TN Cabinet: तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी आपल्या पहिल्याच सरकारमध्ये गृह, सामान्य प्रशासन, महिला व युवक कल्याण यांसह अनेक महत्त्वाची खाती स्वतःकडे ठेवली आहेत. तर ज्येष्ठ नेते के. ए. सेंगोत्तैयन यांच्याकडे अर्थमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. राजभवनाने शनिवारी मुख्यमंत्री विजय यांच्या शिफारसीनुसार १० मंत्र्यांच्या खातेवाटपास मंजुरी दिली. मुख्यमंत्री विजय यांच्याकडे सामान्य प्रशासन, गृह, महिला व युवक कल्याण, बालक, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग कल्याण, महानगर प्रशासन तसेच शहरी व पाणीपुरवठा ही खाती राहणार आहेत. हेही वाचा – तिसऱ्या मुलासाठी 30 हजार, चौथ्यासाठी 40 हजार; आंध्र सरकारचा लोकसंख्या वाढीसाठी प्रोत्साहन भत्ता मंत्री एन. आनंद यांच्याकडे ग्रामविकास व जलसंपदा, तर आधव अर्जुना यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम, महामार्ग, लघु बंदरे आणि क्रीडा विकास खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. डॉ. के. जी. अरुणराज यांच्याकडे आरोग्य, वैद्यकीय शिक्षण आणि कुटुंब कल्याण विभाग सोपविण्यात आला आहे. पी. वेंकटरमणन यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा, आर. निर्मलकुमार यांच्याकडे ऊर्जा संसाधने व कायदा, तर राजमोहन यांच्याकडे शालेय शिक्षण, तामिळ विकास, माहिती व प्रसिद्धी विभाग देण्यात आला आहे. याशिवाय डॉ. टी. के. प्रभू यांच्याकडे नैसर्गिक संसाधने, खनिज व खाण विभाग, तर एस. कीर्तन यांच्याकडे उद्योग खाते सोपविण्यात आले आहे. मुख्यमंत्री विजय यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचा शपथविधी १० मे रोजी पार पडला होता.