Pimpri News | आज उमेदवारांचे भविष्य होणार मतपेट्यांमध्ये बंद

पिंपरी, – राज्याच्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. शहरातील तीन विधानसभा मतदारसंघातील एकूण 53 उमेदवारांचे भवितव्य जनता जनार्दन मतपेट्यांमध्ये बंद करेल. तर पिंपरी विधानसभा मतदार संघात एकून 15 उमेदवार आपले नशिब आजमवित आहेत.
गेल्या एक महिन्यापासून उडत असलेला प्रचाराचा धडाका सोमवारी सायंकाळी थांबला. त्यानंतर वैयक्तिक भेटी-गाठींवर उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी भर दिला आहे. आपल्या मतदारांनी मतदान करावे, यासाठी सर्वच उमेदवार जोरदार प्रयत्न करत आहेत. यासाठी बूथ पातळीवरील कार्यकर्त्यांची फौज कामाला लागली आहे.
शहरातील तीनही मतदारसंघांमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत दिसत असली तरी लहान पक्ष आणि अपक्षांनी प्रचारात कडवे आव्हान उभे केलेले दिसून आले आहे. याचा मतदानावर किती परिणाम होईल हे 23 नोव्हेंबर रोजीच कळणार आहे. परंतु अपक्ष आणि लहान पक्षांना पडणारी मते मुख्य उमेदवारांचे समीकरण बदलू शकतात, हे मात्र निश्चित आहे.
पिंपरी विधानसभा
पिंपरी विधानसभा मतदार संघात महायुतीचे अधिकृत उमेदवार अण्णा बनसोडे व महाविकास आघाडीच्या सुलक्षणा धर यांच्या प्रमुख लढत होते आहे. मात्र, तरीदेखील महाराष्ट्र स्वराज्य पार्टीचे बाळासाहेब ओव्हाळ, वंचित बहुजन आघाडीचे मनोज गरबडे तर मिनाताई खिल्लारे व बी. के. कांबळे हे अपक्ष हे उमेदवारदेखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
भोसरी विधानसभा मतदारसंघ
या मतदारसंघात सर्वाधिक चुरशीची लढत दिसून येत आहे. इतर दोन मतदारसंघाच्या तुलनेत हा मतदारसंघ प्रचारा दरम्यान मोठ्या प्रमाणात चर्चेत होता. येथे सलग दोनदा विजयी ठरलेले आमदार महेश लांडगे महायुतीचे उमेदवार आहेत तर महाविकास आघाडीने नव्या चेहर्याच्या रुपात अजित गव्हाणे यांना रिंगणात उतरविले आहे. या मतदारसंघात एकूण 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. बहुजन समाजवादीचे बलराज कटके, एमआयएमचे अमजद खान, स्वराज्य शक्ती सेनेचे जावेद शहा, तर अरुण पवार, खुदबुद्दीन होबळे, गोविंद चुनचुने, हरिश डोळस, रफिक कुरेशी, शलाका कोंडावार आदी अपक्ष म्हणून नशीब आजमावत आहेत
चिंचवड विधानसभा मतदारसंघ
चिंचवड विधसनसभा मतदार संघात महायुतीचे शंकर जगताप विरूद्ध
महाविकास आघाडीचे राहुल कलाटे यांच्यात प्रमुख लढत असली, तरीदेखील राष्ट्रवादीचे बंडखोर भाऊसाहेब भोईर यांनीदेखील या लढतीत रंगत आणली आहे.याशिवाय संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतिश काळे हे स्वराज्य राष्ट्रनिर्माण सेनेच्या तिकीटावर मैदानात उतरले आहेत. त्याचबरोबर उमेदवार मारुती भापकर हे देखील सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते आहेत. त्यांनाही माणनारा वर्ग आहे. या दोन्ही उमेदवारंच्या मतांचा फरक प्रस्थापितांच्या मतांवर नक्कीच पडणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





