“महाराजांच्या नावाने राजकारण करायचं, मतं मागायची…”; राज ठाकरेंनी व्यक्त केला संताप

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse | सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील समुद्र किनारपट्टीवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा उभारण्यात आलेला भव्य पुतळा सोमवारी दुपारी कोसळला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर महिन्यात या पुतळ्याचे लोकार्पण केले होते. त्यानंतर अवघ्या 8 महिन्यांतच हा पुतळा पडल्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली असून त्याचे पडसाद देखील पाहायला मिळत आहे. विरोधकांकडूनही सरकारवर टीकेची झोड उठली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी एक पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला.
राज ठाकरे यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, “मालवण येथील राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची बातमी मनाला वेदना देणारी आहे. महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा, तो देखील अवघ्या ८ महिन्यांपूर्वी उभारला गेलेला, असा कोसळतोच कसा? मुळात ज्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे, त्याची तपासणी वगैरे काही केली होती का नव्हती? आजच्या घटनेनंतर कुसुमाग्रजांच्या शहरातील ‘पाच पुतळ्यांवरची’ कविता आठवली. ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी ही कविता मुद्दाम देत आहे”.
कुसुमाग्रजांची कविता
मध्यरात्र उलटल्यावर
शहरातील पाच पुतळे
एका चौथऱ्यावर बसले
आणि टिपं गाळू लागले.
ज्योतिबा म्हणाले, शेवटी मी झालो फक्त माळ्यांचा.
शिवाजीराजे म्हणाले, मी फक्त मराठ़्यांचा.
आंबेडकर म्हणाले, मी फक्त बौद्धांचा.
टिळक उद़्गारले, मी तर फक्त चित्पावन ब्राह्मणांचा.
गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला आणि ते म्हणाले,
तरी तुम्ही भाग्यवान.
एकेक जातजमात तरी
तुमच्या पाठीशी आहे.
माझ्या पाठीशी मात्र
फक्त सरकारी कचेऱ्यातील भिंती!
पुढे राज ठाकरे यांनी म्हटले की “पुतळे, स्मारकं ही फक्त आपल्यासाठी राजकीय सोय राहिली आहे. मी मागे पण अनेकदा म्हटलं होतं की महाराजांचं खरं स्मारक हे कुठला तरी भव्य पुतळा नसून, त्यांचे गड-किल्ले हे आहेत. पण महाराजांच्या नावाने राजकारण करायचं, मतं मागायची, सत्ता मिळवायची आणि मग स्मारकांच्या निविदा काढायच्या, त्यातून काही मिळतंय का ते बघायचं इतकंच राहिलं आहे. या प्रतिकांचं राजकारण करणारी व्यवस्था आता लोकांनी उध्वस्त केली पाहिजे आणि तसं घडलं तरच आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो असं म्हणू शकतो”.
मालवण येथील राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची बातमी मनाला वेदना देणारी आहे. महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा, तो देखील अवघ्या ८ महिन्यांपूर्वी उभारला गेलेला, असा कोसळतोच कसा?
मुळात ज्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे,…— Raj Thackeray (@RajThackeray) August 26, 2024
एकनाथ शिंदे काय म्हणाले?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं आराध्य दैवत आहे आणि त्यांचा पुतळा ही आमची अस्मिता आहे. तो पुतळा भारतीय नौदलाने उभारला होता. पुतळ्याचे डिझाईन देखील नौदलानेच तयार केले होते. हा पुतळा कोसळल्याचे वृत्त समजल्यावर मी तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांनी मला सांगितले की ही घटना घडली त्यावेळेला त्या भागात ४५ किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने सोसाट्याचा वारा वाहत होता, त्यामुळे पुतळ्याचे नुकसान झाले.
मी सर्वांना आश्वस्त करू इच्छितो की उद्या तिथे (घटनास्थळी) नौदलाचे अधिकारी जाणार आहेत. तसेच पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे घटनास्थळी पोहोचले आहेत. तिकडे जाण्यापूर्वी मी त्यांना काही सूचना केल्या आहेत. आज नौदलाचे अधिकारी व आमचे अधिकारी स्मारकाची पाहणी करतील. उद्यापासूनच छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा पुन्हा उभारणीच्या कामाला सुरुवात केली जाईल. पुन्हा एकदा त्याच ठिकाणी आपल्या महाराजांचा पूर्णाकृती पुतळा दिमाखात आणि मजबुतीने उभा राहिलेला तुम्हाला दिसेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा:
जम्मू-काश्मीर : भाजप, काँग्रेस आणि एनसीच्या पहिल्या यादीत किती हिंदू आणि किती मुस्लिम? जाणून घ्या





