सातगाव पठारावरील कुरवंडीपासून ते पारगावपर्यंतचे नऊ बंधारे कोरडे
पेठ – सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागातील वेळ नदीचे पात्र आटल्याने या परिसराला प्लॅस्टिक कचऱ्याचा विळखा पडल्याचे दिसत आहे.
वेळ नदीवर कुरवंडीपासून पारगावपर्यंत सर्व सातही गावांच्या नदी काठावर एकूण नऊ कोल्हापूर पध्दतीचे बंधारे आहेत. मात्र, ते सर्व कोरडे पडले आहेत, त्यामुळे झाडाझुडपांत अडकलेला प्लॅस्टिक कचरा नदीपत्राच्या परिसरात पसरलेला आहे.
कुरवंडी, भावडी, कारेगाव आणि पेठ गावांलगत नदीपात्र आहे. परिसरातील प्लॅस्टिक जमा होऊन नदीपात्रात येते. प्रत्येक ग्रामपंचायत प्रशासनाने आठवडे बाजार, गावातील दुकाने यामधील प्लॅस्टिक बंदीसाठी पुढाकार घेऊन प्लॅस्टिक वापरावर बंदी आणली होती. मात्र, नदीपात्र स्वच्छ राहण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
बाजारपेठांत सर्रास प्लॅस्टिकचा वापर
भाजीवाला, फळवाला, किराणा दुकान, खाद्य वस्तू विक्री दुकान, औषधे आदी सर्वच ठिकाणी पातळ व कमी जाडीच्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर सर्रास सुरू आहे. याच प्लास्टिकच्या पिशव्यांमधून टाकाऊ अन्न वा वस्तू लोक नदीपात्रात फेकून देत आहेत.
विविध ठिकाणी त्यासाठी कचरा कुंडी आहेत; पण नागरिक त्याचा वापर करीत नसून रस्त्यावर अथवा इतरत्र पिशव्या फेकून देतात. येथील प्रशासन प्लॅस्टिक पिशव्या जप्तीची मोहीम अधूनमधून हाती घेते. काही दिवस ही मोहीम धडाक्यात सुरू असते आणि अचानक ती थांबते.