Samruddhi Highway accident : समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भयंकर अपघाताची घटना घडली आहे. नाशिकाच्या सिन्नर तालुक्यातील पाटोळे येथे अपघाताची घटना घडली आहे. भरधाव वेगाने महामार्गावरून जात असलेल्या कारचा टायर फुटला आणि भीषण अपघात घडला. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर अपघातात अनेकजण जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींमध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे. मृतांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, जखमींच्या कुटुंबीयांच्या मोठा धक्का बसला आहे. नेमका कसा झाला अपघात? मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेच्या चिंचपाडा येथे राहणारे ११ जण कारने लग्नासाठी समृद्धी महामार्गावरून प्रवास करत होते. कार सिन्नर तालुक्यातील पाटोळे शिवाराजवळ आल्यानंतर अचानक कारचा टायर फुटला. कारचा वेग अधिक असल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. हा भीषण अपघात इतका भयंकर होता की, कारचा चक्काचूर झाला. अपघात घडल्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना तात्काळ उपचारांसाठी रुग्णालयात हलवले. या अपघातातील मृत आणि जखमी हे कल्याणधील रहिवासी आहेत. या अपघातात निलेश बुकाणे, त्यांची सख्खी बहीण वैशाली सचिन घुसळे आणि बायको छाया बुकाणे यांचा मृत्यू झाला आहे. तर या अपघातामध्ये सचिन घुसळे (४० वर्षे), साची सचिन घुसळे (९ वर्षे), अर्णव निलेश बुकाणे (१४ वर्षे), गोल्डी निलेश बुकाणे (१० वर्षे), सुयश घुसळे (३ वर्षे), निरव गायकवाड (१० वर्षे), मनस्वी गायकवाड (५ वर्षे) हे सर्वजण गंभीर जखमी झाले आहेत. कारचा चालक प्रशांत शिरसाट (३२ वर्षे) हा किरकोळ जखमी आहे. या अपघातापूर्वीचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत बुकाणे आणि घुसळे कुटुंबीय आनंदी दिसत होते. या भीषण अपघातामुळे काही क्षणात होत्याच नव्हतं झालं आहे. हेही वाचा : ‘मनरेगा’वरून गोंधळ ; कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आज लोकसभेत नवीन विधेयक सादर करणार ?