प्रभात वृत्तसेवा वडगाव मावळ – राज्यातील नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुका २ डिसेंबर रोजी पार पडल्या, आणि मतमोजणीसाठी ३ डिसेंबर ही तारीख नियोजित करण्यात आली होती. परंतु नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार ही मतमोजणी २० दिवसांनी म्हणजे आज होत आहे. मतमोजणी पुढे ढकलल्याने राजकीय पक्ष, उमेदवार व कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली होती. अखेर आज निकाल जाहीर होणार असल्याने मावळ तालुक्यातील काहीसे शांत झालेले राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत आहेत.वडगाव नगरपंचायत निवडणूक यंदा अत्यंत चुरशीची ठरली आहे. नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाच्या सर्व १७ जागांसाठी मोठ्या प्रमाणावर भावकी-भावकीत लढती रंगल्या आहेत. एकूण १७ प्रभागांपैकी ७ प्रभागांमध्ये थेट भावकी-भावकीत, तर ७ प्रभागांमध्ये दोन प्रमुख भावकींमध्ये लढत झाली आहे.त्यामुळे जवळपास सर्वच प्रभागांत काटे की टक्कर पाहायला मिळण्याची शक्यता आहे.नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या पत्नी अबोली ढोरे, तर भाजपने माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर यांची कन्या ऍड. मृणाल म्हाळसकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे ढोरे आणि म्हाळसकर या वडगावमधील दोन प्रभावी राजकीय घराण्यांमध्ये थेट सामना रंगला आहे. याशिवाय वंचित बहुजन आघाडीच्या वैशाली उदागे आणि अपक्ष नाजमाबी शेख हेदेखील नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात आहेत. प्रभागनिहाय लढतींना भावकींची छाप प्रभाग क्रमांक २ मध्ये राष्ट्रवादीचे प्रवीण ढोरे विरुद्ध भाजपचे दिनेश ढोरे, प्रभाग ४ मध्ये राष्ट्रवादीच्या सुनीता ढोरे विरुद्ध भाजपच्या पूजा ढोरे, प्रभाग ९ मध्ये भाजपच्या सुप्रिया चव्हाण विरुद्ध अपक्ष सारिका चव्हाण आणि प्रभाग १५ मध्ये राष्ट्रवादीचे राजेंद्र कुडे विरुद्ध भाजपचे अनंता कुडे अशी थेट भावकी-भावकीत लढत झाली आहे. तसेच प्रभाग ६, ८, १०, ११, १३ व १५ मध्ये राष्ट्रवादी आणि भाजपच्या उमेदवारांमध्ये दोन प्रमुख भावकींमध्ये थेट संघर्ष झाला आहे. काही प्रभागांमध्ये अपक्ष उमेदवारांनीही निवडणुकीची रंगत वाढवली आहे. त्यामुळे मतमोजणीदरम्यान प्रत्येक फेरीकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे. खोपोली नगरपालिकेतही आज उत्सुकतेचा कडेलोट खोपोलीत नगराध्यक्ष पदासाठी शिंदे गट-भाजप-आरपीआय महायुतीकडून कुलदीपक शेंडे, तर अजित पवार गट राष्ट्रवादी, ठाकरे गट शिवसेना आणि शेकाप परिवर्तन विकास आघाडीकडून डॉ. सुनील पाटील यांच्यात प्रमुख लढत झाली आहे. नगरसेवक पदाच्या ३१ जागांसाठी तब्बल ११८ उमेदवारांनी आपले नशीब आजमावले आहे. खोपोली शहरात एकूण ६२,०७४ मतदार असून त्यापैकी ४२,४४८ मतदारांनी नगराध्यक्ष पदासाठी मतदानाचा हक्क बजावला आहे. मोठ्या प्रमाणातील मतदानामुळे नगराध्यक्ष पदासह १५ प्रभागांतील नगरसेवक पदाच्या निवडणुका अत्यंत चुरशीच्या ठरण्याची शक्यता आहे.