Top 10 News: चुका तुमच्या आणि भुर्दंड जनतेला का? राज ठाकरेंचा पंतप्रधानांना थेट सवाल इराण-अमेरिका युद्ध आणि वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना काटकसरीचे आवाहन केलेय. यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधानांना खरमरीत पत्र लिहले. ‘चुका तुमच्या आणि भुर्दंड जनतेला का?’ असा सवाल करत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या दुटप्पी भूमिकेवर कडाडून टीका केली. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर यापूर्वीही वाढले होते, मात्र तेव्हा जनतेला असे सल्ले दिले गेले नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. सरकारी ताफा, निवडणुकांतील उधळपट्टी आणि ‘रेवडी’ संस्कृतीवरून त्यांनी सरकारला धारेवर धरले. पेट्रोल दरवाढीची ही पूर्वतयारी तर नाही ना, अशी शंका व्यक्त करत राज यांनी पंतप्रधानांना स्वतःपासून काटकसरीची सुरुवात करण्याचा सल्ला दिलाय. दरम्यान, भाजपने राज ठाकरेंच्या टीकेचा निषेध करत त्यांना स्वतःच्या पक्षाकडे लक्ष देण्याचा टोला लगावला. Top 10 News: NEET-UG 2026 रद्द, नाशिकसह अनेक राज्यांत पेपरफुटीचे जाळे, २३ लाख विद्यार्थ्यांवर परिणाम देशभरातील वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली नीट-यूजी परीक्षा पेपरफुटीच्या दाव्यांमुळे अखेर रद्द करण्यात आलीय. ३ मे रोजी पार पडलेल्या या परीक्षेत जवळपास २३ लाख विद्यार्थी सहभागी झाले होते. या प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रातील नाशिकपासून उत्तराखंडपर्यंत पसरले असून, नाशिकमधून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलेय. केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला असून आता ही परीक्षा पुन्हा घेतली जाणार आहे. विशेष म्हणजे, ज्या विद्यार्थ्यांनी आधी अर्ज केला होता, त्यांना पुन्हा शुल्क भरण्याची किंवा नोंदणी करण्याची आवश्यकता नसल्याचे एनटीएने स्पष्ट केलेय. लवकरच नव्या तारखा जाहीर केल्या जातील. Top 10 News: 12 आमदारांचा जपान दौरा रद्द; अमित साटम यांच्या ताफ्यावरून वाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराण-अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इंधन बचतीचे आवाहन केल्याने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी १२ आमदारांचा नियोजित जपान दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयाचे स्वागत होत असतानाच, भाजप आमदार अमित साटम यांच्या नालेसफाई पाहणी दौऱ्यातील २५ गाड्यांच्या ताफ्यावरून नव्या वादाला तोंड फुटलेय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी यावरून उपरोधिक टीका केली, तर साटम यांनी हे आरोप फेटाळत ताफ्यात केवळ ७-८ गाड्या असल्याचे स्पष्ट केले. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सध्या राजकीय कलगीतुरा रंगलाय. Top 10 News: हिमंत सरमा यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ; आसाममध्ये एनडीएची तिसऱ्यांदा सत्ता आसाममध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने तिसऱ्यांदा सत्ता स्थापन केली असून, हिमंत बिस्वा सरमा यांनी सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या ऐतिहासिक सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि अनेक भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. या निवडीसह सरमा हे आसाममध्ये सलग दोनवेळा मुख्यमंत्रीपद भूषवणारे पहिले गैर-काँग्रेसी नेते ठरलेत. त्यांच्यासोबत रामेश्वर तेली, अतुल बोरा, चंदन ब्रह्मा आणि अजंता नियोग यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. Top 10 News: तामिळनाडूत राजकीय भूकंप; AIADMK मध्ये फूट; 30 आमदारांचा विजय यांच्या TVK ला पाठिंबा तामिळनाडूच्या राजकारणात ऐतिहासिक उलथापालत झाली असून AIADMK मध्ये उभी फूट पडलीय. पक्षाचे ज्येष्ठ नेते सी.व्ही. षणमुगम यांनी ३० आमदारांसह अभिनेता विजय यांच्या ‘तामिळगा वेत्री कळगम’ (TVK) सरकारला पाठिंबा जाहीर केलाय. सलग पाच निवडणुकींतील पराभव आणि पलानीसामी यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन हा गट बाहेर पडला असून, DMK सोबत जाण्यापेक्षा TVK ला साथ देणे त्यांनी पसंत केले. ५९ वर्षांनंतर राज्यात पहिल्यांदाच DMK-AIADMK व्यतिरिक्त तिसऱ्या पक्षाचे सरकार स्थापन झाले असून, १३ मे रोजी मुख्यमंत्री विजय विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडणार आहेत. Top 10 News: शेअर बाजारात मोठी पडझड; सेन्सेक्स 1456 अंकांनी कोसळला आशियाई बाजारातील तणाव आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे मंगळवारी भारतीय शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी मोठी घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ‘सेन्सेक्स’ १,४५६ अंकांनी कोसळून ७४,५५९ वर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा ‘निफ्टी’ ४३६ अंकांनी घसरून २३,३७९ वर स्थिरावला. अमेरिका-इराणमधील वाढता तणाव आणि मध्यपूर्वेतील अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परकीय गुंतवणूकदारांनी केलेली मोठी विक्री आणि रुपयाने गाठलेली ९५.६३ ही नीचांकी पातळी यामुळे बाजारावर दबाव वाढला. आयटी आणि रिअल्टी क्षेत्रातील समभागांना या घसरणीचा सर्वाधिक फटका बसला असून, स्टेट बँक वगळता इतर प्रमुख कंपन्यांचे समभाग लाल निशाण्यावर बंद झाले. Top 10 News: इतिहासात यापूर्वीही सोन्याची खरेदी कमी करण्याचे आवाहन; आर्थिक किंवा युद्धजन्य संकटांच्या काळात निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच देशवासीयांना पुढील एक वर्ष सोने खरेदी टाळण्याचे आणि इंधन बचतीचे आवाहन केलेय. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे वाढते दर आणि परकीय चलन साठ्यावरील ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सरकारने म्हटलेय. भारताच्या इतिहासात असे आवाहन करण्याची ही पहिलीच वेळ नाही. इतिहासात यापूर्वीही आर्थिक किंवा युद्धजन्य संकटांच्या काळात सरकारांनी सोन्याची खरेदी कमी करण्याचे आवाहन केलेय. १९६२ च्या युद्धकाळात इंदिरा गांधींनी स्वतःचे दागिने दान केले होते, तर १९९१ च्या आर्थिक संकटात देशाला सोने गहाण ठेवावे लागले होते. अगदी २०१३ मध्येही पी. चिदंबरम यांनी वाढत्या वित्तीय तुटीमुळे जनतेला सोने कमी खरेदी करण्याचे अप्रत्यक्ष आवाहन केले होते. परकीय चलन वाचवून अर्थव्यवस्था सावरण्यासाठी सरकारांना वारंवार हे पाऊल उचलावे लागेय. Top 10 News: 9 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांकडे ग्राहकांचा कल; जाणून घ्या फायदे आणि वैशिष्ट्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोन्याची आयात कमी करण्याचे आवाहन केल्यानंतर आता बाजारपेठेत ९ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांची चर्चा रंगू लागलीय. २४ कॅरेट सोनं सर्वात शुद्ध मानलं जातं. तर २२ कॅरेट सोन्यामध्ये सुमारे ९१.६ टक्के शुद्ध सोने असते. १८ कॅरेटमध्ये जवळपास ७५ टक्के, तर ९ कॅरेटमध्ये केवळ सुमारे ३७.५ टक्के शुद्ध सोने असते, उर्वरित भागात तांबे आणि चांदी यांसारख्या धातूंचे मिश्रण असल्याने हे दागिने अधिक मजबूत आणि टिकाऊ असतात. वाढत्या महागाईमुळे खिशाला परवडणारे आणि आधुनिक डिझाइनमध्ये उपलब्ध होणारे हे दागिने तरुण वर्गाच्या पसंतीस उतरत आहेत. गुंतवणुकीपेक्षा फॅशन आणि रोजच्या वापरासाठी हे दागिने उत्तम पर्याय असून, यामुळे देशातील सोन्याची आयात घटण्यासही मदत होऊ शकते. दरम्यान, सध्याच्या बाजारभावानुसार राज्यात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत अंदाजे 1,52,130 आहे. तर 9 कॅरेटची किंमत 57000 आहे. Top 10 News: विराटला बदनाम करण्यासाठी पैशांची ऑफर; जर्मन मॉडेलचा मोठा खुलासा! जर्मन मॉडेल लिझलॅझ हिने एका मुलाखतीत खळबळजनक दावा केलाय की, विराट कोहलीने तिचा फोटो ‘लाईक’ केल्यानंतर काही पत्रकारांनी तिला पैशांची ऑफर दिली होती. या पत्रकारांनी तिला विराट कोहली विरुद्ध खोटे आरोप करण्यास आणि त्याला बदनाम करण्यास सांगितले होते. मात्र, लिझलॅझने ही ऑफर धुडकावून लावत विराटची पाठराखण केली. तिने विराटला ‘आशियाचा मेस्सी’ संबोधले असून तो तिचा आवडता क्रिकेटपटू असल्याचे सांगितले. सध्या लिझलॅझ मुंबईत असून ती बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यास उत्सुक आहे. Top 10 News: राज्यातील 717 दारूची दुकाने होणार बंद; मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय तामिळनाडूचे नवनियुक्त मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी पदभार स्वीकारताच जनहिताचा मोठा निर्णय घेतलाय. राज्यातील प्रार्थनास्थळे, शाळा-महाविद्यालये आणि बसस्थानकांपासून ५०० मीटरच्या परिघात असलेली ७१७ दारूची दुकाने बंद करण्याचे आदेश त्यांनी दिलेत. या निर्णयाचे तमिळ चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते कमल हासन आणि विशाल यांनी स्वागत केलेय. दारू विक्री करणे हे सरकारचे काम नसून, व्यसनाधीनतेवर नियंत्रण मिळवणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे कमल हासन यांनी म्हटले. तसेच, या निर्णयामुळे विद्यार्थिनींची छेडछाड थांबेल आणि महिलांना मोठा दिलासा मिळेल, अशी भावना विशालने व्यक्त केली. विजय यांच्या या पहिल्याच धाडसी पावलाचे सर्व स्तरांतून कौतुक होतेय.