28th July Hepatitis day : : यकृत जपूया…

पुणे -“जागतिक हिपॅटायटिस दिन’ दरवर्षी 28 जुलै रोजी आयोजित केला जातो. “Hepatitis ‘ म्हणजेच “मी वाट पाहू शकत नाही’ अशी थीम यंदा राबवली जात आहे. व्हायरल हिपॅटायटिस रोगाविरुद्धच्या लढ्याला गती देण्याची गरज आणि गरजू व्यक्तींसाठी चाचणी आणि उपचारांचे महत्त्व अधोरेखित करेल, अशी यामागची संकल्पना आहे.
नोबेल पुरस्कार विजेते डॉ. बारुक एस ब्लुमबर्ग यांच्या सन्मानार्थ “जागतिक हिपॅटायटिस दिवस’ आयोजित केला जातो. 28 जुलै 1925 साली जन्मलेल्या या वैज्ञानिकाने “हिपॅटायटिस बी’ विषाणू आणि त्यावरील औषधाचाही शोध लावला होता.
सन 2010 मध्ये 63 व्या जागतिक आरोग्य परिषदेनंतर या दिवसाबद्दल जनजागृती अधिक प्रभावीपणे राबवली जाते आहे. एका माहितीनुसार जगात दरवर्षी 11 लाख लोक केवळ हिपॅटायटिसमुळे मृत्यूमुखी पडतात. तर, भारतात हा आकडा सुमारे किमान अडीच लाख आहे.
हिपॅटायटिस”ए, बी, सी, डी, ई’ काय आहे?
हिपॅटायटिस ए आणि ई – दूषित अन्नपदार्थांचे सेवन आणि अशुद्ध पाणी पिण्यामुळे हिपॅटायटिस ए आणि हिपॅटायटिस ई होतो, असे डॉक्टर सांगतात.
हिपॅटायटिस बी –
हिपॅटायटिस बी संसर्ग यकृतमध्ये बराच काळ राहून यकृताला नुकसान पोहोचवतो. यामुळे यकृताचा कर्करोगही होऊ शकतो. विशेष म्हणजे, वीर्य, योनिमार्गातील द्रव आणि रक्तासारख्या शरीरातील द्रवांशी संपर्क आल्यास व्यक्तीला या व्हायरसची लागण होऊ शकते. प्रसूतिदरम्यान, रक्त संक्रमणातून, असुरक्षित लैंगिक संबंध आणि आईपासून नवजात बाळाला हा आजार होऊ शकतो. हिपॅटायटिस-बी बाधिताला हिपॅटायटिस-डी चीही लागण होते.
हेपेटायटीस सी –
या आजारात हिपॅटायटिस बी सारखीच लक्षणे असतात. परंतु, हा आजार अधिक काळ टिकून राहतो आणि हळूहळू यकृताचा इजा करतो. यामुळे यकृताचा सिरोसिस किंवा यकृताचा कर्करोग होऊ शकतो.
अशी आहेत लक्षणे…
त्वचा आणि डोळे पिवळे होणे (कावीळ)
पोटदुखी, सांधे दुखी
शौचाचा रंग फिकट आणि मूत्राचा रंग गडद असणे
थकवा, अचानक वजन कमी होणे
मळमळ, उलट्या, ताप, आणि सतत अशक्तपणा
भूक मंदावणे
काय काळजी घ्यावी?
हिपॅटायटिस रोखण्यासाठी सर्व लसी डॉक्टरांकडे असतात. त्या वयाच्या एक वर्षानंतर द्याव्यात.
असुरक्षित लैंगिक संबंध टाळावेत
हिपॅटायटिस बीसाठी लस उपलब्ध असून जन्मानंतर ती बाळाला द्यावी लागते.
पाणी उकळून, गाळून आणि शुद्ध करून प्यावे
पौष्टिक आहार घ्यावा.

