तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रसादावरून यापूर्वीही झाला होता वाद; काय आहे प्रकरण ? जाणून घ्या…

Tirumala Tirupati Ladu Balaji Prasad | आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रसादात गोमांस चरबी आणि माशाच्या तेलाचा वापर केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर राजकीय वाद निर्माण झाला आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी शुक्रवारी (20 सप्टेंबर) सांगितले की त्यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्याकडून तिरुपती लाडू प्रकरणाचा संपूर्ण अहवाल मागवला आहे.
प्रसादावरून वातावरण तापल्यानंतर प्रसाद चाचणीसाठी पाठवण्यात आला होता. त्याचा अहवाल गुरुवारी समोर आला. प्रयोगशाळेच्या अहवालाने पुष्टी केली आहे की मंदिराच्या प्रसादामध्ये (लाडू) बीफ फॅट आणि फिश ऑइलचा वापर करण्यात आला होता. प्रसाद राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाकडे चाचणीसाठी पाठवण्यात आला होता.
लाडू बनवायला सुरवात कधीपासून झाली?
तिरूपती बालाजीचा प्रसाद म्हणून लाडूंचे वाटप सुमारे 300 वर्षांपूर्वी सुरू झाल्याचे सांगितले जाते. 2 ऑगस्ट 1715 रोजी पहिल्यांदा लाडू भक्तांना तिरुमला प्रसाद म्हणून देण्यात आले होते. 2010 पर्यंत दररोज एक लाख लाडू तयार करून त्याचे वाटप केलं जात होते.
त्यानंतर भाविकांची वाढती गर्दी पाहता 3.20 लाख लाडू तयार केले जाऊ लागले. 2014 मध्ये तिरुपती बालाजीच्या लाडूला जीआय टॅग सुद्धा मिळाला आहे. त्याचबरोबर या लाडूचे पेटंट आणि ट्रेडमार्क देखील आहे.
३०० वर्षाचा इतिहास असलेल्या तिरूपती बालाजीचा प्रसाद ‘लाडू’ची पाककृती फक्त ६ वेळा बदलण्यात आली. हा लाडू तयार करण्यासाठी बेसन आणि गुळाच्या रसापासून बुंदी बनवली गेली. नंतर, चव आणि पौष्टिक मूल्य दोन्ही वाढवण्यासाठी बदाम, काजू आणि मनुका जोडले. दरम्यान खास देशी तुपाचा वापर देखील तिरूपती बालाजीच्या लाडू प्रसादात केला जात असल्याचे देवस्थान बोर्डच्या अहवालात म्हटले आहे.
एका वर्षात ५०० कोटींची कमाई
TOI च्या वृत्तानुसार, तिरूपती बालाजी देवस्थानच्या स्वयंपाकघरात ३ लाख हून अधिक लाडू तयार होतात. या बालाजी प्रसादाच्या लाडूपासून देवस्थानला एका वर्षात सुमार ५०० कोटी रूपये मिळतात. १७७५ सालापासून देवस्थानकडून प्रसादाचे लाडू तयार केले जातात.
यापूर्वीही झाला वाद
याच प्रसादाबाबत यापूर्वीही वाद झाला होता. लखनऊमध्ये राहणाऱ्या एका निवृत्त अधिकाऱ्याने तिरुपती मंदिरात मिळणाऱ्या प्रसादाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. अमर उजालाने दिलेल्या वृत्तानुसार, या अधिकाऱ्याने सांगितले होते की, त्यांनी मंदिराच्या प्रसाद स्टोअरमधून लाडू खरेदी केले होते. त्यांनी प्रसाद घरी आणला तेव्हा त्यात साचा आणि एक खिळा होता. त्यावेळी आंध्र प्रदेश विधानसभेतही या मुद्द्यावरून मोठा गदारोळ झाला होता.





