वाखरी येथे आज कुस्ती स्पर्धा

पुणे : विश्‍व शांती केंद्र (आळंदी) व श्री क्षेत्र आळंदी-देहू-पंढरपूर विकास समिती (पुणे) यांच्यातर्फे आज वाखरी (पंढरपूर) येथे श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा दुपारी 1.30 ते संध्याकाळी 7.30 वाजेपर्यंत होणार आहे. स्पर्धेचे हे 10वे वर्ष आहे.

महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने ही स्पर्धा होत आहे. या स्पर्धेसाठी अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच, हिंद केसरी पै. दिनानाथ सिंग, महान भारत केसरी पै. दादू चौगुले, महाराष्ट्र राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री बबनराव पाचपुते व पंढरपूरचे आमदार भारत भालके हेही उपस्थित राहणार आहेत.

ही स्पर्धा 16 ते 25 वर्ष, 26 ते 35 वर्षे, 36 ते 45 वर्षे, 46 ते 55 वर्षे, 56 ते 65 वर्षे या गटात होईल.
राष्ट्रीय कीर्तनकार रामचंद्र गोपाळ शेलार यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ तंदुरूस्त अशा सत्तर (70) वर्षापुढील वयाच्या मल्लांसाठी स्वतंत्र स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या गटातील विजेत्याला श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×