बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ हा ऍक्शन हिरो म्हणून ओळखला जातो. तसेच तो आपल्या शानदार डान्स मूव्हजमुळेही सतत चर्चेत असतो. कदाचित यामुळेच तो आता बॉलीवूडमधील बॅकग्राउंड डान्सरच्या मदतीसाठी पुढे आला आहे, जे करोना व्हायरसच्या महामारीत सध्या अनेक अडचणींचा सामना करत आहेत. सध्या अनेक चित्रपटांचे आणि गाण्यांचे शूटिंग बंद आहेत. यामुळे काम नसल्याने बॉलीवूडमधील डान्सरांना आर्थिक चणचण भासत आहे. अशा या संकटकाळात टायगरने त्यांना 100 रेशन किट्स डोनेट केले आहे. या किट्समध्ये डाळ आणि अन्य अत्यावश्यक अन्नधान्य आहे. याशिवाय महिला डान्सरसाठी सॅनिटरी नॅपकिनसारख्या वस्तूंचाही समावेश आहे. हे साहित्य सुमारे एक महिना पुरेल एवढे आहे. यासाठी टायगरकडून सर्व डान्सरशी चर्चा करण्यात आली आहे. दरम्यान, लॉकडाऊनमुळे काही डान्सर आपापल्या घरी गेले आहेत. त्यात या किट्स त्यांना देण्यात येणार आहेत, जे अद्यापही मुंबईत आहेत.