आज 12 सप्टेंबर रोजी डॉ. नॉर्मन बोरलॉग यांचा स्मृतिदिन. हरितक्रांतीचे प्रणेते म्हणून ते ओळखले जातात. जगामध्ये अन्नधान्याची टंचाई असताना, अन्नधान्य उत्पादन वाढविण्यासाठी त्यांनी केलेले संशोधन अमूल्य आहे. नॉर्मन बोरलॉग यांनी गव्हाच्या रोगांना दाद न देणार्या, अधिक उत्पन्न देणार्या वाणांचा शोध लावून मेक्सिको, भारत, पाकिस्तान आदी देशांमध्ये धान्याच्या उत्पादनात आमूलाग्र क्रांती केली. त्यांना भारतातील कृषी संशोधन संस्था आणि कृषी शास्त्रज्ञांबद्दल विशेष प्रेम होते. भारतातील 1960 आणि 1970 च्या दशकांतील हरित क्रांतीमधील बोरलॉग यांचे योगदान विसरता येणार नाही. मानवाच्या मूलभूत गरजांपैकी अन्नाचा प्रश्न बोरलॉग यांनी सोडविला होता म्हणून 1970 मध्ये त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार दिला गेला. साल 1940 च्या सुमारास संपूर्ण जगासमोर अन्नधान्याच्या टंचाईचे गंभीर संकट उभे राहिले तेव्हा गव्हाच्या आणि इतर धान्य पिकांच्या नव्या जातींचा शोध लागला नसता, तर पृथ्वीवरील सर्व मानवजात उपासमारीने होरपळून निघाली असती. दुसर्या महायुद्धाच्या काळात भारतातील बिहार, बंगाल आणि ओरिसा या राज्यांमध्ये हजारो भूकबळी गेले. तर अमेरिकेतील काही देश आणि आफ्रिकेतील काही देशात धान्यटंचाईमुळे बिकट स्थिती निर्माण झाली होती. याच सुमारास डॉ. नॉर्मन अर्नेस्ट बोरलॉग मेक्सिको पीक संशोधन केंद्रात दाखल झाले. त्यांनी केलेल्या यशस्वी प्रयोगानंतर जगासमोरील अन्नधान्याच्या टंचाईच्या समस्येवर उत्तर मिळाले. ज्यावेळी बोरलॉग मेक्सिकोमध्ये गेले तेव्हा तेथील मातीचा कस कमी झाला होता, पिकांवर वेगवेगळे रोग पडत होते, धान्याचे उत्पादन घटून अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली होती. अशा स्थितीत बोरलॉग यांनी अथक संशोधन करून रोगांना बळी न पडणार्या जाती शोधून काढल्या. या जाती रोगांना तर दाद देत नसतच त्याचबरोबर उत्पादनही जास्त देत होत्या. या संशोधनामुळे मेक्सिकोमध्ये पीक उत्पादनात क्रांती झाली. बोरलॉग यांनी गव्हाबरोबरच मका, ज्वारी, बार्ली आदी पिकांबाबत केलेले मौलिक संशोधन भारतासह संपूर्ण जगाला उपयोगी ठरले. 1960 चे दशक भारतासाठी कसोटी पाहणारे होते. या दशकात झालेल्या दोन युद्धांपैकी एकात झालेला पराभव, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन आणि 1966 व 1967 मध्ये सलग दोन दुष्काळ यामुळे भारतात बिकट स्थिती निर्माण झाली होती. कारण त्यावेळच्या 45 कोटी जनतेची भूक भागविण्याइतपत धान्य देशात पिकत नव्हते. पुरेशा अन्नधान्यअभावी जनतेवर उपासमारीची वेळ आली होती. भारतासारखा देश या संकटावर मात करू शकणार नाही, अशी भविष्यवाणी काही जागतिक तज्ज्ञमंडळी करू लागली होती. पॉल एर्लीच यांनी तर त्यांच्या ‘पॉप्युलेशन बॉम्ब’ या पुस्तकात ‘पृथ्वीवरील सर्व मानवांना अन्न पुरविण्याचा लढा अपयशी ठरणार आहे आणि ऐंशीच्या दशकाच्या अखेरीस कोट्यवधी लोक उपासमारीने मरतील’ असे अनुमान काढले होते. अन्नधान्यबाबतीत भारत कधीही स्वयंपूर्ण होणार नसल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले होते. तथापि, हे लिहीत असताना त्यांना हे माहीत नव्हते की भारतात लवकरच एक क्रांती साकारणार असून त्या दिशेने काही पावले टाकण्यास भारताने सुरुवातही केली होती. भारताने एव्हाना नॉर्मन बोरलॉग यांच्याशी संपर्क साधला होता. मेक्सिकोमध्ये बोरलॉग आणि त्यांच्या सहकार्यांनी कमी उंचीच्या गव्हाचा (डॉर्फ व्हीट) शोध लावला होता, जी विविध किडींचा आणि रोगांचा समर्थपणे सामना करू शकणारी आणि सामान्य जातीच्या गव्हापेक्षा तिपटीने अधिक उत्पादन देणारी होती. खुज्या गव्हाचे सुमारे अठरा हजार टन बियाणे मेक्सिकोहून आयात केले. बोरलॉग, त्यांचे सहकारी व भारतीय कृषिशास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांनी या नव्या जातीच्या गव्हाचा भारतात प्रयोग सुरू केला. लवकरच या प्रयोगाला घवघवीत यश आले. गव्हाचे हेक्टरी उत्पादन तिपटीहून अधिक वाढले. भूकमुक्तीच्या दिशेने भारताने जोमाने वाटचाल सुरू केली. बोरलॉग यांनी एक क्रांतीच घडविली, तिला ‘हरित क्रांती’ असे नाव मिळाले. 1974 मध्येच भारत अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण झाला. आज तर भारताचा समावेश वेगाने विकसित होणार्या देशात होत असून उदयाला येणारी आर्थिक महासत्ता म्हणूनही भारताकडे पाहिले जाते. या सर्वामध्ये बोरलॉग यांच्या हरित क्रांतीचा मोठा वाटा आहे, हे विसरता येणार नाही. डॉ. बोरलॉग यांना भारताविषयी अफाट प्रेम होते. त्यांना भारतीय कृषिशास्त्रज्ञांचा, येथील कृषी विद्यापीठांचा, कृषी संशोधन संस्थांचा आणि विज्ञानावर प्रेम करणारे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरूंचा आदर होता. त्यावेळचे अन्न व कृषी मंत्री डॉ. सी. सुब्रह्मणम् आणि कृषी शास्त्रज्ञ डॉ. स्वामीनाथन यांच्या कार्याचा त्यांच्यावर जास्त प्रभाव पडला. डॉ. बोरलॉग ज्या ज्या वेळी भारतभेटीवर येत, त्यावेळी ते नवीन जातीचे काही किलो बियाणे घेऊन येत असत. खरे तर ते काही किलो सोन्याचे मणीच घेऊन येत असत आणि त्याच मण्यांनी काळ्या मातीत सोने पिकविले. बोरलॉग यांनी सुमारे सहाशेच्या वर गव्हाच्या जाती भारतीय कृषी विभागाला दिल्या. 1962-63 पर्यंत भाकरी हेच गरिबांचे खरे अन्न होते. गहू केवळ उच्च, उच्च मध्यमवर्गीय लोकांच्या घरीच असायचा. त्याकाळी फक्त सणासुदीला चपाती-भात खाणारा भारतीय आज मात्र चपातीशिवाय घास मोडत नाही. बाजरी तर आपण पूर्णपणे विसरलो आहोत. ‘कल्याण सोना’ वाणाने भारतीय हरित क्रांतीला सोन्याचा मुकुट चढविला. आजही कोट्यवधी शेतकर्यांच्या तोंडात ‘कल्याण सोना’ पक्का बसला आहे. पोळीच्या दृष्टीसुखास महिनोन्महिने दुरावलेल्यांच्या तोंडात आज याच अन्नाचा घास जाऊ लागला आहे. आज देशात गव्हाचे 100 दशलक्ष टनापेक्षा जास्त उत्पादन होत असून गहू उत्पादक देशात भारत ताठ मानेने उभा आहे. इतिहासाला वळण देणार्या क्रांतिकारकांच्या यादीत नॉर्मन बोरलॉग यांचे नाव अग्रभागी घ्यावे लागेल. कारण त्यांच्यामुळे मानवजातीचा सर्वात मूलभूत असा पोटाचा प्रश्न सुटला होता. त्यामुळे त्यांना या जगातील सर्वश्रेष्ठ समजला जाणारा नोबेल पुरस्कार दिला पाहिजे अशी मागणी 1970 मध्ये पुढे आली. तथापि, कृषिशास्त्रज्ञाला नोबेल देण्याची प्रथा नसल्याने बोरलॉग यांनी शोधलेल्या गव्हाच्या जातीमुळे दंगली टळल्या आणि मानवजात तुलनेने शांत जीवन जगू शकली, असा युक्तिवाद करून त्यांना शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार देण्यात आला. बोरलॉग यांनी केवळ प्रयोगशाळेत बसून संशोधन केले नाही, तर प्रत्यक्ष शेतात राबून संशोधन केले. जगभरच्या शिवारात ते वावरले, शेतकर्यांना भेटले, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या दूर करण्यासाठी झटले. भूकमुक्तीला त्यांनी नेहमी प्राधान्य दिले. पिकविलेले अन्न सर्वांपर्यंत पोहोचले पाहिजे, असे त्यांना वाटे. म्हणून ते वितरण व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर जास्त भर देत. एकेकाळी भारतीय जनतासुद्धा धान्याच्या आयातीवर अवलंबून होती. अमेरिकेतून गहू घेऊन येणार्या जहाजाची आपण चातकाप्रमाणे वाट पहायचो. धान्याचे हे परावलंबन आज नाहीसे झाले असून आज भारत हा आघाडीचा निर्यातदार देश होत आहे. या हरित क्रांतीचे श्रेय भारतात इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्री, सी. सुब्रह्मण्यम, डॉ. स्वामीनाथन यांना दिले जाते. त्याचबरोबर हरित क्रांतीचे मूळ जनक नॉर्मन बोरलॉग यांनाही हे श्रेय जाते, हे विसरता येणार नाही. म्हणूनच पोळीचा किंवा पावाचा तुकडा मोडून घास घेताना आजही आपल्याला अन्नक्षेत्रातील या महापुरुषाचे स्मरण झाले पाहिजे.