Todays TOP 10 News: उद्याच शपथविधी होण्याची शक्यता – भुजबळ, अजितदादांच्या रिक्त पदी सुनेत्रा पवार? उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पदावर कुणाची वर्णी लागणार, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने हालचालींना वेग आला असून, धार्मिक विधींनंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल, असे तटकरे यांनी स्पष्ट केलेय. दुसरीकडे, छगन भुजबळ यांनी ‘शो मस्ट गो ऑन’ म्हणत सूचक विधान केलेय. कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार सुनेत्रा पवार यांच्याकडे नेतृत्व सोपवणे रास्त असल्याचे त्यांनी म्हटले. उद्या होणाऱ्या विधिमंडळ नेत्यांच्या बैठकीत सर्वांचे एकमत झाल्यास, उद्याच्या उद्या शपथविधी होऊ शकतो, असे संकेत भुजबळांनी दिलेत. यामुळे सुनेत्रा पवार राज्याच्या नव्या उपमुख्यमंत्री होणार का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेय. 100 युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांना मोठा दिलासा; आता केवळ 2500 रुपयांत ‘स्मार्ट’ सोलार अल्प उत्पन्न आणि बीपीएल कुटुंबांना वीज बिलातून मुक्त करण्यासाठी राज्य शासनाने ‘स्वयंपूर्ण महाराष्ट्र निवासी रूफटॉप, स्मार्ट सोलार योजना’ सुरू केलीय. ऑक्टोबर २०२५ पासून अमलात आलेल्या या योजनेअंतर्गत दरमहा १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकांना १ किलोवॅटचा सौर प्रकल्प बसवण्यासाठी ९० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळणार आहे. सुमारे ७० हजार रुपये खर्च असलेल्या या संचासाठी केंद्र व राज्य शासनाकडून भरघोस मदत मिळणार असून, लाभार्थींना प्रत्यक्ष केवळ २,५०० ते १०,००० रुपये भरावे लागतील. पुढील २५ वर्षे शून्य वीज बिलाचा लाभ देणाऱ्या या योजनेद्वारे महावितरणवरील भार कमी करण्याचे उद्दिष्ट आहे. इच्छुक ग्राहकांनी महावितरणकडे अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले असून, निवडक व्हेंडरमार्फत हे संच बसवले जातील. शर्मिला पिंपळोलकर बनल्या महापौर; ठाणे महापालिकेवर शिंदेंच्या शिवसेनेचेच वर्चस्व ठाणे महानगरपालिकेच्या सत्तास्थापनेचा तिढा अखेर सुटला असून महापौरपदावर शिवसेना शिंदे गटाने आपले वर्चस्व कायम राखलेय. शिवसेनेच्या शर्मिला पिंपळोलकर यांची महापौरपदी वर्णी लागली असून भाजपने उपमहापौरपदावर समाधान मानलेय. भाजपकडून कृष्णा पाटील यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज भरला. १३१ नगरसेवक संख्या असलेल्या ठाणे महापालिकेत शिवसेनेचे ७५ तर भाजपचे २८ जागांचे संख्याबळ असल्याने शिवसेनेने सुरुवातीपासूनच महापौरपदावर दावा केला होता. भाजपने अडीच वर्षांच्या कालावधीसाठी आग्रह धरला होता, मात्र शिवसेनेच्या ठाम भूमिकेमुळे त्यांना माघार घ्यावी लागली. या तडजोडीनुसार भाजपला उपमहापौरपदासह स्थायी आणि विषय समित्यांमध्ये महत्त्वाची पदे मिळण्याचे संकेत आहेत. या निवडीमुळे ठाण्यातील राजकीय समीकरणे आता स्पष्ट झालेत. शाळांमध्ये विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी पॅड्स; सर्वोच्च न्यायालयाचे राज्यांना कडक निर्देश देशातील प्रत्येक विद्यार्थिनीला मासिक पाळी दरम्यान स्वच्छतेचा आणि आरोग्याचा पूर्ण अधिकार असून, केंद्र व राज्य सरकारांनी सर्व सरकारी व अनुदानित शाळांमध्ये मोफत सॅनिटरी पॅड्स उपलब्ध करून द्यावेत, असा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. न्यायमूर्ती जे.बी. पारदीवाला आणि आर. महादेवन यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, मासिक धर्म स्वच्छता हा संविधानाच्या अनुच्छेद २१ अंतर्गत जीवन जगण्याच्या मूलभूत अधिकाराचाच एक भाग आहे. सुरक्षित आणि परवडणाऱ्या आरोग्य सुविधांमुळे महिलांना लैंगिक व पुनरुत्पादक आरोग्याचा उच्च स्तर गाठता येतो, असे न्यायालयाने नमूद केले. या महत्त्वपूर्ण निर्णयात न्यायालयाने खासगी शाळांनाही कडक इशारा दिलाय. ज्या शाळा मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे आणि सॅनिटरी पॅड्सची सुविधा पुरवण्यात अपयशी ठरतील, त्यांची मान्यता रद्द करण्यात यावी, असे आदेश खंडपीठाने दिले आहेत. अमेरिकेसमोर इराण झुकणार नाही; युद्धाच्या सावटातही शांततेसाठी मध्यस्थीचे प्रयत्न सुरू अमेरिका आणि इराणमधील तणाव शिगेला पोहोचला असून दोन्ही देशांत युद्धाचे ढग दाटलेत. अमेरिकेने इराणजवळ आपले शक्तिशाली नौदल तैनात केल्याने मध्यपूर्वेत युद्धाची शक्यता वर्तवण्यात येतेय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर अण्वस्त्र करारासाठी दबाव टाकला असला, तरी इराणने झुकण्यास स्पष्ट नकार दिलाय. इराणने आपल्या संरक्षणासाठी लष्करी तयारी वाढवली असून आज या संदर्भात महत्त्वाची उच्चस्तरीय बैठक पार पडणार आहे. दरम्यान, हे संकट टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर मध्यस्थीचे प्रयत्नही सुरू झालेत. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी ट्रम्प आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष पेझेशकियान यांच्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा घडवून आणण्याचा प्रस्ताव दिला असून, दोन्ही देशांनी चर्चेचे दरवाजे अद्याप उघडे ठेवलेत. येते काही दिवस हे दोन्ही देशांसह जगासाठी महत्वाचे असणार आहेत. सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; गुंतवणूकदारांकडून नफेखोरी सुरू गेल्या काही काळापासून सुसाट धावणाऱ्या सोने आणि चांदीच्या किमतींना शुक्रवारी ब्रेक लागला. चार वाजताच्या सुमारास MCXवर चांदीचा भाव प्रति किलो सुमारे 60 हजार रुपयांनी घसरून 3 लाख 39 हजार रुपयांवर आला होता, तर सोन्याचा दर 10 हजार रुपयांच्या घसरणीसह 1 लाख 59 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत होता. गुरुवारी या दोन्ही धातूंनी ऐतिहासिक उच्चांक गाठला होता. या घसरणीमागे प्रमुख 3 कारणे सांगितली जात आहेत. गेल्या आठवड्यात चांदीमध्ये जवळपास 1 लाख रुपयांची तेजी आली होती. आज गुंतवणूकदारांनी वरच्या स्तरावर नफा वसूल करण्यासाठी विक्रीचा सपाटा लावला. अमेरिकन डॉलरमधील मजबुती आणि फेडरल रिझर्व्हच्या धोरणांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातूंवर दबाव वाढला आहे. तसेच 1 फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात सरकार सोने-चांदीवरील आयात शुल्कात कपात करण्याची शक्यता आहे. या आशेने व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विक्री सुरू केलीय. सावधान! इन्स्टाग्रामवर फसवणुकीचा सापळा; ‘या’ एका चुकीमुळे तुमचे खाते होऊ शकते हॅक सोशल मीडियाच्या वाढत्या वापरासोबतच सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झालीय. सध्या इन्स्टाग्रामवर ‘फिशिंग स्कॅम’द्वारे वापरकर्त्यांचे अकाउंट हॅक करण्याचे सत्र सुरू आहे. यामध्ये हॅकर्स हुबेहूब इन्स्टाग्राम किंवा ‘मेटा’सारखे दिसणारे बनावट संदेश पाठवून युजर्सना जाळ्यात ओढतात. तुमचे खाते नियमांचे उल्लंघन करत असून ते २४ तासांत बंद होईल, अशी भीती या संदेशांद्वारे घातली जाते. घाबरलेला युजर संदेशातील लिंकवर क्लिक करतो आणि बनावट लॉगिन पेजवर आपली माहिती भरतो, ज्यामुळे पासवर्ड थेट हॅकर्सच्या हाती लागतो. यापासून वाचण्यासाठी कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका. इन्स्टाग्राम कधीही मेसेजद्वारे पासवर्ड मागत नाही. सुरक्षिततेसाठी आपल्या अकाउंटवर ‘टू-स्टेप व्हेरिफिकेशन’ तातडीने सक्रिय करावे आणि अधिकृत ईमेलची खात्री ॲपमधील सेटिंगमध्ये जाऊनच करावी, असे आवाहन तज्ज्ञांनी केलेय. तरुणाईला मानसिक आजारांचा विळखा; 35 वर्षांखालील 60 टक्के रुग्ण भारतातील तरुणांमध्ये मानसिक विकारांचे प्रमाण चिंताजनक रित्या वाढत असून, एकूण रुग्णांपैकी ६० टक्के रुग्ण ३५ वर्षांखालील असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलेय. भारतीय मनोरोग सोसायटीच्या ७७ व्या राष्ट्रीय परिषदेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार, या आजारांची सुरुवात सरासरी १९ ते २० व्या वर्षीच होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, माहितीच्या अभावामुळे ७० ते ८० टक्के रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. वाढती शैक्षणिक स्पर्धा, रोजगाराची अनिश्चितता आणि डिजिटल उपकरणांचा अतिवापर यामुळे १८ ते २५ वयोगटातील तरुणांमध्ये मानसिक तणाव दुपटीने वाढलाय. १५ ते २९ वयोगटातील तरुणांच्या मृत्यूचे आत्महत्या हे तिसरे प्रमुख कारण ठरत असून, आभासी जगाच्या ओढ्यामुळे मानसिक आरोग्य धोक्यात आलेय. ब्रेकअपनंतरही अर्जुन माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग; मलायका अरोराचे भावूक विधान बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचे सहा वर्षांचे नाते संपले असले तरी, त्यांच्यातील परस्पर आदर आजही कायम आहे. एका मुलाखतीत मलायकाने यावर भाष्य करताना सांगितले की, अर्जुन तिच्या आयुष्याचा नेहमीच एक महत्त्वाचा भाग राहिलाय आणि आजही आहे. ब्रेकअपनंतरही दोघांनी कधीही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले नाहीत, उलट कठीण काळात अर्जुन मलायकाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. मलायका म्हणाली की, राग आणि दुःख हे मानवी स्वभावाचे पैलू आहेत, जे काळानुसार निवळतात. ट्रोलिंगला न जुमानता आपल्या अटींवर जगणाऱ्या मलायकाने अर्जुनबद्दल व्यक्त केलेला हा आदर त्यांच्या नात्यातील मॅच्युरिटी दर्शवतो. भारत-पाकिस्तान महामुकाबल्यासाठी अंपायर्स जाहीर; 15 फेब्रुवारीला रंगणार थरार! टी-२० वर्ल्ड कप २०२६ मधील सर्वात हाय-व्होल्टेज सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात १५ फेब्रुवारी रोजी कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या महत्त्वाच्या सामन्यासाठी आयसीसीने अनुभवी पंचांची नियुक्ती केलीय. श्रीलंकेचे कुमार धर्मसेना आणि इंग्लंडचे रिचर्ड इलिंगवर्थ या सामन्यात ऑन-फिल्ड अंपायरची भूमिका बजावतील. कुमार धर्मसेना यांना यापूर्वीच्या अनेक वर्ल्ड कप फायनलचा दांडगा अनुभव आहे. ७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाठी आयसीसीने एकूण २४ अंपायर्स आणि ६ मॅच रेफरींची फौज नियुक्त केलीय. भारताचा पहिला सामना ७ फेब्रुवारीला मुंबईत अमेरिकेविरुद्ध होणार असून, चाहत्यांचे मुख्य लक्ष कोलंबोतील भारत-पाक युद्धाकडे लागलेय.