पंतप्रधानांच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. एक टर्मिनल आणि एक धावपट्टी असलेल्या पहिल्या टप्प्याची क्षमता दरवर्षी दोन कोटी प्रवाशांना हाताळण्याची आहे. डिसेंबरमध्ये येथून नियमित उड्डाणे सुरू होतील. हे मुंबईचे दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असून शेतकरी नेते दि.बा. पाटील यांचे नाव या विमानतळाला देण्यात आलेय. त्यासोबत मुंबई मेट्रो लाईन 3 च्या फेज 2बी चे उद्घाटन देखील केले. शिवसेना पक्षचिन्हावरील पुढील सुनावणी 12 नोव्हेंबरला – शिवसेना पक्षचिन्ह वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सुप्रीम कोर्टाने आता अंतिम सुनावणीसाठी 12 नोव्हेंबर तारीख दिलीये. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेचे पक्षचिन्ह “धनुष्यबाण” आणि पक्षनाव “शिवसेना” हे एकनाथ शिंदे गटाला दिले होते. उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील काही दिवसांत पार पडणार आहेत. त्यामुळे “खरी शिवसेना” कोणाची हे स्पष्ट होणे निर्णायक ठरणार आहे. एन्काउंटर प्रकरणात पोलिसांना ‘क्लीनचीट’ – बदलापूरमधील शाळकरी मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेच्या एनकाऊंटरची चौकशी करणाऱ्या न्या. दिलीप भोसले न्यायालयीन आयोगाने मोठा निकाल दिला आहे. या आयोगाने एनकाऊंटर करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना निर्दोषत्व बहाल करत क्लीनचीट दिली. आयोगाने पोलिसांचा “स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला” हा दावा ग्राह्य धरला. 23 सप्टेंबर 2024 रोजी अक्षय शिंदे याचा तळोजा तुरुंगात नेत असताना पोलीस चकमकीत मृत्यू झाला होता. हा एन्काउंटर बनावट असल्याचा आरोप करण्यात आला होता. फटाक्याच्या कारखान्यातील आगीत 6 जणांचा मृत्यू – आंध्र प्रदेशातील डॉ. बी.आर. आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यातील रायावरम येथील एका फटाक्याच्या कारखान्यात बुधवारी भीषण आग लागली. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. गंभीर जळालेल्या मृतदेहांची ओळख पटवणे कठीण आहे. अनेक लोक जखमी आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पोलिस अधीक्षक राहुल मीणा यांनी सांगितले की, अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह मोठ्या प्रमाणात जळाले होते. मृतांमध्ये फटाके कारखान्यातील कामगार असण्याची शक्यता आहे. मृतदेहांची ओळख पटवली जात असून बचावकार्य सुरू आहे. वृत्तानुसार, फटाके बनवताना शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे. तिघांना रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार – या वर्षीचा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार जपानचे सुसुमु कितागावा, ऑस्ट्रेलियाचे रिचर्ड रॉबसन आणि यूएसएचे ओमर एम. याघी यांना जाहीर झाला आहे. रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सेसने बुधवारी याची घोषणा केली. त्यांनी मोठ्या पोकळ्या असलेले अणू तयार केले आहेत, ज्यामुळे वायू आणि इतर रसायने सहजपणे त्यातून जाऊ शकतात. विजेत्याला ११ दशलक्ष स्वीडिश क्रोनर म्हणजेच 10 कोटी 3 लाख रुपये, एक सुवर्णपदक आणि एक प्रमाणपत्र मिळेल. ही बक्षीस रक्कम तिघांमध्ये विभागली जाईल. १० डिसेंबर रोजी स्टॉकहोममध्ये हे पुरस्कार प्रदान केले जातील. ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर – ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर आज सकाळी दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी मुंबईला आले. पंतप्रधान झाल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच भारत दौरा आहे. त्यांच्यासोबत व्यवसाय, सांस्कृतिक आणि इतर क्षेत्रातील १०० हून अधिक लोकांचे शिष्टमंडळ आहे. भारत आणि ब्रिटनमधील संबंध अधिक दृढ करणे हा या भेटीचा उद्देश आहे. ‘व्हिजन २०३०’ अंतर्गत भागीदारीच्या विकासावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान मोदी ९ ऑक्टोबर रोजी मुंबईत स्टारमर यांना भेटतील. यापूर्वी, पंतप्रधान मोदी यांनी या वर्षी ऑगस्टमध्ये ब्रिटनला भेट दिली होती, जिथे त्यांनी स्टारमरसोबत मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी केली होती. पाकिस्तानला 4 दिवसांत धूळ चारली – भारतीय हवाई दलाचा ९३ वा हवाई दल दिन गाझियाबाद येथील हिंडन हवाई दल तळावर साजरा केला जात आहे. यावेळी एअर चीफ मार्शल एपी सिंह म्हणाले, ऑपरेशन सिंदूर दरम्यान, भारतीय हवाई दलाने केवळ चार दिवसांत शत्रूवर विजय मिळवला. तत्पूर्वी, हवाई दलाच्या विमानांनी नेत्रदीपक करमणूक सादर केली. विमानातून तिरंगा फडकवण्यात आला. यावर्षीच्या हवाई दल दिनाची थीम “सक्षम, बलवान, आत्मनिर्भर” आहे. आज हवाई दलाच्या धाडस आणि शौर्यासाठी 97 शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. शेअर बाजारातील तेजीला ब्रेक- सलग चार दिवसांच्या तेजीला आज भारतीय शेअर बाजारात ब्रेक लागला. गुंतवणूकदारांनी नफा वसुलीला प्राधान्य दिल्याने बाजार घसरणीने बंद झाला. सेन्सेक्स 153.09 अंकांनी म्हणजेच 0.19 टक्क्यांनी घसरून 81,773.66 वर तर निफ्टी 62.15 अंकांनी म्हणजेच 0.25 टक्क्यांनी घसरून 25,046.15 वर बंद झाला. दिवसभर बाजारात चढ-उतार सुरू राहिले. आयटी आणि कन्झ्युमर ड्युरेबल्स शेअर्समध्ये खरेदीमुळे निफ्टीने एकवेळ 25,200 चा टप्पा गाठला होता. मात्र, दुपारनंतर विक्रीचा जोर वाढल्याने बाजाराने सर्व वाढ परत गमावली आणि सेन्सेक्स दिवसाच्या उच्चांकावरून तब्बल 500 अंकांनी घसरला. कुस्तीगीर अमन सेहरावतवर एक वर्षाची बंदी – पॅरिस ऑलिंपिक कांस्यपदक विजेता अमन सेहरावतला जास्त वजनामुळे वरिष्ठ जागतिक कुस्ती स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आल्यानंतर भारतीय कुस्ती महासंघाने त्याच्यावर एक वर्षाची बंदी घातली आहे. २२ वर्षीय अमन सेहरावत १३ ते २१ सप्टेंबर दरम्यान क्रोएशिया येथे झालेल्या वरिष्ठ जागतिक कुस्ती स्पर्धेत ५७ किलो फ्रीस्टाइल प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करणार होता. परंतु त्याचे वजन १.७ किलो जास्त असल्याचे आढळून आल्याने त्याला स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आले. ‘स्मार्ट सुनबाई’ प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज – मराठी सिनेसृष्टीतील चर्चेत असलेला आगामी चित्रपट ‘स्मार्ट सुनबाई’ पोस्टरचं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतंच अनावरण झालंय. हा सिनेमा 21 नोव्हेंबर 2025 पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. संतोष जुवेकर, रोहन पाटील, भाऊ कदम, किशोरी शहाणे, मोहन जोशी, दीपक शिर्के, अंशुमन विचारे, विनम्र बाबल, सायली देवधर, प्राजक्ता गायकवाड यांसह अनेक कलाकार यात दिसणार आहेत.