सांगली (प्रतिनिधी) – करोनाचा संसर्ग झालेले चार रुग्ण सांगलीतील इस्लामपूर शहरात सापडले आहेत. सर्वजण एकाच कुटुंबातील असून त्यांना मिरज शासकीय वैद्यकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांचा सोमवारी करोनाचा पॉझिटिव्हचा रिपोर्ट आला . जिल्ह्यात करोनाचे एकदम चार रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे .
सांगली जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने कडेकोट अंमलबजावणी करण्यात आली आहे . यासाठी जिल्ह्यातील सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच सर्व व्यापार, उद्योग बंद केले आहेत . जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद केल्या आहेत. नाकाबंदी करुन सर्व वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. तसेच परदेशातून येणाऱ्या नागरिकांनादेखील निगरणाखाली ठेवण्यात आले आहे. तसेच करोनाची लक्षणे आढल्यास विलगीकरण , आयसोलेशन कक्षात तातडीने दाखल करण्यात येत आहे. गंभीर असलेल्यांचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठविले जात आहेत. यामुळे जिल्ह्यातील परिस्थिती काहीशी नियंत्रणात वाटत होती .
दरम्यान, आयसोलेशन कक्षात दाखल असलेल्या सातपैकी चौघांना करोना संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. हे लोक १४ मार्च रोजी सौदी अरेवियातून भारतात आले आहेत. त्यांना तालुका प्रशासनाने इस्लामपूर येथे होम क्वारंटाईनची सक्ती केली होती. तरीही हे लोक घराबाहेर वावरत होते . त्यामुळे प्रशासनाने पोलिसांमार्फत दोन वेळा नोटीस पाठवली होती. त्यांच्यात करोनाची लक्षणे दिसून आल्याने त्यांना त्यानंतर दोन दिवसापूर्वी त्यांना मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
यांच्यात करोनाची लक्षणे आढळल्याने त्यांच्या घशातील द्रव्याचे नमुने पुण्याला पाठविण्यात आले होते. सोमवारी या चौघांचेही नमुणे पॉझिटिव्ह आले आहेत. यात दोन महिला व दोन पुरुष आहेत. हे सर्वजण ६५ , ६२ , ५२ व ३५ वर्षांचे आहेत. दरम्यान, जिल्ह्यात आजपर्यंत एकूण ५१२ परदेशी प्रवासी आले आहेत. यातील सात जण आयसोलेशन कक्षात आहेत . यातील २२ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तीन जणांचे रिपोर्ट प्रलंबित आहेत. ४८३ जण होम कारटाईनमध्ये आहेत .