BJP MP Madhukar Kukde : नगरपरिषदा आणि नगरपंचातीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग आहे. काल उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा अंतिम दिवस होता, या दिवशी अनेकांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत. अशातच भंडारा जिल्ह्यातील एक मोठी बातमी समोर आली आहे. भंडाऱ्यातील नगरपरिषद निवडणुकीसाठी ऐनवेळी पक्षाने पुतण्याचे तिकीट कापल्याने काकाने आपल्याच पक्षाला घराचा आहेर दिला असून, भाजपला आता निवडणूक लढविण्यासाठी माणसांची नाहीतर, पैशाची गरज आहे, असे खळबळजनक विधान माजी खासदार मधुकर कुकडेंनी केले आहे. यामुळे येथील स्थानिक राजकीय वातावरण तापले आहे. पक्षांनी कारवाई केली तरी घाबरत नसल्याचा रोखठोक इशारा मधुकर कुकडेंना दिला आहे. एका न्यूज चॅनेलशी बोलताना त्यांनी वरील विधान केले. भंडाऱ्याच्या तुमसर नगरपालिका निवडणुकीत हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळत असून भाजपमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. पुतण्याला पक्षाने तिकीट नाकारल्याने माजी खासदार मधुकर कुकडे यांनी नाराजी व्यक्त केली. पुतण्या आशिष कुकुडेंना भाजपने शेवटच्या क्षणी तिकीट कापले. त्यामुळे कुकुडे यांनी बंडखोरी केली असून, अपक्ष निवडणुकीला लढण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. त्यांच्या या निर्णयाला त्यांचे काका मधुकर कुकडे यांनी पाठीशी राहणार असल्याचे सांगितले आहे. नेमकं काय म्हणाले मधुकर कुकडे? आशिष कुकडेंनी भाजपला तिकीट मागितली होती. भाजपने 100 टक्के आशिषला तिकीट द्यावी, अशी कार्यकर्त्यांची मागणी होती. आणि भाजपही तिकीट देईल, असा विश्वास होता. पूर्ण संकेत होते. मात्र, प्रदीप पडोळे यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आणि घाबरून जाऊन भाजपने त्यांना तिकीट दिली, असा दावा मधुकर कुकडे यांनी केला आहे. त्यामुळे मी निर्णय घेतलाय की… मागील चार महिन्यांपासून नगरपालिकेची माझी तयारी चालू आहे. मी तीन वेळचा कुणबी समाजाचा आमदार आणि एकदा खासदार राहिलेला असतानाही माझ्या शब्दाला पक्षात मान राहिला नाही. त्यामुळे मी निर्णय घेतलाय की, एकदा निवडणूक लढायची. आशिषला तिकीट न मिळणे म्हणजे माझी पक्षात किंमत शून्य आहे. माझी गावातील इमेज वाचविण्यासाठी आणि राजकारणात ईमानदारी करण्यासाठी आम्ही लढू, असेही मधुकर कुकडे यांनी स्पष्ट केले आहे. थेट इशारा पुढे बोलताना मधुकर कुकडे म्हणाले, मी 15 वर्ष भाजपचा आमदार राहिलो. पण कधीही पैसे पाहून तिकीट दिले नाही. तर, जात बघून नाही तर, माणसं बघून तिकीट दिल्या जातं होतं, पुतण्या आशिषच्या बंडखोरीमुळे भाजपने माझ्यावर शिस्तभंगची कारवाई करावी, मी घाबरतं नाही, असा इशारा मधुकर कुकडे यांनी दिला आहे. त्यामुळे कुकडे यांनी केलेला दावा आरोपांवर भाजप काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. हेही वाचा : “बिनविरोधसाठी एवढा अट्टहास का? विकली गेलेली यंत्रणा आणि…”; जामनेर निवडणुकीवरून रोहित पवारांचा भाजपच्या नेत्यावर हल्लाबोल