इस्लामाबाद – टिकटाॅकने पाकिस्तान दूरसंचार प्राधिकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे पाकिस्तानमध्ये टिकटाॅवर बंदी घालण्यात आली आहे.
अश्लील व्हिडीओच्या कारणावरून ही बंदी घालण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. याआधीही पाकिस्तान दूरसंचार प्राधिकरणाने अश्लील व्हिडीओबाबत टिकटाॅकला समज दिली होती. तसेच कारवाई करण्याचीही सूचना दिली होती.
कारवाई करण्यासाठी टिकटाॅकला पुरेसा वेळही देण्यात आला होता. मात्र, टिकटाॅककडून ठोस कारवाई न झाल्याने पाकिस्तानने टिकटाॅक बॅन करण्याचा निर्णय घेतला, असे पाकिस्तान दूरसंचार प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.
ही बंदी तात्पुरती स्वरूपाची असणार आहे. जर टिकटाॅकने अॅपवरील अश्लील व्हिडीओसंदर्भात कार्यवाही कशी करण्यात येणार आहे, त्याचे धोरण कसे असणार आहे, याबाबत माहिती दिल्यास ही बंदी उठवण्यात येणार असल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.
टिकटाॅकसारख्या अॅप्सवरून अश्लील व्हिडीओ प्रसारीत झाल्यामुळे समाजात अश्लीलता वाढते. त्यामुळे गुन्हे वाढतात आणि कुटुंब व्यवस्थेवर दुष्परिणाम होतो. समाजासाठी धोकादायक ठरणाऱ्या टिकटाॅक सारख्या अॅप्सवर बंदी घालण्याची आवश्यकता आहे. असे काही दिवसांपूर्वी पंतप्रधान इम्रान खान म्हटले असल्याचा दावा पाकिस्तानच्या माहिती मंत्री शिबली फराज यांनी केला होता.