Pune : अंत्यविधीसाठी वशिला लावण्याची वेळ

पुणे : वैकुंठ स्मशानभूमीत शनिवारी अंत्यविधीसाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे वशिला लावण्याची वेळ पुणेकरांवर ओढावत आहे. विशेषत: लाकडांवर अंत्यविधी केल्या जाणाऱ्या शेड शनिवारी शिल्लक नसल्याने स्मशानभूमीत व्हीआयपी व्यक्तींच्या अंत्यविधीचा चबुतरा रिकामा असतानाही तेथे अंत्यविधीसाठी परवानगी दिली गेली नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परवानगी दिली; तरच तेथे अंत्यविधी करता येतो. यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर असून या ठिकाणी आणखी शेड वाढविण्याची मागणी केली जात आहे.
अंत्यंविधीनंतर राख सावडणे हा एक विधी असतो. उदा. शुक्रवारी दहन झाल्यास राख सावडण्याचा कार्यक्रम रविवारी ठेवला जातो. त्यामुळे संबंधित शेडमध्ये इतर पार्थिवाचे अंत्यविधी करता येत नाही. शनिवारीही अशीच स्थिती उद्भवल्याने वैकुंठात गोंधळाची स्थिती निर्माण झाली. तर, अंत्यविधीसाठी जागा नसल्याने काही नागरिकांनी येथील कर्मचाऱ्यांकडे व्हीआयपींच्या अंंत्यविधीसाठी राखीव चबुतऱ्याच्या ठिकाणी परवानगी द्यावी, अशी मागणी केली.
त्यावरून वादही झाले. त्यावर कर्मचाऱ्यांंनी मनपा अधिकाऱ्यांना फोन करून परवानगी घ्यावी, असे सांगितले. त्यावेळी नागरिकांनी आरोग्य विभाग, विद्युत विभागासह आयुक्तांनाही संपर्क साधला. मात्र, कोणाकडूनही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे नागरिकांनी उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची भूमिका घेतली. त्यामुळे वाद वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन दुसऱ्या एका ठिकाणी या नागरिकांना अंत्यविधीसाठी परवानगी देण्यात आली.
अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांंच्या काही सामाजिक प्रथा, परंपरा आहेत. त्यामुळे नागरिक लाकडावर दहन करण्याचा आग्रह धरतात. अशा वेळी महापालिकेने नेहमी येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. अनेकदा शनिवारी दहन करण्यासाठी जागा नसते. अशा वेळी अधिकाऱ्यांना फोन करून जागा मिळवाव्या लागतात, ही दुर्देवी बाब आहे.
– परशे खांडके, सामाजिक कार्यकर्ते





