युगात सायबर गुन्हेगारांनी आता सीबीआय आणि इंटरपोलच्या नावे बनावट ई-मेल पाठवून नागरिकांना लुटण्याचे सत्र सुरू केलेय. “तुम्ही अश्लील व्हिडिओ पाहिले असून तुमच्यावर बाल लैंगिक गुन्ह्यांतर्गत कारवाई होईल,” अशी धमकी देऊन २४ तासांत उत्तराची मागणी केली जातेय. नुकतेच धायरी येथील एका ७९ वर्षीय निवृत्त अभियंत्याला अशाच प्रकारे ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती घालून ३६ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आलाय. तज्ज्ञांच्या मते, हे ई-मेल बहुतेकदा फ्री डोमेनवरून पाठवले जातात आणि त्यासोबतची फाईल उघडल्यास डिव्हाईस हॅक होण्याची शक्यता असते. सायबर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले की, अशा संशयास्पद मेलला उत्तर देऊ नका किंवा कोणतीही लिंक क्लिक करू नका. फसवणूक झाल्यास तातडीने cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवावी. 5. नायलॉन मांजा वापरल्यास ५० हजारांचा दंड, हायकोर्टाचा कठोर पवित्रा – मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंग उडवताना नायलॉन मांजामुळे होणारे जीवघेणे अपघात रोखण्यासाठी नागपूर उच्च न्यायालयाने अत्यंत कठोर पावले उचलली आहेत. यासंदर्भात न्यायालयाने प्रस्तावित दंडात्मक कारवाईचा मसुदा तयार केला असून, नागरिकांकडून सूचना व हरकती मागवल्यात. न्यायालयाच्या प्रस्तावानुसार, एखादा अल्पवयीन मुलगा नायलॉन मांजा वापरताना आढळल्यास त्याच्या पालकांना ५० हजार रुपये दंड भरावा लागेल. तसेच, विक्रेत्याकडे साठा आढळल्यास त्याला थेट अडीच लाख रुपयांच्या दंडाची तरतूद प्रस्तावित आहे. गृह विभागाने यासंदर्भात सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून हरकती नोंदवण्याचे आदेश दिलेत. यावर अंतिम सुनावणी ५ जानेवारी २०२६ रोजी होणार असून, त्यानंतर या नियमांची कडक अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. 6. अरवली वाचवण्यासाठी केंद्राचे मोठे पाऊल, नव्या खाणींना कायमची बंदी – पर्यावरणवाद्यांच्या प्रदीर्घ लढ्याला मोठे यश आले असून, केंद्र सरकारने अरवली पर्वतरांगांच्या परिसरात नवीन खाण भाडेपट्टे देण्यावर पूर्णपणे बंदी घातलीये. गुजरातपासून दिल्लीपर्यंत पसरलेल्या या पर्वतश्रेणीचे संरक्षण करण्यासाठी केंद्राने राज्यांना कडक निर्देश दिलेत. या निर्णयांतर्गत अरवलीच्या संरक्षित क्षेत्राचा विस्तार केला जाणार असून, ‘आयसीएफआरई’ या संस्थेला शास्त्रोक्त व्यवस्थापन योजना तयार करण्यास सांगण्यात आलेय. यापुढे या भागात कोणतेही अनियंत्रित खाणकाम चालणार नाही, असे मंत्रालयाने स्पष्ट केले. या योजनेत पर्यावरणाची वहन क्षमता आणि संवेदनशील क्षेत्रांचे मूल्यांकन केले जाईल. पर्यावरणाचा ऱ्हास थांबवून या क्षेत्राचे पुनर्वसन करण्यावर आता भर दिला जाणार आहे. अरवली पर्वतरांगा वाचवा असे मोठे जनआंदोलन काॅंग्रेसने उभारले होते. अखेर या आंदोलनापुढे सरकारला झुकावे लागले. 7. इनकम टॅक्समध्ये १० मोठे बदल, सामान्यांना मोठा दिलासा – सरते वर्ष २०२५ करदात्यांसाठी ऐतिहासिक ठरले असून सरकारने प्राप्तिकर रचनेत केलेल्या आमूलाग्र बदलांमुळे मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळालाय. नवीन कर प्रणालीनुसार आता १२ लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही, ज्यामुळे कोट्यवधी नोकरदारांची बचत वाढलीय. बँकिंग क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजावरील कर सवलत ५० हजारांवरून १ लाख रुपये करण्यात आली असून, भाड्याच्या उत्पन्नावरील टीडीएस मर्यादा ६ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आलीय. प्रशासकीय सुधारणा करताना सरकारने १९६१ चा जुना कायदा बदलून नवीन ‘इन्कम टॅक्स बिल’ मंजूर केले, ज्यामुळे संपूर्ण प्रक्रिया डिजिटल आणि पारदर्शक झालीय. परदेशात शिक्षणासाठी पाठवल्या जाणाऱ्या पैशांवरील टीसीएस रद्द करून पालकांना दिलासा दिला, तर अपडेटेड रिटर्न भरण्याची मुदत ४८ महिन्यांपर्यंत वाढवून करदात्यांना चुका सुधारण्यासाठी पुरेसा वेळ दिलाय. आयटीआर भरण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबरपर्यंत वाढवणे आणि रिकाम्या घरावरील काल्पनिक भाड्याचा कर रद्द करणे यांसारख्या निर्णयांनी करप्रणाली अधिक लवचिक आणि सोपी केलीये. 8. 17 वर्षांनंतर तारिक रहमान परतले मायदेशी, ढाक्यात ‘बुलेटप्रूफ’ एन्ट्री – बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे कार्यवाहक अध्यक्ष तारिक रहमान तब्बल १७ वर्षांच्या वनवासानंतर लंडनहून बांगलादेशात परतलेत. आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या पुनरागमनाने देशातील राजकीय वातावरण तापलेय. विमानतळावर उतरताच रहमान यांचे स्वागत एखाद्या ‘डॉन’प्रमाणे भव्य बुलेटप्रूफ ताफ्याने करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी, मुलगी आणि चर्चेचा विषय ठरलेली त्यांची पाळीव मांजर ‘जीबू’ देखील होती. विमानतळापासून रॅलीपर्यंत लाखोंच्या संख्येने समर्थकांनी गर्दी केली होती, ज्यामुळे संपूर्ण ढाका शहर स्तब्ध झाले होते. मायदेशी परतल्यानंतर रहमान यांनी प्रथम रुग्णालयात जाऊन आपल्या आजारी आई, माजी पंतप्रधान खालिदा जिया यांची भेट घेतली. शेख हसीना यांच्या पतनानंतर आणि आगामी निवडणुकांच्या घोषणेनंतर तारिक रहमान हे पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार मानले जाताहेत. ढाका येथे आयोजित भव्य रॅलीत बोलताना रहमान यांनी लोकशाही पुनर्स्थापित करण्याचा आणि शांतता राखण्याचा पुनरुच्चार केला. 9. ‘तू मेरी मैं तेरा’मध्ये रोमान्सचा फज्जा, जेन-झीसाठी ‘DDLJ’ बनवण्याचा प्रयत्न अपयशी – धर्मा प्रॉडक्शन्सचा नवा चित्रपट ‘तू मेरी मैं तेरा…’ आजच्या पिढीसाठी ‘डीडीएलजे’ बनण्याच्या प्रयत्नात पूर्णपणे अपयशी ठरलाय. दिग्दर्शक समीर विध्वंस यांनी ९० च्या दशकातील रोमान्स आणि आजचे ‘हुक-अप कल्चर’ एकत्र आणण्याचा प्रयत्न केला, मात्र कमकुवत पटकथेमुळे हा प्रयोग फसलाय. कार्तिक आर्यनचा अभिनय अतिउत्साही तर अनन्या पांडेची भूमिका भावनिक खोली नसलेली वाटते. नीना गुप्ता आणि जॅकी श्रॉफसारखे दिग्गज कलाकारही विस्कळीत संवादामुळे प्रभाव पाडू शकले नाहीत. अनिल मेहता यांची सिनेमॅटोग्राफी आणि लोकेशन्स सुंदर असली, तरी क्रिंज संवाद आणि संथ संगीतामुळे चित्रपट प्रेक्षकांना अस्वस्थ करतो. थोडक्यात, जुन्या रोमान्सचा आत्मा आणि आजच्या काळातील वास्तव या दोन्ही आघाड्यांवर हा चित्रपट सपशेल अपयशी ठरल्याचे दिसतेय. 10. ॲशेस पराभवानंतर मॅक्क्युलमवर टीका, रवी शास्त्रींना इंग्लंडचे प्रशिक्षक करण्याची मागणी – ॲशेस २०२५-२६ मालिकेत सलग तीन पराभवांमुळे इंग्लंडला मालिका गमवावी लागली असून, प्रशिक्षक ब्रँडन मॅक्क्युलम यांच्या ‘बॅझबॉल’ शैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेय. या मानहानिकारक कामगिरीनंतर माजी फिरकीपटू मोंटी पानेसरने मॅक्क्युलमच्या जागी रवी शास्त्री यांची नियुक्ती करण्याची मागणी केलीय. पानेसरच्या मते, शास्त्रींकडे ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत दोनदा हरवण्याचा मोठा अनुभव असून त्यांची रणनीती इंग्लंडला सावरू शकते. दुसरीकडे, टीकेचा भडिमार होत असतानाही मॅक्क्युलम यांनी पदावर राहून चुका सुधारण्याची इच्छा व्यक्त केलीय. २०२७ पर्यंत करार असलेल्या मॅक्क्युलमबाबत आता ‘ईसीबी’ काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.