“आजचे मरण उद्यावर ढकलले आणि हे ‘एक देश एक निवडणूक’ घ्यायला निघालेत”; ठाकरे गटाची टीका

Maharashtra Assembly Election 2024| केंद्रीय निवडणूक आयोगाने हरयाणा आणि जम्मू-कश्मीर विधानसभेच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. जम्मू आणि काश्मीरमध्ये तीन टप्प्यातील आणि हरियाणामध्ये एका टप्प्यात मतदानाचा कार्यक्रम जाहीर केला. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्र, झारखंड, हरयाणा आणि जम्मू-कश्मीर विधानसभेच्या निवडणुका एकत्रित घेतल्या जातील अशी चर्चा होती.
परंतु तसे न झाल्याने विरोधकांकडून निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर टीका केली जात आहे. यातच ठाकरे गटाचे मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखातून महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजप पराभूत होणार असल्याचे म्हणत टीका करण्यात आली आहे.
‘महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणुका नेहमी एकाच वेळी घेतल्या जातात, पण या वेळी म्हणे जम्मू-कश्मीरमध्येही निवडणुका घेतल्या जात असल्याने महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेतल्या नाहीत. हे कारण न पटणारे आहे. जे पंतप्रधान संपूर्ण देशात सर्वच निवडणुका एकाच वेळी घेण्याचे ढोल पिटतात ते जम्मू-कश्मीरचे फुटकळ निमित्त करून महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका पुढे ढकलतात यामागे निवडणूक आयोगाची अकार्यक्षमता दिसते,’ ठाकरे गटाच्या सामना अग्रलेखात म्हंटले आहे.
…तर मोदींचे ‘एक देश एक निवडणूक’चे स्वप्न कसे साकार होणार?
सणांचा विचार करून निवडणूक आयोग निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार असेल तर मोदींचे ‘एक देश एक निवडणूक’चे स्वप्न कसे साकार होणार? अनेक राज्ये पुराच्या विळख्यात असतात. म्हणून निवडणुकांचे वेळापत्रक कसे बदलायचे? गणेशोत्सव, पितृपक्ष, दिवाळी या सणांमुळे महाराष्ट्रातील निवडणुका लांबणीवर टाकून निवडणूक आयोगाने आपले हसे करून घेतले,” अशी टीका यातून करण्यात आली आहे.
…यासाठी निवडणुकांची तारीख लांबवली याबाबत शंका नाही
महाराष्ट्रात कुणाला तरी मदत व्हावी व आर्थिक उलाढाली करण्यास वेळ मिळावा यासाठी निवडणुकांची तारीख लांबवली याबाबत शंका नाही. लोकशाहीच्या उत्सवापुढे इतर कोणताही सण-उत्सव आडवा येता कामा नये हे लक्षात घेतले पाहिजे. निवडणूक आयोगाची कारणे काहीही असोत, महाराष्ट्र व झारखंड या राज्यांत भाजप व त्यांच्या बगलबच्च्यांचा दारुण पराभव निश्चित असल्यानेच निवडणूक आयोगाने हा लपंडाव सुरू केला आहे.
“कश्मीरमधील संवेदनशील स्थिती पाहता प्रचार भयमुक्त असावा याची काळजी निवडणूक आयोग घेईल. प्रत्येक उमेदवाराला सुरक्षा व्यवस्था पुरविली जाईल असे निवडणूक आयोगाने सांगितले, पण ज्या राज्यात पुलवामासारखे भयंकर हत्याकांड घडवून एकाच वेळी चाळीस जवानांचे प्राण घेतले जातात तेथे तुमच्या तकलादू सुरक्षा व्यवस्थेला विचारतोय कोण?” असा सवालही यातून करण्यात आला आहे.
आजचे मरण उद्यावर ढकलले
जो निवडणूक आयोग स्वतःच भयग्रस्त व राजकीय दबावाखाली गुदमरून काम करत आहे त्याने भयमुक्तीवर तारे तोडावेत हे न पटणारे आहे. महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजप पराभूत होणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने ही दोन राज्ये वगळून जम्मू-कश्मीर आणि हरयाणा या दोन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर करून आजचे मरण उद्यावर ढकलले आहे आणि हे ‘एक देश एक निवडणूक’ घ्यायला निघाले आहेत”, असंही सामनात अग्रलेखातून म्हटलंय
4 ऑक्टोबरला निकाल –
हरियाणातील विधानसभेच्या सर्व 90 जागांवर 1 ऑक्टोबरला मतदान होणार आहेत. तर तर जम्मू काश्मिरमध्ये तीन टप्प्यात निवडणूक होणार आहे. जम्मू काश्मिरमध्ये पहिला टप्पा 18 सप्टेंबरला, दुसरा टप्पा 25 सप्टेंबरला आणि तिसऱ्या टप्प्यात 1 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. येथेही विधानसभेच्या 90 जागा आहेत. या दोन्ही निवडणुकांचा निकाल 4 ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे.
हेही वाचा:
राज्यातील विधानसभा निवडणूक डिसेंबरमध्ये होणार ? ; लाडक्या बहिणीसाठी निवडणूक लांबणीवर टाकण्याचा घाट ?





