पुणे | आजचा महाराष्ट्र बंद मागे

पुणे,{प्रभात वृत्तसेवा} – बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवरील अत्याचारप्रकरणी महाविकास आघाडीने शनिवारी (दि.24) महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने महाविकास आघाडीने पुकारलेला बंद बेकायदेशीर ठरवत बंदला मनाई केली आहे.
तसेच बंद केल्यास कायदेशीर कारवाई करावी, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बंद मागे घेण्याचे आवाहन केले आहे.
बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर 24 ऑगस्ट 2024 रोजी राज्यव्यापी सार्वजनिक बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्या दोन अजाण बालिकांवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद होता.
परिणामी समाजातील सर्व स्तरांतून याबाबतीत तीव्र लोकभावना उमटल्या. या बाबीकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न होता. उद्याचा बंद भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत अधिकारांच्या कक्षेत होता.
तथापि मुंबई उच्च न्यायालयाने सदर बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिला आहे. सदर निर्णयाविरूद्ध मा. सर्वोच्च न्यायालयात तातडीने दाद मागणे वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही.
भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्याने संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा असे आवाहन करण्यात येते, असे शरद पवार यांनी एक्सवर केलेल्या पोस्टवर म्हटले आहे.





