श्रीरामपूर : तालुक्यातील टिळकनगर इंडस्ट्रीज लिमिटेड (टिळकनगर) आणि दत्तनगर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एकदिवसीय मोफत आरोग्य तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दत्तनगर ग्रामपंचायत येथे पार पडलेल्या या शिबिरात २३६ हून अधिक लाभार्थ्यांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली. ‘योग्य पोषण – स्वस्थ जीवन’ हा संदेश या उपक्रमाद्वारे जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात आला. तपासणी व मोफत औषध वाटप या शिबिरात रुग्णांची रक्तातील साखर, हिमोग्लोबिन, रक्तदाब आणि बी.एम.आय. (BMI) तपासणी प्रशिक्षित लॅब टेक्निशियनद्वारे करण्यात आली. डॉ. विशाल धस, डॉ. वर्षाराणी भिसे आणि डॉ. पुनम शिंदे यांनी रुग्णांची सविस्तर वैद्यकीय तपासणी करून मार्गदर्शन केले. निदानानुसार रुग्णांना व्हिटॅमिन बी, फॉलिक ॲसिड, आयर्न, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी यांसारख्या आवश्यक औषधांचे मोफत वाटप करण्यात आले. साखर कामगार हॉस्पिटलच्या नर्सेस आणि कर्मचाऱ्यांनी याकामी विशेष सहकार्य केले. आहार मार्गदर्शन व समुपदेशन आहारतज्ज्ञ डॉ. संपदा काळे यांनी उपस्थित लाभार्थ्यांना वैयक्तिक पोषण आणि आहार संतुलनाबाबत मोलाचे समुपदेशन दिले. शिबिरादरम्यान अनेक रुग्णांमध्ये उच्च रक्तदाब, वाढलेली साखर आणि सांधेदुखी यांसारख्या समस्या आढळून आल्या. अशा रुग्णांना पुढील उपचारांसाठी आवश्यक वैद्यकीय फॉलो-अपच्या सूचना देण्यात आल्या. मान्यवरांचे मार्गदर्शन व उपस्थिती टिळकनगर इंडस्ट्रीजच्या सी.एस.आर. (CSR) विभागामार्फत आणि एस.एम.डी.टी. ट्रस्टच्या सहकार्याने हे शिबिर पार पडले. या उपक्रमासाठी टिळकनगर इंडस्ट्रीजचे चेअरमन अमित डहाणूकर, एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर शिवानीताई डहाणूकर, सी.आर. रमेश, तरुण बहल, अनिरुद्ध चौधरी आणि महेश फणसळकर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संगिता बेटकर, धनंजय भिसे, नकुल शिंदे, अमोल काळे आणि कामगार युनियनचे अध्यक्ष अशोक बोरगे यांनी परिश्रम घेतले. तसेच दत्तनगरचे ग्रामसेवक रुबाब पटेल, सरपंच सारिका कुंकूलोळ, उपसरपंच कुसुम जगताप, माजी सरपंच सुनील शिरसाठ यांच्यासह ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिराच्या समारोपप्रसंगी लाभार्थ्यांनी डॉक्टरांच्या सेवाभावी वृत्तीचे कौतुक केले. कारखाना व्यवस्थापनातर्फे यावेळी अल्पोपहाराचीही व्यवस्था करण्यात आली होती. कमी कालावधीत शिस्तबद्ध नियोजन करून शिबीर यशस्वी केल्याबद्दल ग्रामस्थांनी टिळकनगर इंडस्ट्रीजचे आभार मानले.